लेख – चीन हिंदुस्थानविरुद्ध आक्रमक का झाला?

4170

>> डॉ. शैलेंद्र देवळाणकर 

गेल्या काही दिवसांत हिंदुस्थान आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालला असतानाच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अचानक घूमजाव करत चर्चा आणि सल्लामसलतीतून तोडगा काढण्याचा पर्याय बोलून दाखवला. अर्थात हे म्हणत असताना सीमाविषयक भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे, हे लक्षात घ्यायला हवे. हिंदुस्थानवर दबाव आणण्यासाठी चीन आक्रमकता दाखवत आहे. पण 1962 चा हिंदुस्थान आज राहिलेला नाही हे चीन जाणून आहे.

हिंदुस्थान व चीन यांच्यादरम्यान सध्या युद्धजन्य परिास्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या एक महिन्यापासून चीन हिंदुस्थानी सीमेवर कमालीचा आक्रमक बनला आहे. सिक्कीम आणि लडाख अशा दोन ठिकाणी चिनी सैनिकांच्या हालचाली वाढल्या आहेत. विशेष करून लडाखमध्ये चीनने सैनिकांसाठी बंकर्स बांधण्यास आणि तंबू उभारण्यास सुरुवात केली. यासाठी 5000 सैनिक चीनने तेथे तैनात केले आहेत. हिंदुस्थाननेही माघार न घेता तयारी सुरू केल्यामुळे तणावजन्य परिास्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी अचानक चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिंदुस्थानच्या सीमेवरील सर्वसाधारण स्थिती आता स्थिर आणि पूर्ण नियंत्रणात असल्याचे सांगत एक पाऊल मागे घेतले आहे. तथापि, चीनची सीमाविषयक भूमिका कायम असून त्यावर आम्ही ठाम आहोत, असेही म्हटले आहे.

पूर्व लडाख बनले केंद्र

चीनला मुख्य राग हा पूर्व लडाखविषयी आहे. त्यामुळे या संघर्षाचे मुख्य केंद्र पूर्व लडाखच असणार आहे. पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली आणि पेंगकाँग त्सो लेक या दोन्ही क्षेत्रांमध्ये हिंदुस्थानने अलीकडच्या काळात रस्ते बांधण्यास सुरुवात केली आहे. खरे पाहता, यापूर्वी चीन या क्षेत्रात उघडपणाने यायचा आणि आपली दबंगगिरी दाखवायचा. गलवान व्हॅलीवर तर आपला दावाही सांगायचा. आता हिंदुस्थानने तिथे रस्ते उभारणीचे काम सुरू केले असून चीनला ते खुपत असल्याने त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. कारण लडाखमध्ये संघर्षाची किंवा प्रत्यक्ष युद्धाची जरी परिास्थिती निर्माण झाली तर त्यावेळी हा रस्तेप्रकल्प हिंदुस्थानला उपयोगी ठरणार आहे.

विशेष म्हणजे, हिंदुस्थान आणि चीन यांच्यादरम्यान असलेल्या सुमारे 4000 किलोमीटर लांबीच्या सीमारेषेवर गेल्या चार-पाच वर्षांमध्ये हिंदुस्थानने अनेक ठिकाणी रस्तेउभारणी, पूलबांधणी, बंकर्सची र्निमिती असे साधनसंपत्तीच्या विकासाचे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. यामुळे चीन प्रचंड संतप्त झालेला आहे. कारण आजवर चीनने हिंदुस्थानला गाफिल ठेवत या सीमेलगतच्या भागावर मोठ्या प्रमाणावर साधनसंपत्तीचा विकास केला होता. सीमेवर शांतता राखण्यासंदर्भात हिंदुस्थानसोबत वेगवेगळे करार करून त्याआड चीनने तिबेट, नेपाळमध्ये रस्ते, रेल्वे यांचे मोठे जाळे विकसित केले आहे. परंतु डोकलामनंतर हिंदुस्थान अधिक सावध झाला आणि या भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना दिली. यामुळे चीनचा जळफळाट झाला. यापूर्वीही चीनकडून घुसखोरी व्हायची, पण अनेकदा हिंदुस्थान अनेक क्षेत्रांत पोहोचू शकायचा नाही. आता मात्र हिंदुस्थानी सैन्याकडून चीनला त्वरित प्रत्युत्तर दिले जात आहे, घुसखोरी अडवली जात आहे. कारण तिथपर्यंत आपण पोहोचू शकत आहोत.

अंतर्गत राजकारणाची परिणती

आता प्रश्न निर्माण होतो तो चीनच्या या आक्रमकतेमागचे नेमके कारण काय? यास चीनचे अंतर्गत राजकारण हे प्रामुख्याने जबाबदार आहे. कोरोनाचा फार मोठा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. चीनमधील जवळपास 50 टक्के उद्योग बंद पडलेले होते, ते हळूहळू सुरू झाले आहेत. चीनमध्ये बेकारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोनाचे प्रकरण हाताळण्यामध्ये शी जिनिंपग यांना कमालीचे अपयश आले आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी यापूर्वीच वुहानच्या प्रयोगशाळेतील वटवाघळांवरील संशोधन आणि तत्सम काही प्रयोग बंद करण्यास सांगितले होते. पण चीनने त्याकडे दुर्लक्ष केले. किंबहुना, कोरोनाचे पहिले रुग्ण आढळल्यानंतरही 6 आठवडे चीनने कसलीच काळजी न घेतल्याने हा प्रसार वाढत गेला. चीनने कोरोनाबाधितांचा जाहीर केलेला आकडा काही हजार असला तरी तो धादांत खोटा असून प्रत्यक्षात चीनमध्ये काही लाख जणांना या विषाणूने ग्रासल्याची शक्यता आहे. या सर्वांमुळे चीनमधील जनतेत प्रचंड रागाची भावना आहे. अशा स्थितीत चीनमधील साम्यवादी पक्षाला जिनिंपग यांचे नेतृत्त्व किती कणखर आहे हे दाखवायचे आहे. 2028 पर्यंत त्यांना अध्यक्ष म्हणून ठेवायचे आहे. अशा वेळी जनतेचा असंतोष साम्यवादी पक्षाला परवडणारा नाही. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सध्या चीनमधील नेतृत्व आणि सरकार करत आहे.

जिनिंपग यांचे नेतृत्व कणखर असल्याचे ठसवण्यासाठी चीनच्या राष्ट्रवादी भावनेला हात घालणारे मुद्दे उकरून काढले जात आहेत. हिंदुस्थान-चीन सीमावाद, दक्षिण चीन समुद्र, हाँगकाँगचा प्रश्न या सर्वांच्या माध्यमातून चिनी जनतेला, लष्कराला भावनिक आवाहन केले जात आहे. त्यातून जिनिंपग यांच्या अपयशावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न होत आहे.

हिंदुस्थानवर रोष का?

1) मागील महिन्यामध्ये हिंदुस्थान सरकारने हिंदुस्थानात चीनमधून एक डॉलरचीही गुंतवणूक केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय होणार नाही असे जाहीर केले. हिंदुस्थानी उद्योगव्यवसाय आणि अर्थकारण कोरोनाचा गैरफायदा घेऊन ताब्यात घेण्याचा चीनचा कपटी डाव होता; पण त्याला आता शह दिला गेला आहे. यामुळे बिथरून चीनने हिंदुस्थानला `आम्ही वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा बंद करू’ अशी धमकीही दिली. 2) कोरोनाच्या प्रश्नावरून आंतरराष्ट्रीय राजकारणात चीन एकटा पडत आहे. हिंदुस्थानसह जवळपास 60 देशांनी चीनच्या चौकशीची मागणी केली आहे. ही चौकशी जागतिक आरोग्य संघटनेमार्फत होणार आहे. या संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे हिंदुस्थानचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे नुकतीच आली आहेत. यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे. 3) पाश्चिमात्य आणि अमेरिकन माध्यमांमधून हिंदुस्थानची एका नव्या दृाष्टिकोनातून चर्चा होत आहे. हिंदुस्थान हा जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनू शकतो का, असा विचार पुढे आणला जात आहे. आजवर बहुतांश देश प्रमाणापेक्षा जास्त चीनवर विसंबून होते. पण याचा गैरफायदा चीनने घेतला. त्यामुळे चीनची विश्वासार्हता घटली असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या चीनला सोडचिठ्ठी देऊन हिंदुस्थान व अन्य देशांकडे वळण्याच्या मन:स्थितीत आहेत. गेल्या दोन महिन्यांत जवळपास 1100 कंपन्यांनी चीनमधून आपले उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यातील अनेक कंपन्यांनी हिंदुस्थानला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. साहजिकच, यामुळे चीनचा पारा चढला आहे. `ग्लोबल टाइम्स’ या चीनच्या सरकारी वृत्तपत्रातील एका लेखातून हा राग दिसून आला आहे. या सर्वांमुळे हिंदुस्थानवर दबाव वाढवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. यासाठीच चीन सीमावादावर आक्रमक झाल्याचे दिसून आले.

हिंदुस्थान-चीन युद्ध होईल का?

हिंदुस्थान-चीन यांच्यातील संघर्ष कितीही टोकाला गेला तरी त्याची परिणती युद्धात होईल याची शक्यता फारशी नाही. हिंदुस्थान-चीनमध्ये 1962 च्या युद्धानंतर एकही युद्ध झालेले नाही. गेल्या 30 वर्षांत या सीमेवर एकदाही गोळीबार झालेला नाही. मागील काळात 73 दिवस डोकलामचा संघर्ष चालला; पण अचानक चीनने तेथून माघार घेतली. त्यामुळे आताही चीन युद्धाचे पाऊल उचलेल असे वाटत नाही. सध्या अनेक देशांशी चीनचे शत्रुत्व निर्माण झाले आहे. अशा वेळी हिंदुस्थानशी युद्धसंघर्षाचे पाऊल चीन उचलणार नाही. कारण तसे झाले तर तो संघर्ष केवळ हिंदुस्थान-चीन यांच्यात राहणार नाही. अमेरिकेची मोठी मदत हिंदुस्थानला मिळेल. तसेच 1962चा हिंदुस्थान आज राहिलेला नाही; हिंदुस्थानची आर्थिक, सामरिक आणि राजनैतिक क्षमता प्रचंड वाढलेली आहे, आशिया खंडातील एक मोठी सत्ता म्हणून हिंदुस्थान पुढे आला आहे हे सर्व चीन जाणून आहे. त्यामुळेच दबाव आणून हिंदुस्थानने आपल्याविरुद्ध जाऊ नये असा प्रयत्न चीन करत राहील.

(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या