पोलीस डायरी – नियोजनाचा अभाव की कुटील डाव

2908

>> प्रभाकर पवार

गेल्या आठवड्यात मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्यात स्थलांतरीत मजूर व त्यांच्या म्होरक्यांनी फारच गोंधळ घातला. गावी जाण्यासाठी ‘श्रमिक ट्रेन’ उपलब्ध करून दिली नाही. आम्हाला दिवसभर का रस्त्यात तिष्ठत उभे करून ठेवले असा सवाल करून पोलिसांनाच शिवीगाळ केली. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी 30 ते 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती शालिनी शर्मा यांची तडकाफडकी चेंबूर पोलीस ठाण्यात बदली केली आहे, तर चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयप्रकाश भोसले यांची नागपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही जरी अदलीबदली असली तरी मजुरांचे नेतृत्व करणार्‍या राजकीय पुढार्‍यांनी कोणतेही सबळ कारण नसताना शर्मा स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. नियमानुसार काम करतात. गैरकृत्य खपवून घेत नाहीत म्हणून केवळ असूयेपोटी त्यांच्या बदलीसाठी सरकार व पोलीस आयुक्तांवर दबाव आणून त्यांची नागपाड्यातून उचलबांगडी केली. त्यामुळे या देशात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍यांना वनवास आहे हेच या बदली प्रकरणावरून दिसते. शालिनी शर्मा यांना पोलीस आयुक्तांनी त्यांना चांगली पोस्टींग दिली परंतु पोलीस ठाण्यात गोंधळ घालणार्‍यांना बळ दिले एवढे नक्की. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पोलीस आधीच भयभीत झाले आहेत. कुणी मानवप्राणी दिसला की बर्‍याच जणांना पाठ फिरवावीशी वाटते तर बहुसंख्य पोलीस जीवावर उदार होऊन लोकांना मदत करतात त्यामुळेच आज माणुसकी जिवंत आहे. या सेवाभावी पोलिसांना, महाराष्ट्र सरकारला कसे अडचणी आणता येईल. गोंधळ होऊन त्यांना त्रास कसा होईल, पोलिसांसह सरकार कसे बदनाम होईल याचे पद्धतशीर नियोजन केंद्रीय रेल्वे प्रशासनाने केले होते.

मुंबईसह महाराष्ट्रातून 822 विशेष श्रमिक ट्रेनद्वारे आतापर्यंत 11 लाख 86 हजार 212 परप्रांतीय कामगारांना स्वत:च्या राज्यात पाठविण्यात आले आहे. ही सारी व्यवस्था करताना मुंबई पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. मजुरांशी प्रत्यक्ष संबंध आल्यामुळे अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. कोरोनामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील 27 पोलिसांचे आतापर्यंत बळी गेले आहेत तर 2 हजाराच्यावर पोलिसांना लागण झाली आहे. तरीही पोलिसांनी आपले काम थांबविले नाही. परंतु केंद्रीय रेल्वेच्या असहकार्यामुळे मात्र मुंबई पोलिसांची झोप उडाली. गाडी कधी आणि कुठून सुटणार हे जाहीर झाल्यावर संबंधित पोलीस ठाण्यांना कळविले जाते. त्याप्रमाणे अर्ज केलेल्या मजुरांना कोणत्या तरी एका मोकळ्या जागेत बोलविणे तेथून त्यांची पोलिसांमार्पâत रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी बसेसची व्यवस्था केली जाते. प्रवासामध्ये लागणारे खाद्यपदार्थ, पाणी आणि वस्तूंचा पुरवठाही करणे ही कामे पोलिसांवरच सोपविण्यात आली होती. पोलिसांनी ती पूर्ण केली. परंतु रेल्वेने दाखविलेल्या असहकार्यामुळे, संकुचितपणामुळे मुंबई पोलिसांना फारच मनस्ताप सहन करावा लागला. गाडी कधी सुटणार याची माहिती रेल्वेने 24 तास अगोदर पोलिसांना देणे बंधनकारक होते परंतु रेल्वेने कायम रात्री दोननंतर दुसर्‍या दिवशीचे वेळापत्रक पोलिसांना देऊन पोलिसांची गोची केली होती. रेल्वेने बर्‍याच वेळेला अचानक ट्रेन रद्द करून पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मजूर व पोलिसांमध्ये वाद निर्माण झाले. त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्कीही करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारख्या बड्या रेल्वे स्थानकावर एकच तिकीट काऊंटर तसेच रेल्वेस्थानकाचे गेट उघडून मजुरांमध्ये गोंधळ व चेंगराचेंगरी होईल अशीही व्यवस्था रेल्वेने करून ठेवली होती. परंतु पोलिसांनी दाखविलेल्या संयमामुळे योग्य नियोजनामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली. ट्रेन रद्द झाल्यामुळे पुन्हा प्रवाशांना बसमध्ये बसवून त्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणी सोडणे, परत दुसर्‍या दिवशी रेल्वे स्थानकापर्यंत आणून त्यांना ट्रेनमध्ये बसविण्याचे काम पोलिसांना करावे लागले. हा पोलिसांसाठी अत्यंत क्लेशदायक प्रकार होता. पश्चिम बंगाल सरकारने 26 मे रोजी ट्रेन सोडू नका असे लेखी कळवूनही रेल्वेने ट्रेनची व्यवस्था केली. त्यामुळे पोलिसांना आयत्या वेळेला मजुरांची शोधाशोध करून त्यांना रेल्वे स्थानकात आणून ट्रेनमध्ये बसविण्यात आले. उत्तर प्रदेशमध्ये सोडण्यात आलेली व प्रवाशांनी भरलेली एक ट्रेन तर ओडीसाला पोचली. यावरून रेल्वेचा कारभार किती नियोजनशून्य होता, महाराष्ट्र सरकार व पोलिसांना नाहक त्रास देणारा होता हे दिसून आले. यामागे राजकारण व संबंधितांचा कुटील डाव असल्याचे सांगण्यात येत आहे.

वांद्रे येथे हजारो परप्रांतीयांना जमा करून तेथे दंगल माजविण्याचा प्रयत्न फसल्यावर स्थलांतरित मजुरांना भडकवून दंगल माजविण्याचा मोठा कट होता, परंतु तोही फसला. आता कोरोनाही आटोक्यात येऊ लागल्याने महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे डाव निष्फळ झाले आहेत. 12 लाख मजुरांना आपआपल्या गावी सुरक्षितपणे पाठविणे हे मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान होते ते त्यांनी यशस्वीपणे पेलले आहे त्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन. ज्यांना आपआपल्या गावी पाठविण्यात आले आहे त्या मजुरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र सरकार व पोलिसांचे जाहीरपणे आभार मानले आहेत हेही नसे थोडके.

आपली प्रतिक्रिया द्या