मनोज तिवारी आणि डिंडाचा डंका..

क्रिकेटमध्ये गुणवत्ता असूनही मनोज तिवारी आणि अशोक डिंडा यांचे करीअर होऊ शकले नाही. मात्र बंगालच्या या दोन गुणवान क्रिकेटपटूंनी यंदाच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या मैदानात अनुक्रमे तृणमूल काँग्रेस आणि भाजपकडून आमदार म्हणून एंट्री केली आहे. गंमतीचा भाग म्हणजे या दोन्ही क्रिकेटपटूंना क्रिकेटमध्ये संधी दिली ती सौरव गांगुली यांनी.

याच गांगुलींच्या ‘दादा’ इमेजचा फायदा उठवून ममतांना काटशह देण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनविण्यासाठी भाजपतील चाणक्य मंडळींनी भरपूर दबाव वगैरे आणला होता. मात्र दबाव घेईल तो दादा कसला? गांगुलीने भाजपचा दबाव थेट मैदानाबाहेर भिरकावून लावला. ते किती ‘पॉलिटिकली करेक्ट’ होते हे निकालानंतर सिद्धच झाले. बंगालमध्ये ममतादीदींच्या झंझावातापुढे भाजपची उडालेली एकूणच धूळधाण पाहता, सौरव गांगुली हे ‘राजकीय हवामान तज्ञ’ निघाले असेच म्हणावे लागेल. मात्र गांगुलींचे क्रिकेटमधील ‘फाईडिंग’ असलेल्या मनोज तिवारी व अशोक डिंडा यांनी राजकारणाचे मैदान मारले.

तिवारींनी तृणमूलकडून शिबरपूरमधून तर डिंडा यांनी भाजपकडून मोयनामधून दणदणीत विजय मिळवला. डिंडांना क्रिकेटमध्ये आणणाऱया लक्ष्मीरतन शुक्ला यांनी गेल्यावेळी ममतांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदही भूषविले होते. गुणवत्ता असूनही क्रिकेटमध्ये कमनशिबी ठरलेल्या मनोज तिवारी व डिंडा यांना राजकारणाने चांगली साथ दिली आहे. बंगालच्या राजकारणातील क्रिकेटचा ऋणानुबंध यानिमित्ताने अधिक दृढ झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या