
>> राहुल गोखले
जगात विपुल साहित्यनिर्मिती होत असते; तथापि त्यांतील अगदी मोजकेच साहित्यिक नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरतात. हा सर्वोच्च वाङ्मयीन पुरस्कार एखाद्या पुस्तकाला दिला जात नाही तर त्या लेखकाच्या समग्र साहित्याचा विचार करून दिला जातो. याचाच अर्थ त्या लेखकाच्या लेखनात केवळ सातत्य असून भागत नाही तर त्यांत साहित्यिक आणि जीवनमूल्ये यांचे प्रतिबिंबदेखील त्याच सातत्याने पडणे गरजेचे असते. प्रांत, प्रदेश, भाषा, धर्म इत्यादींच्या सीमा ओलांडून या साहित्यकृती वैश्विक दृष्टी देत असाव्यात हे त्यांचे खरे मोल. अशाच निवडक नोबेल पुरस्कारार्थी साहित्यिकांचा आणि त्यापैकी प्रत्येक लेखकाच्या एका महान साहित्यकृतीचा अभ्यासू तितकाच रोचक व आस्वादक परिचय डॉ. अश्विनी धोंगडे यांनी ‘नोबेल साहित्य दर्शन’ (प्रकाशक ः दिलीपराज प्रकाशन) या पुस्तकात करून दिला आहे.
उण्यापुऱया अडीचशे पृष्ठांत लेखिकेने दहा नोबेल पुरस्कार विजेते लेखक आणि त्यांची एकेक साहित्यकृती यांचा परिचय करून दिला आहे. त्यावरूनच हा परिचय केवळ धावता किंवा मोघम नसून सविस्तर आहे याची कल्पना येईल. कोणत्याही एकाच देशाच्या नव्हे तर अमेरिकेपासून इंग्लंड, पोर्तुगाल, फ्रान्स, पोलंड इत्यादी देशांतील लेखकांचा यात समावेश असल्याने त्यांत वैविध्य आले आहेच; शिवाय प्रतिभावान, थोर लेखक ही कोणत्याही भूमीची मत्तेदारी नाही हेही त्यातून अधोरेखित होते. त्या त्या लेखकाचा परिचय करून देताना लेखिकेने त्याच्या समग्र साहित्याचा धांडोळा घेतला आहेच. त्याच्या जीवनाचा आणि लेखनाचा काही सांधा आहे का, याचाही शोध घेतला आहे. टोनी मॉरिसन ही नोबेल पुरस्कार मिळविणारी पहिली कृष्णवर्णीय महिला. तिचा झालेला घटस्फोट, आपल्या मुलांना घेऊन तिने आपल्या माहेरी परतणे, आपल्या असमाधानी वैवाहिक जीवनातून सुटका मिळण्यासाठी तिने लेखकांच्या गटात सामील होणे इत्यादी माहिती लेखिका देते आणि मग मॉरिसनच्या सर्वोत्तम मानल्या गेलेल्या ‘बिल्व्हेट’ या कादंबरीचा परिचय करून देते. वीस-पंचवीस पात्रे असणारी तरीही वाचकाला खिळवून ठेवणारी ही कादंबरी. काल्पनिक गोष्टींबरोबरच विश्लेषक आणि वृत्तपत्रीय लेखनाचा संगम झालेले पोर्तुगालचे लेखक जोज सारामॅगो हे केवळ त्यांच्या शैलीमुळे थोर लेखक ठरलेले नाहीत तर त्यांच्या कथा सर्व काळातील मानवतेच्या कथा ठरतात, हे लेखिका विशद करते. त्याच्या ‘ब्लाइंडनेस’ या कादंबरीचे पैलू लेखिका उलगडून दाखविते. दक्षिण आफ्रिकेचा लेखक जे. एम. कोएतझी यांच्या लेखनात उदासी सावट असले तरी ते नैराश्यवादी नाहीत, असे निरीक्षण लेखिका नोंदविते. वर्णविद्वेषानंतरच्या काळातील या कादंबरीत राजवट बदलली तर लोकांची मनोवृत्ती कशी बदलत नाही याचे चित्रण आहे. लेखिकेने त्यावर केलेली भाष्ये मुळातूनच वाचायला हवीत. इंग्लंडच्या डोरिस लेसिंग यांची स्त्राrच्या आयुष्याचे भेदक चित्रण करणारी ‘दि गोल्डन नोटबुक’, चीनचे मो यान (रेड सोरगम); कॅनडाच्या अॅलिस मन्रो (रन अवे); फ्रान्सचे पॅट्रिक मोदीआनो (सस्पेंडेड सेन्टेन्सेस); इंग्लंडचे काझुओ इशिगुरो (दि रिमेन्स ऑफ दि डे); पोलंडच्या ओल्गा टोकरझूक (फ्लाईट्स); फ्रान्सच्या अँनी अरनॉक्स (हॅपनिंग) हेही परिचय उत्तम वठले आहेत.
सुरुवातीच्या दोन प्रकरणांमधून लेखिकेने आल्फ्रेड नोबेलचा आणि नोबेल पारितोषिकांच्या स्थापनेचा इतिहास थोडक्यात कथन केला आहे. तसेच नोबेल विजेत्या साहित्यिकांच्या वैशिष्टय़ांचा वेध घेतला आहे. तो वेधक असाच. प्रस्तुत पुस्तकात निवडलेले साहित्यिक हे तरुणपणापासून लेखन करणारेच नव्हे तर लेखन ध्यास घेतलेले होते; ते सर्व कादंबरीकार होत अशी साम्यस्थळे नोंदवितानाच लेखिकेने त्या दहाही लेखकांचे लेखन एक जीवनदर्शन घडविते; आणि त्यातून ध्वनित होणारी मूल्ये शाश्वत आहेत असे निरीक्षण नमूद केले आहे. पुढील दहा प्रकरणांत लेखिकेने महान साहित्यकृतींचे घडवलेले परिचय त्यांच्या या निरीक्षणाचा प्रत्यय वाचकास अवश्य देतीलच; त्याबरोबरच ते साहित्यिक नोबेल पुरस्कराचे मानकरी का ठरले याचे भान देतील. मुख्य म्हणजे हे परिचय वाचकाला या साहित्यकृती मुळातून वाचण्यास उद्युक्त करतील हे या पुस्तकाचे वैशिष्टय़.
नोबेल साहित्य दर्शन (भाग 1)
? लेखक ः डॉ. अश्विनी धोंगडे
? प्रकाशक ः दिलीपराज प्रकाशन, पुणे
? पृष्ठे ः 264 ? मूल्य ः रुपये 400