ठसा – प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  भगवान परळीकर

मी प्राध्यापक असलो तरी प्रथम उपासक आहे, असे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि गुरुदेव रानडे संप्रदायातील अनुग्रहीत साधक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे विनम्रपणाने सांगत असत. अत्यंत सत्शील, चारित्र्यसंपन्न असे त्यांचे लोभस व्यक्तिमत्त्व होते. आपल्या रसमय वाणीने विद्यार्थी-विद्यार्थिंनीना मंत्रमुग्ध करणारा एक व्यासंगी प्राध्यापक अशी त्यांची ओळख होती.त्यांचे आजोबा शंकर महादेव कुंटे यांनी परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांचा अनुग्रह मिळाल्याने त्यांच्या घराण्यात दत्त भक्ती रुजली. त्यांचे ऋण जपण्यासाठी त्यांनी दिलेली दत्त मूर्ती महाड येथे स्थापन केली आहे. वडील सदाशिव कुंटे यांना गुरुदेव रानडे यांचा अनुग्रह मिळाला. त्यामुळे लिंबाळच्या गुरुदेव रानडे परिवाराचे पाईक आहोत, असे ते आवर्जून सांगत असत. थोर तत्त्वज्ञान व साक्षात्कारी संत प्रा. डॉ. रा. द. तथा गुरुदेव रानडे यांच्याविषयी प्रा. नरेंद्र कुंटे यांनी विपुल लेखन केले. गुरुदेव रानडे यांची सांप्रदायिक व समन्वयाची दृष्टी त्यांना आदर्श वाटत होती. ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.नरेंद्र कुंटे यांनी चिं.त्र्यं. खानोलकरŠ कविता-कादंबरी या विषयावर पीएच.डी.केली. गुरुदेव रानडे Š चरित्र व साधना मार्ग, भाऊसाहेब महाराज उमदीकर Š चरित्र व साधनाबोध, नित्यक्रम व उपासना, अक्कलकोट स्वामी, बुद्धिग्रामीचे मुनिश्वर-अक्कलकोट स्वामी, मना सज्जना, अमृतानुभव प्रवचने, धुंडा महाराज देगलूरकर, रामचिंतन, ज्ञानेश्वरीतील भक्तिसंवाद, नामसाधनेचा भक्तिप्रवाह, श्री गुरुदेव रानडे प्रणीत अध्यात्मचिंन दत्त कृपेचा भक्ती प्रबोध, साय देवाशी रक्षिले गुरूंनी अशी सुमारे 50हून अधिक पुस्तके त्यांची यापूर्वी प्रकाशित झाली आहेत. अनेक पुस्तकांचे लेखनही सुरू होते. तर काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर असतानाच प्रा. नरेंद्र कुंटे यांनी जगाचा निरोप घेतला. दत्त संप्रदाय, समर्थ उपासना, रामदास स्वामी, साहित्य प्रसार, नाथ भागवत भक्ती महिमा, श्री गजानन विजय भक्ती योग, योगवसिष्ठ यावरील त्यांची पुस्तके त्यांच्या विद्वत्तापूर्ण भक्तिभावाची साक्ष देतात. स्व. दा.का.ऊर्फ भाऊ थावरे यांच्या आग्रहावरून त्यांनी गुरुवर्य धुंडा महाराज देगलुरकर यांच्या पुणे विद्यापीठात झालेल्या अमृतानुभव ग्रंथावरील प्रवचनांचे पुस्तक प्रकाशित केले होते. प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचा जन्म 23 डिसेंबर 1945 मध्ये विजयपूर जिह्यातील जमखंडी येथे झाला. 1956 साली कुंटे कुंटुबीय सोलापुरात आले. भागवत टॉकिजमधील न्यू हायस्कूलच्या प्रशालेत ते शिकत होते. संगमेश्वर महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रारंभीच्या काळात 1971 ते 80 च्यादरम्यान त्यांनी स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट नगरीतील अक्कलकोट महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा केली. त्यानंतर 1980 ते 2005 पर्यंत सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. एमफिल व पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले. 1963 ते 70 या कालावधीत त्यांनी दैनिक ‘समाचार’ आणि ‘संचार’ या वृत्तपत्रांत सहसंपादक म्हणून काम केले. गेली 40 वर्षे अनेक दैनिकांतून संत साहित्य आणि संतांचे चरित्र यावर सातत्यपूर्ण लेखन केले. ते अखेरच्या घटकेपर्यंत सुरूच होते. प्रा. नरेंद्र कुंटे यांनी शेवटच्या घटकेपर्यंत संतांची शिकवण समाजात रुजविण्याचे काम केले. साहित्य आणि आध्यात्मिक क्षेत्रातील सेवेबद्दल प्रा.डॉ.नरेंद्र कुंटे यांना श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड यांचा श्री समर्थ रामदास स्वामी पुरस्कार, श्रीपाद सेवा मंडळ,पुणे यांचेकडून परमपूज्य योगीराज द.तथा मामासाहेब देशपांडे, उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, संत साहित्य सेवेबद्दल प.पू.दासराम महाराज केळकर, सांगली यांचा विशेष पुरस्कार, सनातन धर्म संस्था यांचा देवश्री नारद पुरस्कार याचबरोबर महाराष्ट्र शासन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या जन्म दिनी मराठी भाषा गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. संत वाङ्मयावर लेखन, व्याख्याने, प्रवचने करीत असतानाच त्यांनी सलग 24 वर्षे अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने धर्मसंकीर्तनाचे महोत्सवाचे आयोजन करीत होते. देवस्थानचे माजी विश्वस्त स्व. बाळासाहेब इंगळे यांचा त्यांच्याशी विशेष जिव्हाळा होता. धर्मसंकीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून गायन, संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांना सेवेची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. यामुळे आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक लोक त्यांच्याशी कळत न कळत जोडले गेले. सोलापुरातील धार्मिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. आजच्या विज्ञान युगातही डॉ. नरेंद्र कुंटे यांनी साहित्य व आध्यात्मिक क्षेत्रातील गाढय़ा अभ्यासातून भक्तीमार्गाचा अर्थ समजावून दिला. स्वामी समर्थाचे चरित्र, कार्य आणि अनुभूती याविषयीची माहिती देणारी स्वामी प्रबोध ही दैनिक ‘सामना’च्या वतीने प्रकाशित झालेली त्यांची लेखमाला स्वामी भक्तांना वैचारिक पर्वणी ठरली. त्यानंतर या लेखमालेचे पुस्तकात रूपांतर करण्यात आले. स्वामी समर्थांच्या संदर्भातील त्यांचे कार्य अनमोल आहे. प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांच्या निधनाने संत साहित्याचा ज्येष्ठ अभ्यासक हरपला आहे.