
>> वैश्विक
पृथ्वीवरच्या प्राण्यांप्रमाणेच अनेक तारेसुद्धा जुळे किंवा तिळे अथवा त्याहूनही अधिक संख्येने ‘जन्मलेले’ असतात. अर्थात प्राण्यांमधल्या ‘जुळ्यां’चा जन्म ‘सहोदर’ म्हणून होतो. ताऱ्यांच्या जुळेपणात तसेच असेल असे नाही. एखादा बलाढय़ तारा त्याच्या गुरुत्वाकर्षणाने तुलनेने लहान असलेल्या ताऱ्याला स्वतःभोवती फिरत ठेवतो आणि ती संरचना ‘जुळी’ किंवा ‘तिळी’ वगैरे म्हटली जाते. हे आपल्या आकलनासाठीचे जैविक परिमाण इतकेच. आपल्या सूर्यालासुद्धा कोणे एकेकाळी ‘जुळा’ भाऊ होता असं म्हटलं जातं (सध्या मात्र सूर्य एकटाचा आहे). पाश्चात्य अशा ‘बायनरी’ (द्वैती किंवा जुळ्या) ताऱयांना ‘कम्पॅनियन’ म्हणतात. त्यासाठी आपला द्वैती शब्द जास्त योग्य वाटतो, पण ‘जुळा’ म्हटल्यावर ‘जोडगोळी’ची प्रतिमा चटकन स्पष्ट होते आणि संकल्पना समजते. त्यामुळे आधी जाणिवेसाठी सोपे शब्द वापरून मग त्याचे सखोल स्पष्टीकरण दिले तर विज्ञानही ‘कठीण’ किंवा बोजड वाटणार नाही.
आपल्या मिल्की वे किंवा आकाशगंगेतील दीर्घिकेतसुद्धा सुमारे 200 अब्ज ताऱयांपैकी 100 ते 133 अब्ज ताऱ्यांना ‘साथीदार’ (बायनरी) आहेत. संपूर्ण विश्वात अशा अब्जावधी दीर्घिका असून त्यातील ताऱयांची गणना करणं कठीणच, परंतु शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने आपल्याच आकाशगंगेतील ताऱयांपैकी 80 टक्के ‘जुळे’ असतील तर विश्वातील इतर दीर्घिकांमध्येही तसंच प्रमाण असणार असं अनुमान काढता येतं.
आता हा कम्पॅनियन किंवा ‘जुळ्या’चा प्रकार केवळ ताऱयांपुरताच मर्यादित आहे असं नाही. अनेक ग्रहसुद्धा ‘द्वैती’ असू शकतात. मात्र त्यांना खुजे (ड्वार्फ) ग्रह म्हटलं जातं. 2004 मध्ये ‘प्लुटो’चं ग्रहपद ज्या कारणांमुळे गेलं त्याला त्याचा ‘उपग्रह’ मानला गेलेला शेरॉन हा ‘प्लुटो’चा अंकित नसून ते दोघे परस्परांभोवती फिरतात हे सिद्ध झालं. याचं कारण त्या दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा मध्यबिंदू दोघांमधल्या अंतराळात येतो.
आपल्या पृथ्वीचा चंद्र हा निःसंशय उपग्रह आहे. कारण दोघांचं गुरुत्वीय पेंद्र पृथ्वीच्या कवचाखाली 1100 किलोमीटर इतकं आत आहे. त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो असं निश्चित म्हणता येतं. हेच गुरुत्वमध्य केंद्र पृथ्वीबाहेर काही किलोमीटर असते तरी ते केवळ पृथ्वीच्या नव्हे, तर पृथ्वी-चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम ठरून चंद्र-पृथ्वी जोड ग्रह ठरले असते.
आपल्या सूर्याचं वस्तुमान संपूर्ण ग्रहमालेच्या तुलनेत सुमारे 98 टक्के असल्याने सर्व ग्रहांचे एकत्रित गुरुत्वाकर्षण पेंद्रकसुद्धा सूर्यातच दडलेले आहे. म्हणून एवढी विशाल आणि अब्जापेक्षा अधिक किलोमीटर पसरलेली सूर्यमाला सूर्याच्या ‘अंकित’ असते.
आजचा विषय ‘मृग’ या ठळक आणि सुंदर नक्षत्र किंवा तारकासमूहातल्या बिटेलज्युज या लाल महाताऱयाच्या साथीदाराचा. या बिटेलज्युजच्या उच्चाराबाबत बरीच भिन्नता आहे. जर्मन बेटलज्युझ म्हणतात. कोणी बेटलय्युज अथवा बेटज्युससुद्धा म्हणतात, पण उच्चारात काय आहे? मुद्दा आहे तो या ताऱयाच्या वैशिष्टय़ांचा.
बिटेलज्युज किंवा काक्षी किंवा भरत हा तारा लाल रंगाचा आहे. याचा अर्थ त्यातील हायड्रोजनचं हिलियममध्ये रूपांतर करणारी इंधन प्रक्रिया मंदावली असून त्याच्या मूळ आकारापेक्षा तो विस्तारून मोठा झाला आहे. त्याचा रंग ताऱयांच्या नेहमीच्या तेजस्वीतेसारखा राहिला नसून लाल झाल्यामुळे ही सारी लक्षणे त्याचा अंतःकाळ जवळ आल्याचे दर्शवतात. या ताऱयाचा कोणत्याही क्षणी विस्पह्ट होऊन तिथे एक सुपरनोव्हा व त्यातून न्युट्रॉन तारा किंवा कृष्णविवर तयार होऊ शकते. त्याचे प्रसरण हेच दर्शवते. काक्षी तारा सूर्याच्या तुलनेत वयाने अगदीच बच्चा किंवा कालचा म्हणता येईल. सूर्य 5 अब्ज वर्षांपूर्वी जन्माला आला, तर काक्षी हा त्याच्या 600 ते 700 पट त्रिज्या असलेला महारक्तवर्णी तारा केवळ 1 कोटी वर्षांपूर्वी जन्मला हे विस्मयकारी वाटेल. म्हणजे तो आपल्या पृथ्वी, चंद्रापेक्षाही वयाने लहान.
काक्षी पिंवा भरत या मृत्युपंथाला लागलेल्या ताऱयासारखीच आपल्या सूर्याची अवस्था आणखी 5 अब्ज वर्षांनी होईल. त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला काक्षीच्या रूपाने अवकाशात दिसतं. या काक्षीला मात्र त्याच्या जन्माच्या वेळीच लाभलेला एक साथीदार असून त्याच्या या जुळ्या भावाचं नाव आहे सिवाऱ्हा. काक्षी तारा 2020 मध्ये अंधूक दिसू लागला तेव्हा त्याची लाली वाढून विस्पह्ट होण्याची अपेक्षा करणाऱया अभ्यासकांना नवल वाटलं. बिटेलज्युजच्या बायनरीची चर्चा मात्र खगोल अभ्यासकांमध्ये 1968 पासून सुरू झाली होती. काक्षी मध्येच अंधूक दिसण्याचं कारण कॉस्मिक डस्ट हे लक्षात आलं.
सिवाऱहा हा काक्षीचा जोडतारा असण्याचं तसंच तो सूर्याच्या 1.17 वस्तुमानाचा आणि सूर्य-पृथ्वी अंतराच्या साडेआठ पट (1 अब्ज 20 कोटी किमी) अंतरावरून काक्षीभोवती पृथ्वीच्या तुलनेत 5.78 वर्षांनी परिक्रमा पूर्ण करणारा जोडतारा असल्याची निश्चिती झाली. काक्षीचा नवतारा होण्यापूर्वीच हा सिवाऱहा येत्या 10 हजार वर्षांत त्यामध्ये विलीन होईल असा अंदाज आहे. ‘जेमिनी नॉर्थ वेधशाळे’ने 2020 मध्ये त्याचे बारकाईने निरीक्षण केले. आकाशदर्शनाची आवड असणाऱयांनी मात्र लाल काक्षीचं निरीक्षण सुरू ठेवावं. कारण कोणत्याही क्षणी त्याचा विस्पह्ट होऊ शकतो. ज्येष्ठा हा वृश्चिक राशीतला ताराही असाच लाल महातारा आहे आणि तो लाल आहे याचाच अर्थ ‘म्हातारा’ही झालेला आहे!