ठसा – लुईस ग्लुक

>> प्रशांत गौतम

अमेरिकेतील प्रख्यात साहित्यकार तथा ज्येष्ठ कवयित्री लुईस ग्लुक यांना नोबेल पुरस्कार नुकताच जाहीर झाला. त्यानिमित्ताने अनुभवाला विश्वरूप देणाऱया एका कवयित्रीचा सन्मान झाला, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया जागतिक साहित्यात उमटली. साधेपणात सौंदर्याचा शोध घेणाऱया या कवयित्रीसाठीसुद्धा हे अनपेक्षित सरप्राईज असावे. साहित्य/काव्यक्षेत्रातील लक्षणीय योगदानासाठी लुईस यांना जागतिक कीर्तीचे अन् प्रतिष्ठsचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले तेव्हा त्यांनाही सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. हा आनंद व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नसल्याचे त्यांनी सांगितले. न्यूयॉर्कमध्ये 1943 साली जन्मलेल्या लुईस ग्लुक आज 77 वर्षांच्या ज्येष्ठ कवयित्री आहेत. त्यांची ओळख एखादी बंडखोर किंवा क्रांतिकारी कवयित्री अशी नाही, तर त्यांच्या कवितेची प्रकृतीही सर्वस्वी वेगळी आहे. आपल्या कौटुंबिक सुखदुःखातील साध्याच प्रसंगांना त्यांनी काव्यरूप दिले आहे. साधेपणातच सौंदर्य असते. अशाच आत्मकाव्यातून वैश्विक परिणाम साधता येतो, अशी त्यांची भावना व भूमिका सांगता येते. तिरकस दृष्टीतून त्यांनी जगातला व्यवहार जाणला, त्याचे अवलोकन केले. त्यातून त्यांनी बालपण व तारुण्यपणास ग्रीक मिथकास जोडले व अनेक कवितांची निर्मिती होत गेली. 1968 साली ‘फस्टबॉर्न’ या कवितासंग्रहाद्वारे लुईस यांनी अमेरिकेतील समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. 1975 साली लुईस यांचा ‘द हाऊस ऑन मार्शलॅण्ड’ हा महत्त्वाचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. या संग्रहामुळे ग्लुक यांना देशविदेशातील महत्त्वाच्या कवयित्री म्हणून ओळख मिळाली. त्यांना यंदाचे नोबेल पारितोषिक घोषित करताना नोबेल समितीने म्हटले आहे – ‘कौटुंबिक नातेसंबंध, लादलेले एकटेपण, घटस्फोट आणि मृत्यू या आयुष्यातील घटकांचा ग्लुक आपल्या कलाकृतीसाठी वापर करतात. त्यांच्या कवितेत आत्मवृत्ताच्या छटा अतिशय सुंदररीत्या चितारल्या जातात, असे समीक्षकांनी गौरविले आहे. त्यांच्या कविता ग्रीक मिथकांना जगवण्यातील घटकांशी जोडत असल्याने वैश्विक ठरतात, असे नोबेल समितीने म्हटले आहे.

लुईस ग्लुक यांचा 1992 साली ‘दि वाईल्ड आयरिस’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. या कवितासंग्रहातील ‘स्नोड्रॉप्स’ या कवितेत त्यांनी हिवाळय़ानंतर आयुष्यात झालेल्या चमत्कारीक बदलावर भाष्य केले आहे ज्याला अनेक काव्यसमीक्षकांनी दाद दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रख्यात पुलित्झर पुरस्कारानेही या कवयित्रीचा सन्मान झाला. ‘9/11’ च्या अतिरेकी हल्ल्याचे जगभरात पडसाद उमटले तसे त्यांच्या कवितेवरह़ी त्यांचे वर्णन त्यांनी आपल्या ‘ऑक्टोबर’ या कवितेत अत्यंत ताकदीने व प्रभावीपणे केले आहे. सहा भागांत असलेल्या दीर्घ कवितेत त्यांनी मिथकाचा वापर करीत काव्यनिर्मिती केली आहे. ज्यात त्यांना आधुनिक जगाचे यथार्थ चित्रण केले आहे.

‘माय मदर्स फोटोग्राफ’ या कवितेतील काही ओळी उधृत करण्यासारख्या आहेत.
तिरक्या नजरेने चोरटेपणाने
पाहणाऱया तेरेझभोवती
वडलांच्या हाताचा विळखा.
आणि माझ्या चिमुकल्या
तोंडात चिमुकला अंगठा
आळसत वृक्षसावलीत पेंगणारा
स्पॅनियल कुत्रा.
आणि हिरवळीपल्याड
कॅमेऱयाच्या पल्याड
डोळा लावून उभी आई

अशी एक कविता मनात घर करते. बंडखोरीचे दर्शन घडविणारी कविता असो नाही तर विस्थापितांचे हुंकार असलेली कविता असो, ती अनुवादाच्या माध्यमातून जगभरात गेली. पण असे फार वेळा लुईस यांच्याबाबतीत घडले नाही. मात्र त्यांच्या कवितेस वैयक्तिक साहित्य व जाणकारात अव्वल स्थान राहिले. असे असले तरी त्यांची कविता अमेरिकी जीवनबंधनात अनेक वर्षे अडकून पडली होती. पुलित्झरसारखा सन्मान मिळालेला असला तरी जागतिक परिमाण हे उशिरा का होईना नोबेल पारितोषिकाच्या रूपाने मिळाले आहे.

द गार्डन (1976), ऑक्टोबर (2004), दीर्घकाव्य. प्रुफ्स ऍण्ड थिअरीज ः एस्सेज ऑन पोएट्री (1994), अमेरिकन ओरिजिनॅलिटी ः एस्सेज ऑन पोएट्री (2017) हे गद्यलेखन तसेच फर्स्टबॉर्न (1968), द हाऊस ऑन मार्शलंड (1975), डिसेंडिंग फिगर (1980), द ट्रायम्फ ऑफ द फर्स्ट फोर बुक्स ऑफ पोएम (1995), मोडोलॅण्डम (1997), व्हिटानांव्हा (1999), द सेव्हन एजिस (2001), अव्हर्नो (2006), अ व्हिलेज लाईफ (2009), पोएम्स (1962 ते 2012), फेथफुल ऍण्ड व्हर्च्युअस नाईट (2014) अशी लुईस यांची बहुआयामी, वैशिष्टय़पूर्ण साहित्य संपदा सांगता येईल. साहित्य नोबेल पुरस्काराच्या 112 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत कादंबरीकारांचा बराच प्रभाव पुरस्कारावर राहिलेला आहे. मोजक्याच अमेरिकन कवींना हा सन्मान लाभला. त्यात लुईस ग्लुक यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या