गोलमटोल कचोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

प्रत्येक प्रांत स्वतःचं खाद्यवैशिष्टय़ जपून आहे. त्या त्या प्रांताच्या गरजेनुसार पदार्थ जन्माला येतात. दीर्घ प्रवासाच्या सोयीसाठी जन्माला आलेला असाच पदार्थ म्हणजे कचोरी. या कचोरीची ही खमंग गोष्ट…

मारवाड प्रांतात कचोरी जन्माला आली असं म्हणता येईल. राजस्थानच्या वाळवंटाला लागून असलेल्या मारवाडमधून अनेक व्यापाऱयांची ये-जा होई. त्यांच्या नाश्त्याची सोय म्हणून कचोरीचा जन्म झाला. 400 वर्षांपूर्वी बनारसीदास यांच्या ‘अर्धकथानक’ पुस्तकात कचोरीचा उल्लेख येतो. दररोज प्रवासासाठी शेरभर कचोरी खरेदी केल्याचे बनारसीदास म्हणतात. प्रवासात उपयुक्त असण्याच्या गुणधर्मानेच कचोरी प्रसिद्ध झाली. विशेषकरून जोधपूरच्या मोगर कचोरीचं उदाहरण घेतलं तर आतल्या सारणाची कृती अशी की, अगदी वाळवंटातही पटकन कचोरी बनवता यावी. कचोरीत विशेषकरून वापरले जाणारे बडीशेप, धणे, हळद असे थंडे मसाले त्या उष्ण वातावरणाचा विचार करता त्या प्रांताला अगदी समर्पक! ही कचोरी प्रवासातून संपूर्ण देशभरात पसरली आणि तिने त्या त्या प्रांताप्रमाणे स्वतःत बदल केले.

कचोरी, कचुडी, कोचुरी… नाव काही असो, पण ती आवडीने खाल्ली जाते. सकाळचा वा संध्याकाळचा नाश्ता म्हणून ती फेमस आहे. समोसा अथवा वडय़ासारखं अमाप लोकप्रियतेचं भाग्य कचोरीच्या नशिबी नाही, पण तरी आपल्या गोलगरगरीत आकारातून नवनव्या सारणांसह खवय्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न मात्र ती करत राहते.

महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झाल्यास एकच नाव समोर येतं- शेगावची कचोरी. तिरथराम करमचंद शर्मा यांचं नाव या शेगावच्या कचोरीमागे जोडलं गेलं आहे. 1945च्या आधीच कधीतरी तिरथरामजी लाहोर सोडून कुटुंबासह अमृतसरमध्ये दाखल झाले. उद्योग-व्यवसाय करून पोट भरणे हा एकच हेतू त्यांच्या समोर होता. त्यामुळे त्यांनी अमृतसरमध्ये कचोरीचे दुकान थाटले. नंतर ते मुंबईत दाखल झाले. त्या काळी रेल्वे स्टेशन स्टॉलचं टेंडर नुकतंच निघालं होतं. ते तिरथराम यांनी मिळवलं आणि अमृतसरच्या कचोरी व्यवसायाच्या अनुभवाच्या जोरावर शेगाव स्टेशनात कचोरी विकायला सुरुवात केली. या कचोरीची चव खास वेगळी होती. गजानन महाराजांच्या भक्तांनी या कचोरीला पसंती दिली आणि ही कचोरी देशभरात ‘शेगावची कचोरी’ या नावासह लोकप्रिय झाली. शेगावच्या कचोरीला भौगोलिक चिन्हांकन प्राप्त झालं आहे ही विशेष बाब. शेगावची फ्रोझन कचोरी परदेशातही पोहोचली आहे.

मुगडाळीचा मुबलक वापर असणारी जोधपूरची मोगर कचोरी जितकी फेमस तितकीच चांदीच्या वर्खात मिरवणारी मावा कचोरी भाव खाऊन जाते. बंगालमध्ये उडीद डाळीसह मुबलक हिंगात न्हाऊन तीच हिंग कचोरी होते, तर गुजरातमध्ये आकार बदलून ताजी ताजी खाण्याजोगी ती ‘लिलवा ना घुगरा’ बनते. यूपीची राज किंवा खस्ता कचोरी तर अनेकांची आवडती. स्थानमाहात्म्याचा मोठाच परिणाम कचोरीवर झालेला दिसतो.