गावाकडे जाण्याची ओढ आणि मानसिक द्वंद्व

1025

>> जयेंद्र धाकोजी राणे

मुंबईतील हजारो कोकणवासीयांची उन्हाळ्याच्या सुटीत कोकणातील गावी जाऊन दरवर्षीप्रमाणे मजा करण्याच्या इच्छेवर यंदा कोरोनाच्या साथीमुळे पाणी फेरले गेले आहे. त्यात लॉक डाऊन आणि गावागावात पसरलेली कोरोनाची दहशत यामुळे मुंबईतील चाकरमानी आणि त्यांचे गावातील हितसंबंधी यांच्यात एक प्रकारचे मानसिक द्वंद्व दुर्दैवाने दिसत आहे. कोरोना महामारीचा विचार करता यात दोष तरी कोणाला देणार? दुसरीकडे गावी जाण्याची ओढदेखील गैर कशी ठरवता येईल? पण गावी जायच्या इच्छेला एकूण परिस्थिती पाहता यंदा मुरड घालणे हाच व्यवहार्य पर्याय आहे. सरकारनेही तसेच आवाहन केले आहे. तरीही या मानसिक अटीतटीच्या ठिणग्या सोशल मीडिया वर उडताना दिसतच आहेत…

कोकणातल्या बाबल्यांचे डोळे खाड्कन उगाडनारी पोस्ट हा ही. झोंबली तरी चालात, पण त्यांका कळाक होया, म्हणान मुद्दाम लिवूचा कारण येवा कोकण आपलाच आसा ही म्हणसुद्धा कागदावरच राहिली. उलट आयुष्यभर मुंबईत चाकरमानी राबला, पण त्याच्या अडचणीला कोणी कोकणातली हाक नाय आली.

इतर राज्यांत कोरोनाचे रुग्ण नाहीत का? कोकणात काही व्यवस्था व सोयी होऊ शकत नाहीत का? आजपर्यंत गावी कोणीही मोठय़ा आजाराने ग्रस्त असला तर मुंबईकर चाकरमानी त्याला सर्वतोपरी मदत करून मुंबई, पुणे याठिकाणी आणून चांगले उपचार करतो, तेही आपल्या घरी ठेवून. मुंबईकर चाकरमानी कधीही आपल्या कर्तव्यापासून दूर गेला नाही. इतर राज्यांच्या लोकांनी संपूर्ण देशात राबत असलेल्या आपल्या लोकांना जसे असाल त्या परिस्थितीत आपल्या घरी निघून या असे फोन करून कळवले आणि त्या त्या प्रांतात त्यांना सामावून घेतले. आपल्याकडे मात्र तुम्ही आहात तेथेच थांबा, इकडे येऊ नका, असेच निरोप धाडले गेले, जात आहेत. कोरोनाच्या लढाईत तलवारी आधीच म्यानात घालून बसणे यालाच म्हणावे लागेल.

निदान तुमचे जे खरोखरच मुंबईत भाडय़ाने, छोटय़ा झोपडीत किंवा उपासमारीने त्रासलेले आहेत त्यांना तरी कोणी मोठय़ा मनाने गावी पाठवा असे कोणी बोलतोय का, तर नाही. फक्त स्वत:चा विरोध आहे हे उघड होईल म्हणून ठामपंचायतीचे नाव पुढे केले जात आहे. जे गाव एकजुटीने करेल, ते ठामपंचायत एकटी करेल का?

आता तर एक आयतं कारणच मिळाले आहे ते म्हणजे राज्य सरकारने निर्णय दिला आहे की, रेड झोनवाले कोकणातच नव्हे तर कोणत्याही जिह्यात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आम्ही गावातून काही करू शकत नाही. खरं म्हणजे केलं तर सगळं होतं. त्यासाठी एकी असली पाहिजे. हाती निराशा आली तरी प्रयत्न करत राहिले पाहिजेत. ते न करता फक्त कारण पुढे करणे योग्य नाही. असं कोणीही बोलत नाही की, तुम्ही गावी या, आम्ही तुमची जवाबदारी घेतो. गैरसोय झाली तरी ती सहन करतो. उदा. राहण्यासाठी शाळा, कॉलेज, बंद घरे देतो, ते कमी पडत असतील, तर मांडव बांधून देतो. संडास-बाथरुम कमी पडत असतील तर नवीन उभे करतो, पण असं कोणीच नाही बोलत.

मुंबईतील आपल्या भावंडांना आंबे खायला कसे मिळतील? कोणाची गाडी जाणार आहे? केव्हा जाणार आहे? कुठल्या मार्गाने जाणार आहे? याची चौकशी किंवा प्रयत्न गावाकडची मंडळी करीत आहेत, पण मुंबईमधील मंडळी गावी कशी येईल? याची चौकशी किंवा प्रयत्न करत नाही. कित्येकांनी तर, मुंबईतील आपली भावंडे येतील म्हणून फोन करणेही बंद केले आहे. जणू काही प्रत्येक मुंबईकराला कोरोना झाला आहे आणि तो गावी आल्याआल्या त्यांच्यासह गावातील लोकांना मिठय़ा मारत बसेल. त्यामुळे सर्वाना लागण होईल आणि स्वत: मात्र कोरोनामुक्त होईल, अशी एक विचित्र मानसिकता कोरोनाच्या भीतीतून गावाकडे तयार झाली आहे.

जर कोणी इमर्जन्सी गावी गेला, तर एखाद्या गुन्हेगाराला किंवा कैद्याला वागणूक देतात तशी वागणूक दिली जाते आहे. शेजाऱयापाजाऱयांच्या नजरा बदलल्या आहेत. यात कुठेतरी माणुसकी मरत चालली आहे, हे लक्षात येते. गाववाले सरकारचे सगळं ऐकतात मग त्याच सरकारने सांगितले आहे की, ‘रोगाशी लढा, रोग्याशी नको.’ मात्र गावाकडे याच्या उलट चित्र आहे.

आंब्याची गाडी मुंबई आणि पुण्यात ‘रेड झोन’मध्ये सगळीकडे फिरते. मुंबई, उपनगर, पालघर, ठाणे जिल्हा, नवी मुंबई (रायगड), पुणे जिल्हा अशा सर्व ठिकाणी फिरून परत गावात जाते. याचा अर्थ असा झाला की, चार गावं फिरुन गावात गेलेल्या गाडीच्या वाहकाला आणि चालकाला कोरोनाची लागण झालेली नसते, पण ‘चार भिंतींच्या आत’ असलेला मुंबईकर मात्र गावी जाताना कोरोना घेऊनच येऊ शकतो, असा विचित्र तर्क लावला जात आहे. रेड झोनमधून आंब्याची गाडी गावी घेऊन गेलेल्या वाहक आणि चालकाला कसल्याही अटी आणि नियम नाहीत, पण रेड झोनमधून ‘चाकरमानी’ गावी गेला तर त्याला सर्व अटी आणि नियम लागू. ‘चाकरमान्यां’नी त्याचीही मनाची तयारी केली आहे. जे काही करायचे आहे, ते गावातील लोकांवर अवलंबून आहे.

जर आपले कुटुंबीय आले, तर त्यांना कोठेतरी गावापासून दूर ठेऊ, झाडाखाली तंबू बांधू, जेवणासाठी लागणारे सामान, पाणी पुरवू, वाटल्यास जेवण देऊ आणि आपले कुटुंब कसेतरी वाचवू. नाहीतरी मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता वाढतच जाणार आहेत. तेव्हा डॉक्टर काही चंद्रावरुन येणार नाही. मुंबईकरांना म्हणजेच चाकरमान्यांना येथे तसेच ठेवण्यापेक्षा गावी येऊ दे, आम्ही त्यांची काळजी घेऊ असे गावाकडील लोकांनी म्हणायला हवे. कोरोना काही दूरून अंगावर उडी मारत नाही. जर मुंबईत या परिस्थितीतही मुंबईकर स्वत:ची नीट काळजी घेत आहे, गावाकडे तर मोकळी जागा आहे. सुखाने राहतील, पण असे प्रेमाने, कळकळीने सांगणारे आतापर्यंत कितीजण पुढे आले?

अजूनही वेळ गेली नाही. स्थिती भयानक आहे. आतातरी विचार बदला. नाहीतर ‘मेल्यावर आम्ही असे केले असते, तसे केले असते,’ हे सांगाल नेहमीच्या सवयीप्रमाणे.

आपली प्रतिक्रिया द्या