>> ड़ॉ स्ट्रेंज
एलियन्सवर आधारलेले चित्रपट हे अगदी हटके अनुभव देतात आणि असाच एक नितांत सुंदर चित्रपट म्हणजे 2016 साली प्रदर्शित झालेला Arrival. यातील प्रमुख पात्र डॉ. लुईस ही भाषातज्ञ आणि महाविद्यालयात शिकवणारी साधी महिला. या लुईसच्या स्वप्नांचा संबंध एलियन्सशी कसा असू शकतो हे उलगडणारा हा चित्रपट. वेगळ्या धाटणीचे हे कथानक बघण्यात एक वेगळी मजा आहे.
एलियन अर्थात परग्रहवासीयांवर आधारित चित्रपटाचा एक ठरलेला पॅटर्न असतो. अंतराळातील एखाद्या अपघाताने माणूस अनोळखी ग्रहावर पोहोचतो आणि त्याचा सामना एलियन्सबरोबर होतो किंवा अचानक एलियन्स पृथ्वीवर आपले यान घेऊन हजर होतात आणि सर्व जगाला चिंतेत टाकतात. मग पुढे येणारा संघर्ष, एलियन्सचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विरुद्ध मानवाची जिद्द आणि मग शेवटी प्रचंड संघर्षानंतर मानवाचा विजय असे साधारण हे कथानक असते. मात्र काही काही एलियन्सवर आधारलेले चित्रपट हे अगदी हटके अनुभव देतात आणि असाच एक नितांत सुंदर चित्रपट म्हणजे 2016 साली प्रदर्शित झालेला Arrival!
चित्रपटाची नायिका डॉ. लुईस ही एक भाषातज्ञ आणि महाविद्यालयात शिकवणारी एक साधी महिला आहे. या सरळमार्गी लुईसच्या आयुष्यातील मोठी अडचण म्हणजे तिला बरेचदा होणारे भास-आभास. तिला बरेचदा ती आई झाल्याचे आणि तिच्या मुलीला कॅन्सर झाल्याचे स्वप्न पडत असते. लहान वयात मुलीला गमवायचे दुःख तिला स्वप्नातदेखील जाणवत असते. प्रत्यक्षात मात्र लुईस अजूनही अविवाहित असते. देशात अर्थात अमेरिकेत आणि जगभरातील इतर 11 देशांत अशा मिळून एकूण 12 ठिकाणी एलियन्सच्या तबकडय़ा अर्थात यान दाखल होतात आणि जगभरात एकच गदारोळ माजतो. अनेक देश त्यांच्या देशात लॉकडाऊन जाहीर करतात.
पृथ्वीवर दाखल झालेले हे एलियन्स यानाच्या बाहेर पडत नसतात आणि हल्लादेखील करत नसतात. त्यामुळे त्यांचे पृथ्वीवर येण्यामागचे नक्की कारण काय याचा उलगडा कोणालाच होत नसतो. अशा वेळी या सर्व 12 देशांनी मिळून एकत्रिपणे या प्रकरणात पुढे जायचे आणि एकमेकांना आपली प्रगती कळवत राहायचे असे ठरते. याचसंदर्भात कर्नल वेबर हा लुईसची मदत मागण्यासाठी येतो. लुईसने यापूर्वीदेखील एका प्रकरणात सैन्याची मदत केलेली असते. या एलियन्सबरोबर संवाद साधण्यासाठी सैन्याने त्या यानाजवळ एक बेस कँप उभारलेला असतो. सर्व यंत्रणांनी सुसज्ज अशा या कँपवर लुईस दाखल होते. तिथे तिची भेट इयान या जीवशास्त्रज्ञाशी होते, तो तिला तिच्या कामात मदत करणार असतो.
एका लिफ्टच्या माध्यमातून लुईस आणि इयान एका पथकासह एलियन्सच्या यानात दाखल होतात व वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू करतात. विचित्र आकाराचे सात पाय असलेले दोन एलियन्सदेखील त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी उत्सुक असतात. काही दिवसांत लुईसला लिखाणाच्या माध्यमातून संवाद साधण्याच्या प्रयत्नांना यश येते. मात्र ज्याप्रमाणे आपण शब्दांच्या माध्यमातून संवाद साधतो, तसे एलियन्स गोल आकाराची चिन्हे बनवून उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची ही भाषा तिथे कोणालाच उमगत नाही. मग त्यांची ही भाषा डीकोड करण्याचा प्रयत्न लुईस आणि इयान सुरू करतात. हळूहळू त्यांना त्यामध्ये यशदेखील मिळू लागते आणि एखाद्या वाक्याची देवाणघेवाणदेखील सुरू होते.
थोडाफार मोडकातोडका संवाद साधण्यात यश आल्यानंतर लुईस संपूर्ण जगाला पडलेला प्रमुख प्रश्न एलियन्सना विचारते की, ते इथे पृथ्वीवर कशासाठी आले आहेत? त्यावर एलियन्सच्या सांकेतिक भाषेत त्यांच्याकडून ‘यूज वेपन’ अर्थात ‘शस्त्र वापरा’ असे उत्तर मिळते आणि संपूर्ण जग हादरते. एलियन्स आपल्याला शस्त्र वापरून युद्धाला सुरुवात करण्यास सांगत आहेत असा अर्थ सर्व देश काढतात आणि युद्धाची तयारी सुरू करतात. चीन या सर्वात आघाडीवर असतो. चीन आणि त्याच्या मागोमाग सर्व देश एकमेकांशी सुरू असलेली माहितीची देवाणघेवाण थांबवतात व एलियन्सविरुद्ध एकटय़ाने लढायला सज्ज होतात. अमेरिका तर एक पाऊल पुढे टाकत एलियन्सच्या यानात टाइम बॉम्बचा स्फोटदेखील घडवून आणते. लुईस मात्र या उत्तरामागे वेगळाच आणि अत्यंत महत्त्वाचा अर्थ दडलेला आहे यावर ठाम असते.
यानंतर काय घडते? संपूर्ण जग युद्धाच्या खाईत लोटले जाते का? या सगळ्याशी लुईसचा आणि तिच्या स्वप्नाचा काय संबंध असतो ते पडद्यावर उलगडताना बघण्यात एक वेगळी मजा आहे. तिचा अनुभव नक्की घ्या!