>> जे. डी. पराडकर
कोकणातील कातळसड्यावर फुलणारी दीपकाडी. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दीपकाडीला बहर येतो. केवळ पंधरा दिवसांचाच बहर असणारी पांढरीशुभ्र दीपकाडी जणू पांढऱ्या दुलईप्रमाणे भासते. कास पठाराप्रमाणेच पर्यटकांनाही आता ही दीपकाडी खुणावू लागली आहे.
पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य असे काही बहरते की, पाहणाऱ्याची दृष्टी हा विलोभनीय नजारा आपल्या मनात साठवण्यासाठी कमी पडेल. जिकडे पहावे तिकडे माळरानावर रंगीबेरंगी फुले वाऱ्याच्या मंद लहरींवर डोलत असल्याचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. संगमेश्वरपासून देवरुखला जात असताना साडवलीनजीकच्या मार्गावर दुतर्फा जुलै अखेर आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला हजारोंच्या संख्येने पांढरी फुले दिसू लागतात. येथील जवळपास 17 एकरांचा परिसर या पांढऱ्या फुलांनी भरून जातो. या परिसराने जणू पांढऱ्या रंगाची चादरच ओढून घेतली आहे, असा पाहणाऱयांना भास होतो. केवळ दोन आठवडे एवढय़ाच कालावधीसाठी बहरणाऱ्या या फुलांचे ‘दीपकाडी’ असे नाव आहे. संकटग्रस्त प्रजाती म्हणून दीपकाडी ओळखली जाते. दीपकाडी फुलणाऱ्या कातळाचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले आहेत. दीपकाडी महोत्सव भरवून सृष्टी ज्ञान संस्था, मातृमंदिरसारख्या सामाजिक संस्था या संकटग्रस्त प्रजातीचे संरक्षण व्हावे म्हणून प्रयत्न करत आहेत. पहिला दीपकाडी महोत्सव 5 ऑगस्ट 2022 रोजी झाला.
या कोकणातील कातळसड्यावर फुलणाऱ्या वनस्पतीचे मोजकेच अधिवास आता शिल्लक राहिले आहेत. त्यात देवरुखमधील साडवलीचा समावेश आहे. साडवलीच्या सड्यावरील या दीपकाडीच्या नव्या वाणाची नोंदही घाली आहे. याबाबत माहिती देताना डॉक्टर मिरगल यांनी सांगितले की, एकदांडी या वनस्पतीचे शास्त्रीय नाव दीपकॅडी कोकणेन्स (Dipcadi concanense) असे असून तिचे अस्तित्व फक्त कोकणात आणि तेही केवळ रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यात मर्यादित ठिकाणी नोंदवले गेले आहे. काही वर्षांपूर्वी याच वनस्पतीचे नवीन अस्तित्व गोव्यातील मोपा विमानतळानजीक अधिक अस्तित्व म्हणून नोंदवण्यात आले. कोकणात अतिशय तुरळक ठिकाणी, मात्र संख्येने भरपूर प्रमाणात वाढणाऱ्या या वनस्पतीचे अस्तित्व दोन्ही जिह्यांत मिळून एकूण फक्त 23 ठिकाणी असल्याचे आढळले आहे. त्यापैकी 19 ठिकाणे रत्नागिरी जिह्यातील असून उरलेली पाच सिंधुदुर्ग जिह्यातील आहेत. रत्नागिरी जिह्यातील साडवली (देवरुख), रत्नागिरी विमानतळ, जैतापूर, सागवे, देवाचे गोठणे आणि सिंधुदुर्ग जिह्यातील तळेरे व चिपी (सिंधुदुर्ग विमानतळ) ही या वनस्पतीच्या आढळाची प्रमुख ठिकाणे आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दीपकाडीला बहर येतो. कातळाच्या अंगाअंगावर निसर्गाची रंगीबेरंगी रूपे पाहायला मिळतात. मात्र याकडे अजून पर्यटकांची पावले वळलेली नाहीत. सड्याची ही संपत्ती कोकणात ठिकठिकाणी विखुरली आहे. कातळाला वेगळे सौंदर्य आढळणाऱ्या रत्नागिरी जिह्यात साडवली ते विघ्रवली या परिसरात दीपकाडी आपल्या शुभ्रफुलांनी कातळाला वेगळेच सौंदर्य देते. यासह राजापूरचा सडा प्रामुख्याने जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाचा परिसर अर्थात जैतापूरचे पठार, देवाचे गोठणे, रत्नागिरीनजीकचा विमानतळ परिसर, चंपक मैदान यासह संगमेश्वरनजीकच्या कोळंबे येथे दीपकाडी मोठय़ा प्रमाणावर आढळते. इतर ठिकाणीही ती डोकावत असतेच. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दीपकाडीला बहर येतो. आणखी दोन आठवडय़ांत त्याच्या बिया गायब होतात. जमिनीखालील कंद शिल्लक राहतो. मग बिया रुजण्यासाठी पडतात. त्या पुढील वर्षी फुलताना दिसतात. प्रतिकूल परिस्थितीत ती वाढतात. हा नजारा 15 ते 20 दिवसच असतो. फक्त सौंदर्यापुरती दीपकाडी मर्यादित नाही. 15 दिवसांच्या हंगामात हजारो फुले डोलतात. त्यावर लाखो मधमाश्या रुंजी घालत असतात. विशेष म्हणजे, नागपंचमीला या फुलाचे गजरेही करतात.
आययूसीएनच्या लाल यादीत संकटग्रस्त प्रजाती म्हणून स्थान असलेली एकदांडी म्हणजेच दीपकाडी कोकणेन्स या प्रजातीच्या नव्या वाणाची नोंद झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील सड्यावरून या वाणाची नोंद केली असून त्याचे नाव देवरुखेन्स असे ठेवले आहे. नव्या वाणाच्या नोंदीमुळे देवरुखमधील सडय़ांचे जैविक महत्त्व अधोरेखित झाले आहे.
हिंदुस्थानातील दीपकाडी प्रजातीच्या वर्गीकरणावर हेन्सल रॉड्रिक्स, सुचंद्रा दत्ता आणि किरण चक्राल हे वनस्पतीशास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. या अभ्यासदरम्यान त्यांनी दीपकाडी कोकणेन्स या प्रजातीच्या देवरुखेन्स या नव्या वाणाची नोंद केली आहे. यासंदर्भातील संशोधन फायटोटॅक्सा या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे. एका प्रजातीमधून नव्या प्रजातीची निर्मिती ही हजारो वर्षांच्या कालावधीत होते. या विकासाच्या प्रक्रियेत प्रजातीत अनेक बदल होतात आणि हे नवे बदल म्हणजे त्यांचे विविध वाण असतात. साडवलीच्या सड्यावर आढळणाऱ्या दीपकाडी कोकणेन्सच्या प्रजातीमध्ये रत्नागिरीत आढणाऱ्या दीपकाडी कोकणेन्सपेक्षा आकार शास्त्राच्या अनुषंगाने काही बदल जाणवले.
ऑगस्ट महिन्यात साडवलीच्या माळरानावर फुलणारी दीपकाडी पाहण्यासाठी आता पर्यटकांनीदेखील संगमेश्वर तालुक्यात यावे, यासाठी वनविभागासह निसर्गविषयक काम करणाऱ्या विविध संस्थांनी पुढाकार घेऊन मोठय़ा प्रमाणावर दीपकाडी महोत्सवाचे आयोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे कोकणातील पावसाळी पर्यटनालादेखील चालना मिळेल आणि दीपकाडीसारख्या संकटग्रस्त प्रजातीबाबत अधिक माहिती मिळाल्याने त्याचे संवर्धनदेखील होऊ शकेल. कोकणातील काही भाग पावसाळ्यामधील रानफुलांच्या या सुंदर नजाऱयांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात कोकणाच्या विविध भागांतील कातळ आणि सडे रंगीबेरंगी होऊन जातात. कास पठाराप्रमाणे कोकणच्या रत्नागिरी जिह्यातील सड्यावरील फुलणारी ही फुले पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण भूमिका आगामी काळात बजावणार आहेत. दीपकाडीच्या नव्या वाणाची झालेली नोंद भविष्यातील कोकणच्या नैसर्गिक पर्यटनाची नांदीच ठरणार आहे.