अग्गोबाई ढग्गोबाई!

>> शिरीष कणेकर

‘अग्गोबाई सासूबाई’ ही ‘झी’ वरची लोकप्रिय भंगार मालिका बघता की नाही? मी बघतो सोडा, मला उद्योगच नाही, पण तुमच्यासारखी शहाणीसुरती माणसं का बघतात? त्यापेक्षा घरातील झुरळं मारा, बायकोच्या (स्वतःच्या) साडीला इस्त्री करा, सोसायटीचं सर्क्युलर पाठ होईपर्यंत वाचा, नेमकी मालिकेची वेळ साधून जेवा, पाणी भरून ठेवा, श्रीकृष्णानं सांगितलेली गीता अर्जुनानं काय ऐकली अशा एकाग्रचित्तानं व भक्तीभावानं बायकोची बक्वास ऐका. (या जन्मीची फळं याच जन्मी असतात.) ‘अग्गोबाई सासूबाई’ बघून पडणाऱया असंख्य अनुत्तरित प्रश्नांनी डोकं फिरलं तर ज्याच्याकडे जायचं तो मानसोपचारतज्ञ आधीच ठरवून ठेवा. जमलं तर दिग्दर्शक अजय मयेकर यालाही बरोबर घेऊन जा. तो वाहिनीचा कोणीतरी आग्रहानं सोबत आणेल. मग सगळे मिळून बाल (बुद्धी) गीत म्हणतील, ‘मालिकेतील प्राण्यांची भरली मोठी सभा, अजय होता सभापती मधोमधी उभा’…

बिरडं खाण्यात (पेणचे किंवा नागोठण्याचे कडवे वाल हं!) आमचं आयुष्य गेलं, पण आदल्या दिवशी वाल भिजत न घालता बिरडं कसं करतात ते आम्हाला माहीतच नव्हतं. ते (भांडय़ाच्या तळाशी थोडसं) आसावरी करून दाखवते. (अगं, आइं सी.के.पी.ना तुझी?) ते एकटय़ा अजयलाही पुरलं नसतं मग अभिजित राजे काय खाणार? अर्थात आसावरीनं केलेल्या पदार्थांची चव घेतल्याक्षणी त्याची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणे हा त्याचा बाणा असतो हे पुढे दर एपिसोडमध्ये कळतेच. आता फक्त आसावरीच्या हस्ते मिळालेल्या पाण्याला ‘ओ हो हो’ म्हणायचं राहिलंय. आत्तापर्यंतच्या भागात अभिजित हा शांत, मनमिळावू, बुळय़ा, पुचाट असाच दाखवलाय. बिचारे डॉ. गिरीश ओक काय करणार? ते मीरा रोडला राहतात. मुंबईत यायचं असेल तर कनवटीला दोन पैसे बांधता येतील यासाठी येतील त्या मालिका करणे त्यांना भाग आहे. पुढे मालिकेचं व आपल्या भूमिकेचं असं भज होणार हे, हे त्यांना तरी कसं कळणार? अनेक स्त्रियांना हा असा नवरा खूप आवडेल – म्हणजे बायकोचा शब्द न् शब्द स्लिपमधल्या चपळ क्षेत्ररक्षकाप्रमाणे झेलणे, पलंग रिकामा ठेवून खाली झोपणे, सासरी जाऊन स्वयंपाक व वाढणी करणे, बायकोच्या मुलाला लाखो रुपये उचलून देणे, (‘माझ्या बायकोचा मुलगा’ हे मालिकेच्या दुसऱ्या भागाचे नाव कसे वाटते?), बायकोपाठोपाठ पाळीव कुत्र्याप्रमाणे कोकणात जाणे, बायकोच्या सासऱयाला स्वतःचा सासरा मानणे, (‘तुझे माझे सासरे’ हे मालिकेच्या तिसऱया भागाचे नाव कसे वाटते?), स्वतःच्या रेस्टॉरंटमध्ये जाणे ऐच्छिक असणे, पैशाची ददात नसणे, पोटात पाय नसलेली गोगलगाय असणे (‘नवरा माझा नवसाचा’ हे मालिकेच्या चौथ्या भागाचे नाव कसे वाटते?)… मालिकेच्या प्रदीर्घ प्रवासात अभिजित राजे कधीतरी तलवार परजणं अशक्य नाही (‘शेफ’च्या हातात तलवार’ हे मालिकेच्या पाचव्या भागाचे नाव कसे वाटते?) या मालिकेवरून पुढेमागे नाटक किंवा सिनेमा बेतण्यात आला तर त्याचं नाव आत्ताच सांगून ठेवतो – ‘चप्पलचोर आणि बबडय़ा’. त्यात क्लायमॅक्सला चप्पलचोर बबडय़ाला (चोरलेल्या) चपलेनं मारतो असं दाखवलं जाईल.

निवेदिता सराफ आसावरीच्या भूमिकेत दूध पाण्यासारखी मिसळून गेल्येय. तिचा तो अतिबापुडवाणेपणा, गरीब गायीचा अवतार, मान वेळावून याचना करणे या सगळय़ाचा आता वीट आलाय. (अशोक सराफ हे कसं सहन करतो? ते टाळण्यासाठी तर तो ‘व्हॅक्युम क्लीनर’ या त्याच्या नाटकाचे सारखे प्रयोग लावत असतो का?) बाहुलीसारखी आसावरी व तिचा ताडमाड उंच सोंडय़ा मुलगा ही जोडी विजोड दिसते. जणू बोंबलाच्या पोटी शार्क मासा आलाय.
या सगळय़ा सर्कशीत फटाकडी तेजश्री प्रधान तेवढी खरी वाटते. शंभर नंबरी सोनं. रवी पटवर्धन (आजोबा) यांना नट चेहऱ्यावर भावपण आणतात हे कोणी सांगितलेलं दिसत नाही.

आता अजय मयेकर या रिंग मास्टरला काही प्रश्न विचारू या –
सुरुवातीच्या भागात प्रमुख भूमिकेत वाटणारा आजोबांचा पाठ खाजविण्याचा लाकडी हात नंतर कुठे गायब झाला? डॉ. ओकांनी त्यांची खाजाळू पाठ बरी केली का? तसं असेल तर डॉक्टरांचा तो पहिलाच पेशंट असावा.
बबडय़ासाठी खस्ता खाताना आसावरी त्याला बाटलीतून दूध पाजायला कशी विसरते? ती त्याला आंघोळही घालत नाही.
बबडय़ाचा काही लोक (विशेषतः वरच्या मजल्यावरची ढालगज भवानी ऊर्फ प्रज्ञा) उल्लेख सोहम किंवा ‘कोंबडीचा’ करतात.
बबडय़ा धादांत खोटं बोलत आहे व कारण नसताना शुभ्राला गोवत आहे हे माहीत असलेले आजोबा मूग गिळून का बसतात? सेटवर हे मूग का दाखवत नाहीत?
बबडय़ाचे पैशांचे अपव्यवहार, ए.टी.एम. कार्डाचा गफला पूर्णपणे माहीत असलेला अभिजित राजे त्यातलेच मूग खाऊन बसतात का?
शुभ्रा सतत झापत असतानाही प्रज्ञा आगावूपणाची परिसीमा कशी ओलांडत असते.?
बबडय़ानं नोकरी सोडल्येय हे घरात कोणालाच कसं कळत नाही?
जे दिसतंय म्हणजे तुम्ही लोक दाखवतायत ते पाहता शुभ्रा-सोहम यांचा घटस्फोट अपरिहार्य वाटत नाही का? की सोहम टोपी फिरवून एकाएकी आसावरीसारखा वागायला लागणार आहे? तो राजस्थानात आईचं मनगट पकडून तिला खेचकटत नेतो, ही भन्नाट आयडिया कोणाची? सोहम व आसावरी यातल्या कोणाच्या वागण्याचा जास्त वैताग करून घ्यायचा यावरून प्रेक्षकांत दुफळी पडावी, हा तुमचा हेतू आहे का?
अभिजित राजे हा आसावरीचा नवरा आहे की ‘पर्सनल अटेंडंट’ हे कसं ओळखायचं? विनंती केली तर आसावरीच्या परवानगीनं अभिजित आमच्याकडे बादलीनं जिन्यावरून पाणी भरायला येईल का?
अभिजितच्या तोंडी कायम ‘दत्ताजी ऐवजी ‘दत्ता’ कसं येतं? त्याला मेंदूनं अधू दाखवायचाय का? तरीच तो आसावरीला आवडतो.
‘आसावरीला लग्नाची हौस आहे’ असा आजोबा वारंवार आरोप करतात व एक बुजगावणं स्थळ म्हणून पुढे करतात तेव्हा ‘हौस नाही, फक्त अभिजित राजेंशी लग्न करायचंय’ हे आसावरी किंवा शुभ्रा का सांगत नाहीत? मालिका लांबवण्यासाठी का?
आसावरी नसताना बबडय़ाचा रुमाल, पाकीट, पायमोजे त्याला कोण काढून देतं? अजय मयेकर, तुम्ही का?
सख्खा पोटचा पोरगा इतक्या उलटय़ा काळजाचा कसा? असतात म्हणा, दाऊद इब्राहिम नाही का? पण त्यानंही आईला छळल्याचं ऐकिवात नाही.
तेजश्री प्रधान इथे (ही) लग्न करून फसल्येय/पस्तावल्येय असं दाखवण्याचं कारण?
जी आईसारखी काळजी घेते असं आजोबा तोंडानं म्हणतात त्या शुभ्रावर चिखल उडवला जातो तेव्हा ते तिच्या बाजूनं का उभे रहात नाहीत?
रवी पटवर्धन (आजोबा) कुठं राहतात ते कळलं असतं तर त्यांना गाठून ते वृद्धश्रमात नक्की कशासाठी गेले होते ते विचारून घेता आले असते.
पैसे परतीसाठी सोहमला दमदाटी करायला गुंड घरी येतात तेव्हा अभिजित राजे मध्ये पडतात. पुढे त्या गुंडांचं काय होतं? अभिजित त्यांना राजस्थानच्या सहलीला पाठवून देतो का? ते उंटावरचे शहाणे होतात का?
लग्न करून सतत माहेरी (म्हणजे पहिल्या सासरी) यायचं किंवा बॅग घेऊन राहिलाच यायचं (अभिजितराव आहेतच बॅग भरायला व आणून सोडायला) हा नवीन पायंडा आसावरी पाडताना दाखवल्येय का?
यानंतर तुम्हाला ‘अग्गोबाई सासूबाई’ बघायची नसेल तर मी सुचवतो त्यानुसार ‘सोनी’वर त्याच वेळेला असलेली ‘पतियाला बेब्ज’ ही हिंदी मालिका बघा लवकर, नाहीतर तिचीही ‘अग्गोबाई सासूबाई’ व्हायची.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या