गणरायाला का म्हणतात ‘विघ्नहर्ता’, वाचा त्याची कथा

3575

>> प्रतीक राजूरकर

गणपती.. गणनायक, विद्यापती, विघ्नहर्ता.. अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी देवता. शिवशंकर आणि पार्वतीच्या या पुत्राला विघ्नहर्ता हे नाव कसं पडलं याची एक रंजक कथा सांगितली जाते.

सत्य लोकांत ब्रम्हदेव ब्रम्हांड निर्मितीत व्यस्त असतांना त्यांनी जांभई दिली. त्यामुळे पर्वतांना तडे जाऊ लागले, त्यातून आगीच्या ज्वाला निघायला लागल्या. ब्रम्हदेवाला आलेल्या ग्लानीतून त्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याने नदींना पूर आला आणि ब्रम्हदेवाचे डोळे लागताच सर्वत्र अंधकार पसरला. सरस्वतीने हे बघून राग भूपालम आळवला. त्यामुळे ब्रम्हदेव जागे होऊन बघतात तर चोहीकडे पसरलेला हाहाकार, पुराच्या पाण्यात त्यांना एका पानावर तरंगत असलेले गजमुखी बाळ दिसले. त्याचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे भासत होता. नुकतेच झोपेतून जागे झालेल्या ब्रम्हदेवाने त्या विलक्षण दृश्याकडे बघत असतांनाच तो गजमुखी बालक अदृश्य झाला आणि आपल्या कमंडलूतील जल काढून ब्रम्हदेवाने पर्वतातून निघत असलेल्या ज्वाला विझविल्या. त्यातून नदी, वृक्ष पृथ्वीवर अस्तित्वात आले. मौल्यवान धातू, रत्नांची उत्पत्ती होऊन पक्षी, प्राणी जलचर नांदू लागले. सोबत पुरूष आणि स्त्री सुद्धा पृथ्वीवर अवतरले. सरस्वतीच्या वीणेचे सूर अचानक बेसूर झाले. त्यांनी ब्रम्हदेवाकडे कटाक्ष टाकला असता ब्रम्हदेवाचा चेहरा निस्तेज भासू लागला आणि त्यांनी निर्माण केलेले सर्व विद्रुप दिसू लागले. पर्वत, वृक्ष, वरखाली झाले होते, पक्षी उलटे उडू लागले, प्राणी भयावह भासू लागले, मानवाची शरीर रचना बदलून ते अधिक अमानवीय दिसू लागल्याने ब्रम्हदेव अस्वस्थ झाले की हे मला अनपेक्षित कसे घडले? हे सर्व घडत असतांना अचानक पुन्हा त्यांना एक दिव्य तेजस्वी प्रकाश त्यांच्याकडे चालून येतांना दिसला. त्या प्रकाशातून काही वेळ अगोदर दिसलेला बालक अवतरला. त्यावेळी अचानक सरस्वतीच्या वीणेतून ओंकाराचे स्वर निघू लागले. सरस्वती आणि ब्रम्हदेवाने त्या बालकास नमस्कार केला आणि ब्रम्हदेवाचे तेज पुनः प्रस्थापित झाले, हे सगळे बघून ब्रम्हदेवाने त्या बालकास आपण कोण आहात म्हणून विचारले आणि क्षमा मागून आशीर्वाद मागितले.

त्या बालकाने त्यांना अवगत केले पुत्र ब्रम्हदेवा तुम्ही अनेक संकल्प निश्चिती करु शकता पण त्या सर्व पूर्ण होतीलच असे नाही. त्यात अनेक विघ्न उत्पन्न होतील. मी विघ्नहर्ता आहे. अनेकांच्या मनोकामना पूर्ण होण्यात जे विघ्न आहेत त्याचा नाश करणारा म्हणूनच मला विघ्नेश्वर संबोधलं जातं. मी भगवान शिवाचे सेवक असलेल्या पंच महाभूतांचा/गणांचा नायक, पती आहे, म्हणून मला गणपती सुद्धा संबोधलं जातं.

ब्रम्हदेव त्यांनी केलेल्या सृष्टी निर्माणात आलेल्या विघ्नाचे कारण विचारले असता श्री गणेशाने त्यांना आठवण करून दिली की, मी पहिल्यांदा जेव्हा दिसलो तेव्हा तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तुम्हाला तुमचा संकल्प सुरळीत करायचा असेल तर माझी प्रार्थना अनिवार्य आहे. मी येणाऱ्या विघ्नांना थोपवू शकतो. त्यामुळेच तुम्हाला तुमच्या संकल्पात यश मिळू शकेल. माझी प्रार्थना म्हणजे आपले डोळे नीट उघडे ठेऊन येणाऱ्या प्रत्येक विघ्नाची तुम्हाला माहिती असणे, मी येणाऱ्या विघ्न, अडसरांवर मात करणाऱ्या ज्ञानाचे प्रतीक आहे. ब्रम्हदेव असोत किंवा सामान्यजन त्या प्रत्येकास आपल्या कार्याची जबाबदारीची आणि आव्हानांची जाण असायला हवी, जो हे जाणून आहे त्यालाच यश प्राप्ती आहे. हत्ती हा आपल्या सोंडेने जमिनीची ताकद ओळखून मार्गस्थ होतो. प्राण्यांत हत्ती हा सर्वात ज्ञानी असल्याने माझे मुख हत्तीचे आहे म्हणूनच मला गजानन पण संबोधले जाते. असे म्हणून ब्रम्हदेवाला झोप लागल्यावर चार वेद चोरून नेणाऱ्या सोमकसुर दैत्याला भगवान विष्णूंनी ठार मारून ते मला तुम्हाला देण्यास सांगितले, असे म्हणून ते वेद ब्रम्हदेवास परत केले. वेद हे ज्ञानाचे प्रतीक असल्याने ते तुम्हाला परत मिळाल्यावर तुमच्या कार्यात विघ्न येणार नाही हे ऐकून ब्रम्ह देवाने श्री गणेशाचे आशीर्वाद घेतले.

परत जाताना श्री गणेशाने ब्रम्हदेवास आलेले विघ्न दूर केल्याचे सांगितले आणि निर्माण ही एक कला आहे त्याचे विद्रुपीकरण व्हायला नको असे म्हणून ब्रम्हदेवास ब्रम्हांडाला सर्वांगसुंदर करण्याचे वरदान देऊन अदृश्य झाले. संकट, विघ्न यावर मात करायची असल्यास योग्य ज्ञानाची गरज आहे, ज्ञानरुपातील गणरायांच्या उपासनेतूनच अज्ञान दूर होऊन विघ्नांचे हरण होईल हे या पुराणकथेतील तत्वज्ञान आहे.

गाणपत्य संप्रदायात गणेश पुराणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातील श्री गणेशाच्या कथा व उपासना संबंधित शास्त्रीय माहिती प्राप्त करण्यासाठी  गणेश पुराण महत्वाचे आहे. या पुराणातील उपासनाखंडात एकूण ९२ अध्याय असून त्यातील ३६ अध्यायांवर गणेश सहस्त्रनाम स्तोत्राची रचना आहे, तर क्रिडाखंडात एकूण १५५ अध्याय असून यातील अध्यायांवर गणेशगीतेची रचना आहे. अनेकांच्या मते गणेश गीता ही भगवद्गीते समान आहे. पण काही विद्वानांच्या निष्कर्ष त्याबाबतीत असमान आहे. राजा वरेण्यास गणपतीच्या गजानन अवताराने हा गीता उपदेश केला आहे. युवराज कृष्ण या अभ्यासकाने गणेश गीता ही जवळजवळ भगवद्गीतेसमान असल्याचे मत नोंदविलेले आहे, तर ग्रेग बेले नावाच्या अभ्यासकाने भगवद्गीतेत आणि गणेश गीतेत बरेच अंतर असल्याचे नमूद केले आहे. आपल्या मताला संदर्भ म्हणून त्यांनी गणेश गीतेत केवळ ४१२ श्लोक असल्याचे सांगत, अर्जुनाच्या तुलनेत राजा वरेण्याच्या प्रश्नांच्या वेगळेपणाबाबत प्रश्न करून आपला निष्कर्ष अधिक उजवा असल्याचे सिद्ध केले आहे. पण स्वरूपसारखे असल्याचे ग्रेग बेले यांचे म्हणणे आहे. याच क्रिडाखंडात कालानुरूप श्री गणेशाचे चार अवतार वर्णन केले आहेत.

श्री गणेश अवतार क्रीडाखंड

यातील श्री गणेशाचे चार अवतार हे मुद्गल पुराणात वर्णन केलेले नसून चार युगात अवतरल्याचे वर्णन आहे, त्यातील नावात साम्य असले तरी हे युग अवतार असल्याने वेगळे आहेत, पुराणात कथेच्या माध्यमातून रचनाकारांनी दिलेला ज्ञानाचा संदेश अधिक महत्वाचा ठरतो. त्यामुळे केवळ कथा म्हणून त्याचे वाचन न करता त्यातले तत्त्वज्ञान अधिक उजवे ठरते.

१) महोत्कट विनायक: दशभुजा असलेला हा श्री गणेशाचा अवतार रक्तवर्णाचा आहे, विविध ठिकाणी या अवताराच्या वाहनात असमानता आढळते काही ठिकाणी हत्ती तर काही ठिकाणी सिंह वाहन असल्याचे वर्णन आहे. कश्यप आणि अादितीच्या पोटी कृतायुगात अवतरल्याचा उल्लेख आहे. या अवतारात नरंतक आणि देवांतक व्यतिरिक्त धूम्रक्ष नावाच्या दैत्यांचा संहार केल्याचा कथा आहेत.

२) मयुरेश्वर: सहा हात असलेला हा अवतार श्वेत वर्णाचा असून मयूरावर आरूढ आहे, भगवान शिव पार्वतीच्या पोटी त्रेता युगात सिंधू नामक दैत्याचा संहार केल्याची कथा आहे. शेवटी मयूरेश्वरांनी आपले वाहन बंधू स्कंदास दिल्याचा सुध्दा या कथेत उल्लेख आढळतो. स्कंद देवतेचे वाहन म्हणून मयूर प्रचलित आहे.

३) गजानन: चार हात असलेला हा गणरायांचा अवतार रक्त वर्णाचा आहे, मूषकावर आरूढ गजानन हे द्वापर युगात शिव पार्वतीच्या पोटी सिंदूर( शेंदूर) नामक दैत्याचा संहार करण्यास अवतरल्याची कथा आहे, याच अवतारात श्री गणरायांनी वरेण्य राजास जो गीतोपदेश केला तीच गणेश गीता म्हणून पुराणात आहे.

४) धूम्रकेतु: हा गणरायांचा अवतार धूम्रवर्णाचा असेल व निळ्या रंगाच्या अश्वावर आरूढ होऊन कलियुगात अवतरेल अशी श्रध्दा आहे, आपल्या अवतार कार्यात अनेक दैत्यांचा संहार करुन कलियुगाचा नाश करेल, श्री विष्णूंच्या कल्कि अवतारा सोबत साधर्म्य असणारी ही कथा आहे.

हिंदु धर्म हा निसर्ग पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेऊन हजारो वर्षांपासून वाटचाल करत आला आहे, हिंदु देवी देवतांची वाहने म्हणून प्राण्यांचा उल्लेख ह्या बाबत पुष्टी करणारा आहे. श्री गणरायांचे वाहन म्हणून मूषक सर्वपरिचित आहे त्यामागचा उद्देश काही विद्वानांनी मांडला आहे. प्राचीन काळात शेती हेच जगण्याचे साधन होते, पण उंदरांचा शेतकऱ्यांना होणारा उपद्रव आजही कायम आहे, श्री गणेश ह्यांचे वाहन उंदीर असण्यामागे उंदरांचे शेत उत्पादनातील विघ्न निर्माण करणाऱ्या मूषकावर आरूढ होऊन शेतकऱ्यांच्या वाटेतील विघ्न नाहीसं करणारे विघ्नहर्ता असा एक विद्वानांचा तर्क आहे तर दुसरा तर्क प्रत्येक छोट्या मोठ्या विघ्नांचा नाश व्हावा म्हणून, उंदराचा कमीतकमी जागेत जाऊ शकणाऱ्या वैशिष्टयपूर्ण शैली मुळे तळागळातील विघ्नांचा नाश करण्यास विघ्नहर्त्याला रचनाकारांनी मूषक हे वाहन दिले असण्याची शक्यता आहे. थोडक्यात हिंदु देवतांचे सगुण साकार रुप हे पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने समर्पक असेच आहे.

ब्रम्हणस्पत म्हणून वेद मंत्रांचे स्वामित्व, बुध्दीची देवता, गणांचा पती अथवा ईश, विघ्नांचा नाश करणारे, सर्व देव तत्वात गणेश तत्व आद्य आहे, अनादि अनंत स्वरूप असलेल्या गणेश तत्वाचे निर्गुण निराकार स्वरूप ॐ कारातच आहे, म्हणून सर्व मंत्र श्लोकांची सुरुवात ही ओंकाराने होते, अनेक सत्पुरुषांनी श्री गणरायांचे वर्णन, स्तुती केली आहे, गणेश तत्वाचे सामर्थ्य सर्व गुणात असल्याने समर्थांनी वर्णन केल्या प्रमाणे,

गणाधीश जो ईश सर्व गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा।।
अशा सगुण आणि निर्गुण विघ्नहर्त्या श्री गणरायांना वंदन.

आपली प्रतिक्रिया द्या