
>> दिलीप देशपांडे
नवीन वर्षात आपण काही वेगळे, चांगले करू शकतो. हा ‘संकल्प’ करणे महत्त्वाचे आहे. नुसतेच ठरवून काहीही होत नाही आणि होत नसते. म्हणूनच संकल्प करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या समाजाचेही काही देणे लागतो. नवीन वर्षात सरकारनेही, भ्रष्टाचारमुक्ती अभियान, स्वच्छता अभियान, प्लॅस्टिक मुक्ती अभियान, वृक्षारोपण अभियान, बेटी बचाव-बेटी पढाव अभियान, हे अधिक गतिमान करण्याचा संकल्प करायला हवा.
नववर्षाच्या आगमनाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. नववर्षात प्रत्येक जण काहीतरी करायचे ठरवीत असतो. कोणाला टू व्हीलर घ्यायची असते तर कोणाला फोर व्हीलर. कोणाला नवीन फ्लॅट, काही वस्तू खरेदी, तर काहींनी पर्यटनाचा बेत आखला असतो. अशा एक ना अनेक गोष्टी ठरवल्या जातात. या झाल्या वैयक्तिक गोष्टी, पण आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या समाजाचेही काही देणे लागतो. अर्थातच आपली काही सामाजिक जबाबदारी आहे, याचीसुध्दा जाणीव मनात असणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने हे वर्ष संपत असताना, नवीन वर्षात आपण त्या दृष्टिकोनातून काही वेगळे, चांगले, करू शकतो का? हे ठरवणे, अर्थातच ‘संकल्प’ करणे महत्त्वाचे आहे. नुसतेच ठरवून काहीही होत नाही आणि होत नसते. म्हणूनच संकल्प करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आपण शुभकार्याचा संकल्प सोडतच असतो. तद्वतच सामाजिक भान, जबाबदारी म्हणूनही काही संकल्प करणेही आवश्यक आहेत.
- भ्रष्टाचाराची झळ आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पोहोचते. भ्रष्ट मार्गाने काम करून घेणार नाही, भ्रष्टाचार करणाऱयांच्या विरोधात न डगमगता तक्रार करून भ्रष्टाचार निर्मूलन अभियानात सहभागी होण्याचा संकल्प करूया.
- रस्त्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक जागी धूम्रपान करणे, गुटखा पुडय़ा टाकणे, अस्वच्छता करणे टाळून स्वच्छता अभियानात सहभाग देण्याचा संकल्प करूया.
- रस्त्यावर वाहन उभे करून अडथळा निर्माण करणे, कार्यक्रमात डी.जे.सारखी वाद्ये वाजवून ध्वनिप्रदूषण करणे, वृक्षतोड करणे टाळून, एखादा वृक्ष आपल्या दारी किंवा शेतात लावून वृक्षारोपण कार्यक्रमास सहभाग देण्याचा संकल्प करूया आणि पर्यावरण समतोल राखण्याचा प्रयत्न करू.
- स्त्री भृणहत्या , स्त्राrअत्याचार विरोधात काम करू.
- वर्षात काही चांगले ग्रंथ जसे दासबोध, ज्ञानेश्वरी, संतचरित्रे, वाचूया. वाढदिवस, मंगलकार्यात भेटवस्तू म्हणून एखादे चांगले पुस्तक भेट देण्याचा संकल्प करू.
आज संस्कारमूल्ये नष्ट होत आहेत, नैतिकतेचा ऱहास होताना दिसतोय. आनंद मिळविण्यासाठी जो मार्ग वर्षाअखेरला निवडला जातो, तो अत्यंत चुकीचा आहे. आनंद मिळण्याचे अनेक मार्ग आहेत. मद्यधुंद अवस्थेत नववर्षाचे स्वागत केले जाते. कुठे तरी यात बदल होणे काळाची गरज आहे. सकाळपर्यंत बार उघडे ठेवून सरकार त्याला प्रोत्साहान देत आहे. हे काही योग्य वाटत नाही. 31 डिसेंबरनंतर मद्यविक्रीचे आकडे जाहीर होतात आणि त्यातून सरकारी तिजोरीत किती पैसा जमा झाला ही आकडेवारी प्रसिद्ध होते. तो वर्षभरातला उच्चांक असतो. एकीकडे तिजोरी भरली जात असताना, आपल्या विचारांची पातळी किती खालावत चालली आहे, हा विचार करणार की नाही?
नवीन वर्षात सरकारनेही, भ्रष्टाचारमुक्ती अभियान, स्वच्छता अभियान, प्लॅस्टिक मुक्ती अभियान, वृक्षारोपण अभियान, बेटी बचाव-बेटी पढाव अभियान, हे अधिक गतिमान करण्याचा संकल्प करायला हवा.
कर्जमाफीने काही प्रमाणात बळीराजा आनंदित झाला असला तरी, शेतीमालास हमीभाव मिळवून देण्याचा, बेरोजगारी कमी करून, महागाई कमी करण्याचा संकल्पच करायला हवा आहे.




























































