
समर्थ संप्रदायामध्ये ज्या कवयित्री झाल्या त्यामध्ये ‘वेणाबाई’ यांचा प्रामुख्यानं उल्लेख केला जातो. संत बयाबाई या वेणाबाई यांच्या शिष्या होत. ‘बयाबाई’चा उल्लेख ‘बायजाबाई’ असाही केला जातो. त्यांच्या स्थलकालाबद्दलची माहिती उपलब्ध होत नाही. समर्थ संप्रदायाचे एक प्रमुख संत गिरिधरस्वामी हे त्यांचे शिष्य होते. बयाबाईंनी रचलेल्या पदांमध्ये गुरुभक्तिपर व गुरुमाहात्म्यापर रचनेस विशेष महत्त्व आहे. श्रद्धायुक्त भावना व आपल्या गुरुविषयीची अपार श्रद्धा बयाबाईंच्या पदांत व्यक्त झाली आहे. त्यातून स्त्राrसुलभ भावनांचाही भक्तिमय आविष्कार त्यांच्या रचनेत झाला आहे. बायजाबाईंची रचना अत्यंत रसाळ असून गेयता हे तिचं वैशिष्टय़ आहे. अनेकदा ग्रामीण शब्दरुपांचा उपयोगही बयाबाई करतात. आपल्या गुरुविषयीची पराकोटीच्या आदराची भावना त्यांच्या पुढील पदात व्यक्त झाली आहे – ‘हा गुरुराजचि साचा सिंधु आनंदाचा। सा चारांला अंत न लागे कुंठित जाल्या वाचा।।’ समर्थ संप्रदायातील अनेक संतांनी मराठी प्रमाणेंच ‘दक्खिनी’ हिंदी भाषेतही लेखन केलं आहे. संत बयाबाई यांची ‘दक्खिनी’ मधील रचना पदस्वरुपात उपलब्ध होते. जसे- ‘बर्या कहुं रे गुरुनाथ की बात में मस्तमया हे दिल मेरा रंगमे। लाल रंगमे सफेद खुला है कोई नहिं जाने आपभुला है ।।’




























































