लोकमान्य  टिळक – एक युगपुरुष

770

>> प्रतीक राजूरकर

टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीजींनी लोकमान्यांना वाहिलेली श्रद्धांजली अतिशय बोलकी आहे. गांधीजी म्हणतात,‘‘टिळकांइतका जनमानसावर प्रभाव असणारा दुसरा लोकनेता नाही’’. टिळकांच्या आध्यात्मिक लिखाणाचा प्रभाव केवळ हिंदूंवरच झाला असे नाही. स्वातंत्र्यसेनानी हसरत मोहानी यांनी टिळकांच्या मृत्यूपश्चात केलेली उर्दू रचना टिळकांच्या लिखाणाचा इतर धर्मीयांवर झालेल्या प्रभावाची साक्ष देणारी आहे.

इसवी सन 1856 ते 1920 हे हिंदुस्थानच्या इतिहासात टिळक युग म्हणून लोकमान्य झाले. 64 वर्षांच्या आयुष्यात टिळकांनी विविध क्षेत्रांत आपला प्रभाव कायम ठेवला. स्वराज्याच्या जन्मसिद्ध अधिकाराची पारतंत्र्यातील हिंदुस्थानला जाणीव करून देणाऱया लोकमान्य टिळक यांनी सामान्य जनता, कष्टकरी, शेतकरी, कामगार अशा विविध समाजघटकांवर इंग्रज सत्तेकडून होणाऱया अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवला. पत्रकार, लोकनेता, मुत्सद्दी या आणि अशा वेगवेगळ्या भूमिका घेत टिळकांनी स्वराज्य आणि सुराज्याच्या दिशेने मोठी चळवळ उभी केली. आपल्या खंबीर नेतृत्वात त्या काळी जनमानसावर टिळक विचारांचे अधिराज्य वाढतच राहिले. टिळकांचे जहाल विचार, लेखन, भाषण आणि कृतीतून त्यांना असंतोषाचे जनक असे संबोधले जाऊ लागले. आज लोकमान्यांना जाऊन शंभर वर्षे झाली, पण तरीही टिळक युगाचे महत्त्व कायम आहे.

टिळक हे केवळ विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करत नव्हते. स्वराज्याचा विचार सर्व स्तरांतील लोकांत पोहोचावा म्हणून मराठीत ‘केसरी’ तर इंग्रजीत ‘मर्‍हाटा’ ही दोन वर्तमानपत्रे तत्कालीन इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आणत होती. त्यातील लिखाणामुळे टिळकांच्या विरोधात राजद्रोहाच्या खटल्यात शिक्षा होऊन त्यांना मंडाले येथे पाठवण्यात आले. त्याविरोधात मुंबईतील गिरणी कामगारांनी सहा दिवसांचा संप पुकारून जगाचे लक्ष वेधले होते. अभ्यासकांनी ‘हिंदुस्थानी कामगारांच्या इतिहासातील पहिला राजकीय संप’ म्हणून त्याचे वर्णन केले आहे. 1896-97 मध्ये देशात पडलेला दुष्काळ आणि मागोमाग आलेल्या प्लेगच्या संकटात टिळकांनी शेतकर्‍यांवर तसेच प्लेगग्रस्त नागरिकांवर होणाऱया अत्याचाराला वाचा फोडली. अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात टिळक अग्रेसर होते.

गांधीजींनी नामदार गोखले यांना गुरू मानले होते, परंतु अनेकदा गांधीजींनी टिळकांचा गुरू म्हणून उल्लेख केल्याची इतिहासात नोंद आढळते. तात्याराव सावरकरांच्या लिखाणातून, भाषणातून टिळकांचा गौरव केला गेला आहे. सावरकरांच्या तरुण वयात त्यांच्यावरील टिळकांचा असलेला प्रभाव अनेक प्रसंगांत प्रकर्षाने दिसून येतो. टिळक यांना ‘लोकमान्य’ उपाधी मिळाली ती केवळ एका धर्माची अथवा जातीची नव्हती. जीना, शौकत अली, हसरत मोहानी यांसारख्या अनेक मुस्लिम नेत्यांसाठीही लोकमान्य टिळक आदरस्थानी होते. शौकत अलींनी तर टिळकांच्या मृतदेहाला खांदा देऊन अंतिम संस्कारात राष्ट्रीय संस्काराची भर घातली होती. बॅ. जीना यांनी मुस्लिम लीगचे सभासद होण्यापूर्वी टिळक यांच्या विरोधातील राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांचे कायदेशीर प्रतिनिधित्व केले होते. मुस्लिम धर्मीयांना कायदेमंडळात प्रतिनिधित्व मिळावे यासाठी काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्या दरम्यान 1916 मध्ये झालेल्या लखनौ कराराचे लोकमान्य टिळक हे महत्त्वाचे शिल्पकार होते. टिळकांनी त्यांच्या हयातीत इंग्रज सत्तेविरोधात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रामाणिक प्रयत्न केले होते.

टिळक हे केवळ एका जातीचे नेते होते अथवा सनातनी होते असा आरोप अनेकदा केला जातो. मात्र टिळकांनी मुंबईत आयोजित अस्पृश्यता निवारण परिषदेत अस्पृश्यतेविरोधात ठराव केला होता. टिळकांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना मिळणारी वागणूक व हिंदुस्थानी नागरिकांना ब्रिटिश प्रशासनाकडून दिल्या जाणाऱया वागणुकीचा संदर्भ त्यावेळी दिला होता. या वागणुकीची तुलना जुन्या काळातील उभारलेल्या व्यवस्थेसमवेत करत टिळकांनी सनातनी लोकांनी अस्पृश्यता निर्माण केल्याचा आपल्या भाषणात आरोप केल्याचा उल्लेख आहे.  हिंदू धर्मात अस्पृश्यतेला स्थान नाही याकडेही टिळकांनी लक्ष वेधले होते आणि अस्पृश्यतेचा रोग नाहीसा व्हावा असे आवर्जून नमूद केले होते. ईश्वरास अस्पृश्यता मान्य असल्यास अशा ईश्वराला मी मानत नाही हे टिळकांचे उद्गार त्या काळातही ते किती पुढारलेले होते, त्यांचे विचार किती पुरोगामी होते याची साक्ष देणारे आहेत.

टिळकांच्या मृत्यूनंतर गांधीजींनी लोकमान्यांना वाहिलेली श्रद्धांजली अतिशय बोलकी आहे. गांधीजी म्हणतात, ‘‘टिळकांइतका जनमानसावर प्रभाव असणारा दुसरा लोकनेता नाही’’. टिळकांच्या आध्यात्मिक लिखाणाचा प्रभाव केवळ हिंदूंवरच झाला असे नाही. स्वातंत्र्यसेनानी हसरत मोहानी यांनी टिळकांच्या मृत्यूपश्चात केलेली उर्दू रचना टिळकांच्या लिखाणाचा इतर धर्मीयांवर झालेल्या प्रभावाची साक्ष देणारी आहे.

‘मातम न हो क्यों भारत में बपा

दुनिया से सिधारे आज तिलक

बलवन्त तिलक, महराज तिलक,

आज़ादों के सरताज तिलक,

जब तक वो रहे, दुनिया में रहा

हम सब के दिलों पर ज़ोर उनका

अब रहके बहिश्त (स्वर्ग)

में निज़्दे-ख़ुदा (ईश्वरास समर्पित)

हूरों पे करेंगे राज तिलक,

हर हिन्दू का मज़बूत है जी,

गीता की ये बात है दिल पे लिखी

आख़िर में जो ख़ुद भी कहा है

यहीं फिर आएंगे महराज तिलक!’

अशा हिंदुस्थानचे युगपुरुष असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या