मुद्दा – मराठी माणसाची भाषिक जबाबदारी

>> मनमोहन रो. रोगे

आज महाराष्ट्रात मराठी भाषेची अवस्था पाहिली तर आपण आपल्या मातृभाषेचे ऋण फेडण्यात फारच चूक केल्याचे लक्षात येईल. कोणतीही भाषा जिवंत ठेवून त्याचे संवर्धन करायचे म्हटले तर त्या भाषेचा दैनंदिन व्यवहारात आणि शासकीय कामकाजात 100 टक्के वापर होणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पाहिले तर आपले बरेचसे व्यवहार हिंदी, इंग्रजीत होतात. दोन मराठी माणसेही एकमेकांसोबत हिंदी, इंग्रजीत बोलतात. शासकीय कार्यालयात दरवर्षी मराठी भाषा पंधरवडा पाळला जातो, कार्यालयात मराठीचाच उपयोग करण्याचे अनेकदा आदेश काढले जातात आणि बरीच परिपत्रकं, आदेश इंग्रजीत काढले जातात. शाळा – विद्यालये ही भाषा संवर्धनाची प्रमुख केंद्रं, पण आज राज्यात मराठी शाळांची अवस्था काय आहे? आपली मुले मराठी माध्यमात शिकली तर त्यांना चांगला नोकरीधंदा मिळणार नाही या साधार भीतीने गावोगावच्या मराठी शाळा बंद होत आहेत. मराठी भाषेबद्दली अनास्था, उदासीनता संपणे गरजेचे आहे. म्हणूनच मराठी भाषा जिवंत ठेवून संवर्धन करण्यासाठी ‘महाराष्ट्रात फक्त मराठी’ असा नियम असावा.

दुसरी महत्त्वाची गोष्ट भाषेच्या शुद्धतेविषयी आपण जागृत असायला हवे. कित्येकांना ‘न’ आणि ‘ण’ यातील, ‘ल’ आणि ‘ळ’ यातील भेद कळत नाही, तर काही जणांना लिंगभेदही कळत नाही. अशा महाभागांमुळे भाषा अशुद्ध होते. तशी प्रांत – विभाग, जिल्हा, जाती – जमातीप्रमाणे भाषा बोलण्याच्या पद्धतीत फरक होत जातो. काही शब्द इतरांना कळतही नाहीत, पण अशा वेगवेगळ्या बोलण्याच्या लकबींमुळे भाषा अशुद्ध न होता त्याचा गोडवा वाढतो. सध्या खासगी वृत्तवाहिन्यांवरील बातमीदार व निवेदक जी मराठी भाषा बोलतात, लिहितात तो प्रकार मात्र संतापजनक आहे. वाक्यरचना, लिंगभेद यांचा गंध नसलेले जागोजागी बसलेले आहेत आणि ते निरंकुश आहेत याची गंभीर दखल मराठी भाषिकांनी, सांस्कृतिक खाते आणि संबंधितांनी घ्यायला हवी. या वाहिन्यांवर मराठी विभागासाठी मराठीच्या उत्तम जाणकार व्यक्तींची निवड व्हायला हवी, नाहीतर मराठी भाषेसाठी हा मोठा धोका ठरेल. भाषा संवर्धनाबरोबरच तिची शुद्धता जपणे तितकेच महत्त्वाचे आहे.

जो मराठीचा आग्रह करेल त्याने स्वतः तसे वागले पाहिजे. तसे होत नसेल तर ती मराठीशी प्रतारणा ठरेल. जे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी मराठी शाळांमध्ये काम करून आपला चरितार्थ चालवतात, वाडय़ा-वस्त्यांमध्ये फिरून लोकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवावे अशी विनंती करतात, ती मंडळीही आपल्या मुलांना चांगल्या भवितव्यासाठी इंग्रजी शाळेत शिकवतात. ही आपल्या कामाशी केलेली बेइमानी होय, पण त्याचे या मंडळींना जराही वाईट वाटत नाही.  सर्वसामान्य माणूस फार काही करू शकत नसला तरी तो स्वतः सर्वांशी मराठी तर बोलू शकतो, आपल्या मुला-नातवंडांना मराठी शाळेत तर धाडू शकतो. ज्याला जसे शक्य आहे तशी त्याने आपले कर्तव्य म्हणून मराठीच्या भवितव्याची काळजी घेतली पाहिजे, न्याय्य हक्कांवर बोलले- भांडले पाहिजे.

मी एकटा काय करणार या भूमिकेतून बाहेर पडून शक्य असेल त्या मार्गाने मराठीची सेवा केली पाहिजे. मराठीची चळवळ सार्वजनिक व्हायला हवी. स्वभाषेविषयी पोकळ अभिमान, खोटा कळवळा दाखवून मराठीच्या भवितव्याविषयी फुकाची चिंता करून आणि कोरडे उसासे सोडून काय उपयोग? प्रत्येक मराठी माणसाने आपल्यापरीने घराघरात, मनामनात मराठी पोहोचवण्यासाठी, मराठीचा सन्मान राखला जावा म्हणून, मराठीचे संवर्धन व्हावे म्हणून सतत दक्ष राहून प्रयत्न केले पाहिजेत. तरच तिला गतवैभव प्राप्त होईल. ते आपले प्रमुख कर्तव्य आहे याचा विसर पडू देता नये. पुढच्या पिढीकडे समृद्ध मराठी पोहोचवली पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे.