मुद्दा : युरोपचा बदलणारा धार्मिक रंग

>> ज्ञानेश्वर भि. गावडे

पॅलेस्टाईन, बांगलादेश, बुनोई, इंडोनेशिया या देशांतील बहुसंख्य मुस्लिम मंडळी पाकिस्तान, इराक, अफगाणिस्तान आदी देशांतील व त्या जवळच्या अशांत राजकीय परिस्थितीला कंटाळून आपली मालमत्ता विकून युरोपमध्ये स्थलांतरित होत असल्याचे आढळत आहे. तशात इराण, सौदी अरेबिया यांच्यातील भांडणात आणि सीरियातील गोंधळातील राजकीय वर्चस्वाची मारामारी ऐकून आणि तिसऱ्या जागतिक युद्धाची चाहूल पाहून बरीच मुस्लिम मंडळी आपल्या देशातील आहे ती मालमत्ता विकून देश सोडून युरोप खंडाच्या आश्रयाला गेली आहेत. सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक व इतिहासकार वर्नाड लेविस यांनी अशा परिस्थितीकडे पाहून आणखी तीस वर्षांत सन 2050 मध्ये युरोपवर इस्लामी वर्चस्व येण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. कारण वेगळे असले तरी रशियातसुद्धा चेचेन्यासारखा प्रांत बहुसंख्य मुस्लिम असल्यामुळे वेगळय़ा राष्ट्राची मागणी करीत आहे. युरोपमध्ये मुस्लिम प्रभाव हळूहळू वाढत असल्यामुळे तो चटकन कुणाच्या लक्षात येत नाही. परंतु काही नजरेत भरणारी उदाहरणे पाहिली तरी बेल्जियम, फ्रान्स, इटली आणि स्पेन आदी देशांत मुस्लिम प्रभाव वाढलेला आहे. फ्रान्समध्ये व जर्मनीमध्ये प्रत्येकी बावीस लाख मुस्लिम नागरिक आहेत. ग्रेट ब्रिटनमध्ये 14 लाख मुस्लिम आहेत. श्रद्धाळू येत नाहीत म्हणून लंडनच्या परिसरातील सुमारे पाचशे चर्च बंद पडल्याच्या बातम्या आहेत. याउलट त्याच परिसरात 423 नव्या मशिदी उभ्या राहिल्या आहेत, यावरून काय समजायचे ते समजावे. स्थलांतरित निर्वासितांतून स्वस्त मजूर पुरेशा संख्येने मिळतात तर मूळ रहिवाशांचा जन्मदर घसरत चालल्याचे दिसत आहे. लोकसंख्येचे प्रमाण अशा तऱहेने बदलायला लागलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या