>> माणिकराव खुळे
मुंबईत अलीकडे पूर्वीसारखा अधिक तीव्रतेचा पाऊस होताना जाणवत नाही. त्यामुळे सरासरी पावसाचे दिवस कमी झाले आहेत. हे जरी असले तरी मान्सून काळातील एखादी प्रणाली, ‘ला–निना’चे वर्ष, धन आयओडी व त्याच वेळेस विषुववृत्तावरून, भारत महासागरीय क्षेत्रावरून मॅडन ज्युलियन ओसिलेशनचे मार्गक्रमण या सर्व वातावरणीय घटना जुलै व ऑगस्ट महिन्यांत एकत्रित जुळून आल्या तर मुंबईमध्ये पाऊस धुमाकूळ घालू शकतो.
मुंबईत मुख्यत्वेकरून तीन प्रणालींतून सर्वाधिक पाऊस होतो.
जून ते सप्टेंबर… चार महिन्यांत जेव्हा आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे समुद्रसपाटीपासून अधिक उंचीपर्यंतचा व अधिक रुंदीचा (जाडीचा) हवेच्या निर्वात पोकळीचा कमी दाबक्षेत्राचा पट्टा म्हणजेच ‘मान्सूनचा आस’ देशाच्या मध्यावरून जातो. तो आस जेवढा देशाच्या मध्यावर किंवा दक्षिणेकडे म्हणजे 23 डिग्री अक्षवृत्तादरम्यान असतो तेवढा अधिक पाऊस मुंबईत पडतो.
अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टी म्हणजे गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर व मुंबईच्या ईशान्य दिशेला भूभागावर म्हणजे नैऋत्य मध्य प्रदेशदरम्यान कमी दाबक्षेत्र व त्यातून तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे मुंबईत जोरदार पाऊस होतो.
तिसरी प्रणाली म्हणजे अरबी समुद्रात गुजरात ते केरळ पश्चिम किनारपट्टीत समुद्रसपाटीपासून साधारण दीड किमी उंचीपर्यंतचा हवेच्या कमी दाबक्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजेच इंग्रजी V अक्षरासारखा द्रोणीय तटीय आस म्हणजेच त्याला ‘ऑफशोर ट्रफ’ म्हणतात. तो तयार झाला तर मुंबईत जोरदार पाऊस होतो.
मुंबईत अलीकडे पूर्वीसारखा अधिक तीव्रतेचा पाऊस होताना जाणवत नाही. त्यामुळे सरासरी पावसाचे दिवस कमी झाले आहेत. हे जरी असले तरी वर सांगितलेली मान्सून काळातील एखादी प्रणाली, ‘ला-निना’चे वर्ष, धन आयओडी व त्याच वेळेस विषुववृत्तावरून, भारत महासागरीय क्षेत्रावरून मॅडन ज्युलियन ओसिलेशनचे मार्गक्रमण या सर्व वातावरणीय घटना जुलै व ऑगस्ट महिन्यांत एकत्रित जुळून आल्या तर मुंबईमध्ये पाऊस धुमाकूळ घालू शकतो व पूरपरिस्थिती अशाच वेळी निर्माण होते. अन्यथा नाही.
मुंबईत अलीकडच्या काळात वातावरणातील बदलामुळे पावसाचे प्रमाण वाढले आहे, असे विनाकारण व अविवेकी विचारातून भासवले जात आहे. खरं तर मुंबईत वाढलेली मानवी व सिमेंट जंगलाची घनता, रस्त्याच्या क्षेत्रफळापेक्षा मुंबईत धावणाऱ्या एकूण वाहनांचे तळाचे एकत्रित क्षेत्रफळ जास्त जाणवू लागले आहे. त्यामुळे दरवर्षी पडणारा सामान्य पाऊसही अतिवृष्टीचा निर्देशक ठरू लागला आहे.
साधारण 10 जूनच्या आसपास मान्सून मुंबईत पोहोचतो. त्यात 3 ते 5 दिवस अगोदर मान्सूनपूर्व गडगडाटी, वळीव स्वरूपातील पाऊस कोसळतो. म्हणजे मान्सून कालावधीतील जूनच्या महिन्यात प्रत्यक्षात केवळ 20 ते 25 दिवसच मिळतात आणि त्यातही कधी कधी उशिराने मान्सूनचे आगमन, शिवाय सुरुवातीचा मान्सून प्रवाहातील कमकुवतपणा इत्यादी कारणांमुळे जून महिन्यात पाऊस कमी होतो.
अलीकडील 30 वर्षांच्या आकडय़ावर आधारित मुंबईतील जून महिन्यातील कुलाब्याची पावसाची सरासरी 50. 6 तर सांताक्रूझची 52.6 सेंमी आहे. या 25 दिवसांपैकी प्रत्यक्षातील एकूण पावसाचे दिवस पाहिले तर ते सरासरी चौदाच दिवस आहेत. म्हणजे दोन्ही केंद्रावरील सरासरीचा एकत्रित विचार केला तर मुंबईची जून महिन्यातील पावसाची सरासरी 51.6 सेंमी असते.
हवामान शास्त्राच्या आधारे विचार केल्यास या वर्षी 2024 जून महिन्यात मान्सूनचे आगमन वेळेपेक्षा आगाऊ झाले तरी एल-निनो ते एन्सो तटस्थतेचा संक्रमण काळ असल्यामुळे जून महिन्यातील पावसात विशेष वाढ होण्याची शक्यता कमीच जाणवते. कदाचित उलट सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. तरीदेखील जून महिन्यात 20,21,22, 23 जूनदरम्यान अधिक पावसाची अपेक्षा करू या.
मुंबईत सगळ्यात जास्त पाऊस हा जुलै महिन्यात पडतो, परंतु ला-निनाच्या या वर्षात ला-निनाच्या विशेष परिणामांची शक्यता नसल्यामुळे मुंबईत पुराची शक्यता जाणवणार नाही. तरीदेखील जुलै महिन्यात 4 ते 7, 18 ते 21 व 31 जुलैदरम्यान पावसाची शक्यता जाणवते.
जुलै महिना मुंबईसाठी सर्वाधिक पावसाचा जरी असला तरी या वर्षी ऑगस्ट महिना हा ला-निनाच्या सक्रियतेचा आणि आयओडी धन ध्रुवितेचा कालावधी असण्याची शक्यता आहे. शिवाय 2024 चा मान्सून 106 टक्के शक्यतेचा आहे, परंतु पावसाचे खंडही ऑगस्ट महिन्यात जाणवतात.
मुंबईतील ऑगस्ट महिन्यातील कुलाब्याची पावसाची सरासरी 47. 2 तर सांताक्रूझची 56 सेंमी आहे. ऑगस्टच्या 31 दिवसांपैकी प्रत्यक्षातील एकूण पावसाचे दिवस पाहिले तर ते सरासरी अनुक्रमे 20.2 व 21.4 च दिवस आहेत. म्हणजे दोन्ही पेंद्रांवरील सरासरीचा एकत्रित विचार केला, तर मुंबईची ऑगस्ट महिन्यातील पावसाची सरासरी 51. 6 सेंमी, तर सरासरी पावसाचे दिवस 20. 8 असतात.
या वर्षी 2024 च्या ऑगस्ट महिन्यात कदाचित मुंबईत सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 55 सेंमी पावसाची, तर 22 पावसाळी दिवसांची किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात 1 ते 4, 15 ते 19, 29, 30, 31 दरम्यान पावसाची शक्यता जाणवते.
सप्टेंबर महिन्यात ला-निना पूर्णपणे सक्रिय जरी असला तरी सप्टेंबरच्या शेवटी शेवटी आयओडी ऋणतेकडे झुकणार असल्यामुळे त्याचाही काहीसा परिणाम पावसावर होऊन पाऊस कमी होऊ शकतो, परंतुला ला-निनाचा प्रभाव जर अधिक राहिला व शिवाय 2024 चा मान्सून 106 टक्के शक्यतेचा असल्यामुळे सप्टेंबर 2024 च्या महिन्यात मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो.
मुंबईतील सप्टेंबर महिन्यातील कुलाब्याची पावसाची सरासरी 35. 6 तर सांताक्रूझची 38.4 सेंमी आहे. सप्टेंबरच्या 30 दिवसांपैकी प्रत्यक्षातील एकूण पावसाचे दिवस पाहिले तर ते सरासरी अनुक्रमे 14 व 14. 4 च आहेत. म्हणजे दोन्ही पेंद्रांवरील सरासरीचा एकत्रित विचार केला तर मुंबईची सप्टेंबर महिन्यातील पावसाची सरासरी 37 सेंमी तर सरासरी पावसाचे दिवस 14.2 असतात. या वर्षी 2024 च्या सप्टेंबर महिन्यात कदाचित मुंबईत सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 40 सेंमी पावसाची तर 16 पावसाळी दिवसांची किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते. सप्टेंबर महिन्यात 1, 12 ते 16, 25 ते 29 दरम्यान पावसाची शक्यता जाणवते.
या वर्षी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये डोकावणारा ‘ला-निना’ पूरसदृश स्थिती तयार करू शकतो असे वाटते. आजमितीला अरबी समुद्रावरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे बळकट मान्सुनी वारे वाहण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसासाठी विशेष अशी कोणतीही तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली जाणवत नाही. त्यामुळे मुंबईसह कोकणात 20 जूनपर्यंत मध्यम पावसाची शक्यता जाणवते. 21 जूनला वातावरणातील प्रणाली बघूनच मुंबईतल्या मान्सुनी पावसाबद्दल भाष्य करता येईल.
(लेखक ज्येष्ठ हवामान तज्ञ आहेत)