ठसा – किशोर नांदलसकर

>> प्रशांत गौतम

विनोदाचे अफलातून टायमिंग साधणारे कलाकार अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलसकर हे मराठी चित्रपट, नाटक यातील छोटय़ा भूमिकांनी रसिकांच्या कायम लक्षात राहिलेले होते. कोरोनामुळे त्यांचे झालेले निधन हे अतिशय क्लेषदायक म्हणावे लागेल.

आपल्या वाटय़ाला आलेली भूमिका मग ती कोणतीही असो. त्यात जीव ओतून भूमिका साकारणारे कलावंत रसिकांच्या नेहमीच लक्षात राहत असतात. किशोरजींना अभिनयाचा समर्थ वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला होता. खारेपाटणजवळील शेजवली हे त्यांचे मूळ गाव. जन्म मुंबईत झाला. लॅमिग्टंन रोड, नागपाडा आणि परळच्या भोईवाडय़ात त्यांनी बरेचसे आयुष्य व्यतित केले. नोकरीत असतानाच त्यांना कामगार नाटय़ स्पर्धेने भारावून टाकले होते. आपल्यातील अभिनयाची आवड त्यांनी नोकरी करून जोपासली. भूमिका छोटी असली तरी त्यांनी ती वैशिष्टय़पूर्ण अंगाने तथा विनोदी शैलीने जिवंत केली. चाळीसेक नाटकं, 25 हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट.

विविध मालिकांमधून त्यांनी काम केले. मुंबईतील ‘न्यू इरा हायस्कूलमध्ये शिकत असतानाच त्यांना त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून अभिनयाचेही शिक्षण मिळत होते. या अनुभवाच्या बळावर किशोरजींचा अभिनयाचा प्रवास विविधांगी होत गेला. 1989 च्या सुमारास त्यांनी ‘इना मिका डिका’ या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. रंगभूमी, दूरदर्शन किंवा मराठी, हिंदी चित्रपट यासारखे कोणतेही माध्यम असो. कोणतीही छोटी भूमिका असो. त्यात विनोदाचे अचूक टायमिंग साधणे ही त्यांची खासियतच होती. 1980 च्या सुमारास दूरदर्शनवर ‘गजरा’ हा लोकप्रिय कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामधून नांदलसकर यांना नवीन ओळख मिळाली. नाना करते प्यार, सारे सज्जन, शेजारी शेजारी, हळद रूसली, कुंकू हसले, चल आटप लवकर, भ्रमाचा भोपळा. पाहुणा, श्रीमान-श्रीमती भोळे, डॅम्बिस, वन रूम किचन, नवरे सगळे गाढव, वासूची सासू अशा चित्रपट, मराठी नाटकांतून त्यांनी रसिक प्रेsक्षकांना भरभरून हसवले. विच्छा माझी पुरी करा, या वगनाटय़ात त्यांनी राजाची भूमिका साकारली होती.

महेश मांजरेकर यांच्या वास्तव चित्रपटातून त्यांचा बॉलीवूडमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर त्यांना जिस देशमे गंगा रहता है, तेरा मेरा साथ, खाकी, ये तेरा घर, ये मेरा घर, हलचल, सिंघम, प्राण जाय पर शान न जाए अशा त्यांच्या छोटय़ा भूमिकांनी गाजलेल्या व लोकप्रिय झालेल्या हिंदी चित्रपटांची नावे सांगता येतील. कलावंत आपले ताण-तणाव, दुःख विसरून रसिक प्रेक्षकांना हसवून त्यांचे मनोरंजन करीत असतात. आणि किशोर नांदलसकर यांच्यासारख्या प्रतिभावंत अभिनेत्यांचा प्रवास हा कामगार वर्गातून झालेला होता. अशा या प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱया विनोदवीराची अखेर वयाच्या 80 व्या वर्षी कोरोनामुळे व्हावी, हे नक्कीच मनाला वेदना देणारे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या