मुद्दा : मातृभाषेसाठी कार्यशाळा 

1248

>> ज्ञानेश्वर भि. गावडे

इंग्रज देश सोडून गेले, परंतु इंग्रजी भाषा येथेच सोडून गेलेले आहेत. कित्येकांना तर हिंदुस्थान ऊर्फ इंडिया हा इंग्लिश भाषिक देश वाटतो. आंतरराष्ट्रीयदृष्टय़ा तशीच समज झालेली आहे. एक दुसऱयाशी मातृभाषेत बोलतानाही हाय, हॅलो, थँक्स, सॉरी, किप इट अप आदी इंग्रजी शब्द वारंवार बोलण्यात येतातच. संभाषण वा मुलाखतीत अधूनमधून इंग्रजी शब्दांची पेरणी केली तरच त्याला वेल-एज्युकेटेड समजतात. एखाद्याने मातृभाषेतील शब्दांचा वा वाक्याचा वापर केला तर त्याची अडाणी व गावठी म्हणून संभावना तर होतेच, त्याशिवाय त्याची टिंगल वा हेटाळणी केली जाते. न्यायालयात, सरकारी कामकाजात, उच्च सरकारी नोकऱयांत, खासगी व निमखासगी आस्थापणात इंग्रजी भाषेचा वरचष्मा आहे. मागे एका चित्रवाहिनीने शुद्ध मातृभाषेत बोलण्याची स्पर्धा लावली होती. तेव्हा हिंदुस्थानी मंडळी इंग्रजी भाषेच्या किती आहारी गेले त्याचे विदारक दर्शन घडले होते. खेडोपाडी, आडमार्गावरदेखील दुकानांच्या व रस्त्यांच्या पाटय़ा इंग्रजीत असाव्यात असा भ्रम आहे.

लहानपणापासून हिंदुस्थानी कुटुंबांची परंपरा, खानदान, रीतीरिवाज, निजधर्म सांभाळायची गरज आहे. मनोवैज्ञानिक व शिक्षणतज्ञ यांच्या म्हणण्यानुसार बालकांची पहिली दहा वर्षे मन व हृदय अतितीक्रतेने विकसित होत असते. आकलन वा ग्रहणशक्ती चांगली सुधारत असते. त्याच काळात बालकांचे सर्वात जास्त सान्निध्य आईशी असते, संतानावर संस्कार, संस्कृती, संगोपण आदीची जबाबदारी आईवरच येते. आई म्हटलं की बालपण आठवते आणि मम्मा म्हटले की बालपण आटवावे लागते. दुर्दैवाने सध्याचा काळ तसा चालू आहे. कल्पनाशक्ती, संस्कार, जीवन मूल्ये समजण्यासाठी आईचा म्हणजेच मातृभाषेचा वापर होतो. मातृभाषेचा वापर म्हटले की, आजूबाजूचे वातावरण मातृभाषामय असले पाहिजे, परंतु आपल्या इंडियात शहराप्रमाणेच खेडय़ापाडय़ात, ग्रामीण भागात, छोटय़ा-मोठय़ा शहरांप्रमाणेच रस्त्यांच्या, वस्तीच्या, दुकानांच्या, संस्थांच्या पाटय़ा आवर्जून इंग्रजी भाषेत दिसतात. तेथे मातृभाषेला दुय्यम स्थान आढळते. म्हणून मातृभाषा वाचविण्यासाठी हिंदुस्थानात नव्हे इंडियात मातृभाषेसाठी वर्कशॉप (कार्यशाळा) घेण्याची वेळ आली तर आश्चर्य वाटायला नको.

आपली प्रतिक्रिया द्या