हरवलेलं संगीत (भाग 13) – आर. डी., सी. रामचंद्र, मदन मोहन

>> शिरीष कणेकर

किशोरकुमारपुत्र अमितकुमार याला एक दिवशी आर. डी. बर्मनचा फोन आला.
‘‘अमित (उच्चार ‘ऑमीत’ असा) आर. डी. बोलला, ‘‘तुमच्याकडे मोझार्टच्या सिंफनीची एक रेकॉर्ड आहे. मला माहित्येय आहे. ती मला ताबडतोब हव्येय. तेवढी घेऊन ये.’’
‘‘मला शोधावी लागेल.’’ अमित कुरकुरला.
‘शोध मग सापडेल. मला माहित्येय की ती तुमच्याकडे आहे.’
अमितनं ती रेकॉर्ड शोधली. त्याला सापडली. रेकॉर्ड घेऊन तो आर.डी.कडे गेला.
‘‘पण तुला ‘मोझार्ट सिंफनी’ इतक्या तातडीनं कशाला हवी होती?’’ अमित कुमारनं कुतुहलापोटी विचारलं.
‘‘मला तिच्यावरून एक चाल मारायची होती.’’ आर.डी. थंडपणे म्हणाला.
त्यानं अमितला ती सिंफनी ऐकवली.
‘‘पण ही सलील चौधरीनं आधीच मारल्येय’’ अमित कुमारनं अचूक माहिती पुरवली.
‘‘कुठं? कधी? कशात?’’ आर.डी.नं उतावीळपणे विचारले.
‘‘1961 साली आलेल्या हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘छाया’ नामे चित्रपटात. संगीत सलील चौधरी, कवी राजेंद्रकृष्ण, लता-तलतचं हे द्वंद्वगीत होतं- ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा…’’
आर. डी. बर्मन हतबुद्ध झाला. त्याची सगळी मेहनत (?) वाया गेली होती.

लंडनमधील एका खासगी बैठकीत दोन गाण्यांच्या दरम्यान सी. रामचंद्र म्हणाले, ‘‘पोरानं किंवा पोरीनं गाण्यासाठी तोंड उघडलं की, आईबापांना वाटतं आपल्या घरात लता मंगेशकर किंवा कुंदनलाल सैगल जन्माला आलेत.’’ (इथंही महंमद रफी नाही. मार्क इट!)
आता मुंबईतील शिवाजी पार्क येथील घरात अण्णा रामचंद्रनी काढलेले हे उद्गार वाचा, ‘‘लता फक्त एक चांगला टेपरेकॉर्डर आहे, बाकी काही नाही. लतासारखं गाणं म्हणजे चांगलं गाणं असा एक अपसमज समाजात पसरलाय.’
आता हा माझ्या डोळय़ांसमोर घडलेला किस्सा घ्या. संगीतात एम. ए. केलेल्या एका गृहस्थानं लता व आशा यांच्यावर तुलनात्मक एक ग्रंथ लिहिला होता. त्यांची शैली, तपश्चर्या, गुणवत्ता, संस्कार आदी गोष्टींचा ग्रंथात ऊहापोह करण्यात आला होता. तो अभ्यासक तो ग्रंथ घेऊन सी. रामचंद्रकडे गेला. अभिप्रायासाठी, कौतुकाची पाठीवर थाप मिळवण्यासाठी.
‘‘वाचतो मी सवडीनं’’ रामचंद्र म्हणाले, ‘‘पण मला एक सांगा, तुमच्या मते लता व आशा यात सरस कोण?’’
‘‘अर्थातच आशा’’ ग्रंथकार, अभ्यासक उत्साहानं म्हणाला. ‘‘मूर्ख आहात.’’ अण्णा गरजले, ‘‘तुम्हाला संगीतातलं ‘ओ की ठो’ कळत नाही. निघा आता. तो ग्रंथही सोबत घेऊन जा.’’
ग्रंथकार सी. रामचंद्रमधील माणसाशी बोलू पाहत होता आणि समोर संगीतकार उभा होता. त्याला अशी चपराक बसली की, तो ग्रंथ प्रकाशित करण्याच्या फंदात पडला नाही. स्वतः अण्णा रामचंद्र काहीही बोलतील, पण दुसऱया कोणी बोलायचं नाही.
सी. रामचंद्र हे गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व होतं.

मदन मोहनचं सगळंच काम फाडफाड इंग्लिश होतं. तो गाणंही इंग्लिशमध्ये उतरवून घ्यायचा. त्यानंतर तो अस्सल हिंदुस्थानी बाजाच्या रागदारीयुक्त चाली द्यायचा. कमाल आहे की नाही? ‘रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे’ (‘दिल की राहे’) व ‘न हंसो हमपे’ (‘गेटवे ऑफ इंडिया’) या फारशा प्रसिद्ध नसलेल्या त्याच्या रचनाही लाजवाब होत्या. खरं सांगायचं तर एकूण मदन मोहनच लाजवाब होता. दारूपायी तो अकाली गेला. दारूपायी जीव गमावलेला तो काही पहिला कलावंत नव्हता की शेवटचा नव्हता तरी वाईट वाटायचं ते वाटतंच ना. त्याच्या शोकसभेत केलेल्या भाषणात नौशाद म्हणाला होता, ‘‘आमच्या इंडस्ट्रीतले लोक मला हसतात. म्हणतात नौशाद पित नाही; त्याला आयुष्य एन्जॉय करता येत नाही. कसं आयुष्य एन्जॉय करायचं असतं? हे असं? मदन मोहनसारखं…?’’ कंठ दाटून आल्यानं नौशाद पुढे बोलू शकला नाही.
अखेरच्या दिवसांत मदन मोहन दारूच्या आहारी तर गेला होताच, पण म्हणे एका अमेरिकन बाईच्या नादी लागला होता. पत्नी शीला व संसार त्यानं वाऱयावर सोडला होता. एका रात्री टाईट असताना त्यानं लताला फोन केला व तो म्हणाला, ‘‘लता, शीलाला सांग की, मी तिला विसरलेलो नाही. तिला वाटत असणार की, मी तिला माझ्या संपत्तीपासून बेदखल केलंय, पण तसं नाही. मी दमडा अन् दमडा शीलाच्या नावावर ठेवलाय. ऐकत्येयस् ना लता? विसरू नकोस. शीलाला सांग.’’
लताला वाटलं, मदन मोहनच्या तोंडून दारू बोलत्येय. संबंध तोडल्यावर तो शीलाची काळजी कशाला करेल? अन् एवढी काळजी होती तर त्यानं शीलाशी संबंध का तोडले असते? लतानं फोन ठेवला व ती हे संभाषण विसरून गेली.
मदन मोहनचं निधन झालं. मृत्युपत्रानुसार त्यानं त्याचं होतं नव्हतं ते शीलाच्या नावावर केलं होतं. हे मला सांगतानाही लताचे डोळे भरून आले होते.
चला आठवूया ‘दिल की राहे’मधलं मदन मोहनचं मधुवंती रागातलं लतानं गायलेलं गाणं-
रस्मे उल्फत को निभाये तो निभाये कैसे
हर तरफ आग है, दामन को बचाये कैसे

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या