गौरीनंदन गणराया

>> शिरीष कणेकर

मशिदीमध्ये जोरजोरात, मोठमोठयाने ‘बांग’ देणाऱ्याला उद्देशून श्रेष्ठ कवयित्री महादेवी वर्मा म्हणतात, ‘अरे मुंगीच्या पायात बांधलेल्या घुंगरांचा आवाजही त्याला ऐकू येतो. मग घसा खरवडून तू का त्याच्या नावानं ओरडतोयस?

आपल्याला सगळयांनाच कधी ना कधी हा प्रश्न पडतोच. सोसायटीत कर्णे लावून हिंदी सिनेमातल्या उडत्या गाण्यांच्या चालींवर कर्णकर्कश आवाजात भजनं वाजतात तेव्हा महादेवीजींच्याच काव्यातून कळवळून विचारावंसं वाटतं ‘क्या तेरा साहिब बहेरा है?’

वास्तविक प्रत्येक माणूस व त्याचा ‘साहिब’ याचं स्वतंत्र नातं असतं. त्याचा एक्सक्लुझिव्ह क्लब असतो हे फार थोड्या लोकांना कळतं. म्हणून तर माणसं चार देवांच्या चौकटीवर माथे आपटतात, चार बाबांचे गंडे, ताईत बांधतात, चार बुवांच्या अंगठया चार बोटांत घालतात. हे सगळे मिळून आपलं भलं करतील अशी या भक्तजनांची भावना असते. कोणा एकावर विश्वास ठेवायचे दिवस नाहीत. देवाच्या दरबारातही चापलुसी. त्याला बरं चालतं?

आमच्या शेजारी शंकराचं मंदिर आहे. तिथला पुजारी सकाळी सहा वाजता देवळाची घंटा बडवतो (तो देवाचं काम करीत असल्यानं झोपमोड झाली अशी तक्रार करायचीही सोय नाही) पाठोपाठ तो खड्या आवाजात ‘शंकर भोलेभाले, भक्तों के रखवाले’ असे ओरडतो. घंटेपाठोपाठ आलेल्या या गर्जनेमुळे उरलीसुरली झोप कोलमडते. मग तुम्ही रात्रपाळी करून पहाटे का घरी आला असतात? (माझ्या लहान मुलाला साखरझोपेत ते ‘शंकर जयकिशन’ असे ऐकायला यायचे. मुलगा कुणाचा?) मला नेहमीच प्रश्न पडत आलाय. तो पुजारी ‘शंकर भोलेभाले, भक्तों के रखवाले’ हे कोणासाठी ओरडत असतो? हे खुद्द भोलेनाथाला रिमाइंडर होतं का? भक्तांना हे माहीत नव्हतं का? माहीत नसतं तर ते भक्त कसे झाले असते? ही त्रासदायक घोषणा पहाटे करून तो पुजारी नेमकं काय साधू इच्छितो? ते आता आमच्या इतकं अंगवळणी पडलंय, की जिथं अशी घोषणा होत नाही त्याला आम्ही शंकराचं देऊळच मानणार नाही. आम्ही साध्या साध्या बोलण्यात ‘शंकर भोलेभाले’च्या आधीच उठलो मी, असे बोलतो.

सर्व देवांत गणपती माझा आवडता देव आहे. तो अतिशय खेळकर व खिलाडू वृत्तीचा आहे. ‘कम से कम भगवान से तो डर’ असे गणेशाच्या बाबतीत कधी म्हटलं जात नाही. तो वडिलांसारखा कोपिष्ट नाही की तिसरा डोळा उघडून कोणाला भस्म करीत नाही. तो मातेसारखा प्रेमळ व मनमिळाऊ आहे. लहानसहान गोष्टींचा तो बाऊ करीत नाही. त्याला वक्रतुंड म्हणा, महाकाय म्हणा, लंबोदर म्हणा, ही डझंट रिअली माइंड. इतकं की, ही दूषणं खुशाल आपण त्याच्या आरतीत समाविष्ट करतो. सहिष्णुता वेगळी काय असते? याउलट रस्त्यात कोणाला ढेरपोट्या, वाकडतोंड्या किंवा जाड्या म्हणून बघा, लगेच जवळचं हॉस्पिटल शोधावं लागेल. गणपती कधीही नाराज होत नाही. भक्तांवर कृपावंत होताना हा आपल्याला काय काय बोलला होता त्याचा डूख धरत नाही.

गाडगे महाराज म्हणायचे, ‘असा कसा तुमचा देव, घेई बकरीचा जो जीव’. गणपतीला बळी लागत नाही. तो मोदकावर संतुष्ट असतो. बसले उंदरावर की, स्वारी निघाली. सगळया देवांपेक्षा वेगळा असा हा जगावेगळा देव आहे. नाहीतर सांगा, उंदीर कोणी आपलं वाहन करील का? ही डझंट गिव्ह अ डॅम. अतिप्रेमळपणानं, चांगूलपणानं या विघ्नहर्त्यानं भक्तांना जिंकून घेतलंय, भीती किंवा धाकदपटशा दाखवून नव्हे. अन्य मान्यवर देवदेवतांची वाहने बघा, शंकर – नंदी, इंद्र – ऐरावत, सरस्वती – मोर, अग्नी – मेंढा किंवा एडका, ब्रह्मा – हंस, विष्णू – गरुड, दुर्गा – सिंह, लक्ष्मी – घुबड (काही धनवानांकडे पाहिलं की, हे पटतं बाबा!) हनुमानाला वाहनाची गरज नाही. तो थेट उडतच जातो. ज्या रामाचा हनुमंत परमभक्त, त्या रामाकडे मात्र वाहनच नसावं ना? तेहतीस कोटी देवदेवतांसाठी वाहनांची सोय करायची तर रेल्वेचं जाळंही अपुरं पडेल.

‘मराठी डॉक्टर्स, मँचेस्टर’ या सांस्कृतिक संस्थेनं देशभर विखुरलेल्या मराठी डॉक्टर्सचा गणेशोत्सवानिमित्त मेळावा भरवला होता. मी प्रमुख पाहुणा होतो. विनोद शहा या जन्मानं गुजराती पण कर्मानं मराठी असलेल्या डॉक्टरनं स्वागताचं भाषण फडर्या इंग्रजीतून केलं. तो म्हणाला, ‘मी प्रमुख पाहुण्याचं स्वागत करायला उभा आहे. (मी दाखवायला आणलेल्या मुलीसारखा लाजून पायाच्या अंगठयाकडे पाहू लागलो) जन्मापासून त्याच्या दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. (माझे कधीपासून?) तान्हा असताना त्याला मेजर सर्जरीला तोंड द्यावं लागलं. (मी? कधी?) वडील भयंकर तापट. (माझे? काहीतरीच) शरीर बेढब. (मी? बरोबर) प्रेमळ आईच्या आधारनं तो मोठा झाला. (मी? आई होती कुठे?) लोकांनी त्याला वेडीबिद्री नावं ठेवली. त्यानं ते मनावर घेतलं नाही. (मी? कधी?) स्वतःची दुःखं व शारीरिक व्यंगं यांचं भांडवल न करता तो सदैव लोकांच्या भल्यासाठी झटला. (मी? कधी?) ‘भारतरत्न’, ‘नोबेल’ या उपाध्यांना त्याच्याहून लायक कोणी नाही. (मी? काहीतरीच) ब्रिटिश सरकारनं उपाधी न देताही लोक आपणहून त्याला ‘लॉर्ड’ म्हणतात. (मला? कधीपासून?) लेडीज ऍण्ड जंटलमेन, लेटस् गिव्ह बिग वेलकम टु द वन ऍण्ड ओन्ली गणपती बाप्पा.’

सगळ्यांबरोबर मीही उठून उभा राहिलो आणि टाळया वाजवल्या. माझ्या डोळयांच्या कडा चुरचुरत होत्या. तिथं साक्षात गणपती असताना मी स्वतःला प्रमुख पाहुणा समजत होतो? एक बुद्धीची देवता आणि दुसरा निर्बुद्ध, स्खलनशील, प्रमादशील माणूस…
डॉक्टरच्या मेळाव्यात मेडिकलला प्रवेशदेखील न मिळालेल्या माणसाला खास अतिथी म्हणून बोलावता? इतर कोणी सोडा, पण खुद्द एकदंत गणपती बघतोय त्याचं काय? तो बोलत नाही, रागावत नाही, शाप देत नाही, घ्या त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या