वेधक – श्रवणातून साकारले लयबद्ध रामायण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राकेश गिरासे

नीळवर्ण तनु, कोदंड हस्ती।

कौसल्यानंदन, रघुकुलपती।

भक्तांच्या दासा, रामराया।

मर्यादा पुरुषोत्तमा, तुझीच माया।

प्रभू श्रीरामचंद्रांची महती अखंड भारतात अवर्णनीय आहे. परमेश्वर चरणी लीन होण्याची इच्छाशक्ती असली की कोणत्याही मार्गाने तुम्ही आराधना करू शकता हे दाखवले आहे, येवल्यातील सेवानिवृत्त शिक्षक निंबा वाणी (शिनकर) यांनी. श्रवणातूनही सर्जनशीलतेचा दिवा प्रज्वलित होऊ शकतो, याचा प्रत्यय देत निंबा वाणी यांनी रामायण कथा ऐकत-ऐकत मराठीत स्वरचित 5054 ओव्यांची अप्रतिम रचना करून आधुनिक सोप्या भाषेत रामायण ग्रंथ साकारला आहे.

वाणी यांनी रामायण कथांचे श्रवण करत मराठीत सोप्या अन लयबद्ध रामायण ग्रंथाची निर्मिती केली आहे. परंपरा,भक्ती आणि साहित्य यांचा सुंदर संगम घडवत त्यांनी केवळ कथा ऐकली नाही, तर ती शब्दरूपात जिवंत केली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले असताना वाणी यांनी आपला वेळ अध्यात्म, वाचन आणि चिंतन यासाठी दिला. यावेळी टीव्हीवरील वाल्मीकी रामायण रामकथा ऐकत त्याचे धावते टाचण त्यांनी लिहीले. त्याच्या काव्य रुपात ओवी तयार केल्या व त्या सुसंगत रचनेने पुनश्च दुरेघी वहीवर स्वत:चे हस्ताक्षरात लिहिल्या. वाल्मिकी रामायण कथा लेखनाच्या 2527 ओवी म्हणजेच 5054 ओळांचे लेखन त्यांनी पूर्ण केले. यासाठी त्यांनी रामायणातील प्रत्येक प्रसंग मनोभावे आत्मसात केला. या ग्रंथामध्ये रामायणातील बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड या प्रकरणातून रामाचे रूप शब्दबद्ध केले आहे. प्रमाण मराठीत प्रत्येक प्रसंग साध्या, सुबोध आणि ओघवत्या मराठीत मांडण्यात आल्याने ओव्या सर्वसामान्य वाचकांना भावतात.

या ग्रंथाचे पंढरपूर येथे गोवत्स राधाकृष्णजी महाराज जोधपूर व देवगड येथील भास्कर गिरी महाराज यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले. विशेष सोहळा आयोजित करून स्वखर्चाने सुमारे हजार प्रती प्रकाशित करून त्या श्रोत्यांना वितरित करण्यात आल्या.

`एकांतात मनाला आधार देणारी गोष्ट म्हणजे रामकथा. त्या कथांचे श्रवण करताना ही रचना घडत गेली. प्रभू श्रीरामांचा आदर्श आजच्या पिढीसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे.’  – निंबा वाणी, लेखक – रामायण काव्य