प्रासंगिक – जागर अभिजात मराठी भाषेचा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेंद्र ठाकूर, वामन भोसले


कविश्रेष्ठ  कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन ‘मराठी भाषा दिन’ म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने, आनंदाने आणि अभिमानाने साजरा केला जातो. मराठी भाषेची सद्यस्थिती काय आहे यावर चर्चा, परिसंवाद भाषेच्या उत्कर्षासाठी झटण्यासाठी संस्था/राजकीय पक्षांकडून केला जातो. मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे सरकारकडून दरवर्षी सांगितले जाते. परंतु अजून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला नाही. अर्थात ते मान्य होईल तेव्हा होईल, पण अशीही मराठी भाषा अभिजातच आहे. महाराष्ट्रातील साहित्यिक, संत, समाजसुधारक, विचारवंत यांनी मराठी भाषेचे सौंदर्य, वैभव आणि महत्त्व वेळोवेळी विशद केले आहे. मराठीची थोरवी कविता, लेख आणि शाहिरीतून उद्धृत झाली आहे.

कविवर्य कुसुमाग्रजांना मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान होता. ‘माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीनदीन । स्वर्गलोकाहून थोर मला हिचा अभिमान ।।’ असा पराकोटीचा अभिमान, आस्था असणाऱ्या मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आयुष्यभर अपरिमित कष्ट घेणाऱ्या कुसुमाग्रजांनी महाराष्ट्रावरील गौरवपर कवितेत महाराष्ट्राला संजीवनी परिसाची उपमा दिली आहे. ते म्हणतात, ‘‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासी टिळा । तिच्यासंगे जगतील मायदेशातील शिळा।।’’ कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी मराठी भाषेचे वैभव सांगताना म्हटले आहे की, ‘‘रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी, चारी वाणीत फिरते सरस्वतीची पालखी ।।’’ तर कवी व गझलकार सुरेश भट यांनी अभिमानाने म्हटले आहे की, ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी ।। धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढय़ा जगात माय मानतो मराठी ।।

महाराष्ट्रातील संतांनी मराठी भाषा-अभिमान वेळोवेळी प्रगट केला आहे. संस्कृत भाषेऐवजी समाजातील सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत जर ज्ञान दिले गेले, तर निश्चितच सर्व समाजाच्या हिताचे ठरणार आहे. ही भूमिका मराठी संतांची होती. लोकांनी त्या वेळी ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांना त्रास दिला. तो छळ त्या संतांनी आनंदाने सोसला. पण मराठीची कास सोडली नाही, मराठी भाषेचे सेवाव्रत सुरूच ठेवले.

‘माझ्या मराठीचि बोलु कवतिके । अमृतातेही पैजेसी जिंके ।’ असा सार्थ अभिमान प्रकट करून ज्ञानेश्वरांनी गीतेतील तत्त्वज्ञान मराठीतून सांगितले. एकनाथांनी काशीच्या पंडितांचा विरोध असतानाही मराठीत ग्रंथरचना केली. मराठी भाषेबद्दल बोलताना, ‘संस्कृत भाषा देवे केली । प्राकृत काये चोरे निर्मिली?’ असा परखड सवाल एकनाथांनी केला. त्यांनी ‘एकनाथ भागवत’, ‘भावार्थ रामायण’, ‘एकनाथी भारूड’ सोप्या मराठीतून लिहिले, त्यामुळे ते आजही लोकांच्या ओठी आहे.

येक म्हणती मऱ्हाटे काये। हे तो भल्यांसि ऐको नये।

ती मूर्ख नेणती सोये। अर्थान्वयाची।।

मराठी भाषेला वंदन करताना प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘भाषा माता माझी थोर मऱहाठी, प्रसिद्ध शिवबाची, दासांची, नाम्याची, ज्ञानेशाची, मयूर तुकयाची. मी अल्पबुद्धी सेवक केली जशी, साधली तशी सेवा, सेवा प्रेमे आपण म्हणजे समजेन मान्य ती देवा, जे जे वत्ते, लेखक देशाप्रीत्यर्थ आज झटतात, दे देवा, त्या आयुयश, बल, मी जोडितो तुला हात!’ प्रबोधनकारांनी मराठी भाषेची सेवा करणाऱ्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे, त्यांना मराठी भाषेची सेवा करण्याचे बळ प्राप्त होऊ दे, अशी मागणी केली आहे.

‘मराठी भाषा दिन’ राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे राबविला जातो. हा सरकारी कार्यक्रम असतो. सरकारने साजरा करणे हे त्यांचे कर्तव्यच असते. पण बऱ्याचदा सरकारी कार्यक्रम हे चटावरचे श्राद्ध उरकावे असे असतात. महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष आम्हीदेखील मराठी भाषेचे पैवारी आहोत हे दाखविण्यासाठी छोटा-मोठा कार्यक्रम उरकतात. परंतु मराठी भाषा, संस्कृती टिकवण्यासाठी सतर्क राहून त्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम आणि उपक्रम शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे गेली कित्येक वर्ष राबविले जात आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून लोकाधिकार महासंघातर्फे राष्ट्रपती महोदयांना लाखो पोस्टकार्डे पाठवण्यात आली. मराठी भाषा भवन लवकर होण्यासाठी पाठपुरावा केला. पेंद्र व राज्य सरकारच्या आस्थापना तसेच बँका, विमा आदी पेंद्र सरकारच्या अखत्यारीतील कार्यालयांत त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीसाठी सतर्कता दाखवली जाते. दरवर्षी जानेवारी महिन्यात मराठी भाषा पंधरवडा दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रातील सण, संस्कृती आणि इतिहास याचे महत्त्व दर्शवणारे कार्यक्रम लोकाधिकार महासंघातर्फे प्रत्येक कार्यालयात केले जातात. मराठी भाषा संवर्धनासाठी, प्रचार व प्रसारासाठी सर्वत्र प्रयत्न केला जातो. त्याचाच एक भाग म्हणजे 27 फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा दिन’ मोठय़ा उत्साहाने, आनंदाने आणि अभिमानाने साजरा केला जातो. याही वर्षी लोकाधिकार समिती महासंघातर्फे ‘जागर अभिजात मराठी भाषेचा’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.