अनुबंध – गुरुवीण कोण दाखवील वाट…

324

>> अर्चना जोशी

‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः’ ही गुरुवंदना आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत. गुरूंचं आयुष्यातलं स्थान हे सर्वात महत्त्वाचं असतं. कबीर म्हणतात, गुरुदेव बिन जीव की कल्पना ना मिटे. कलासंगीताच्या क्षेत्रात तर गुरुकुल परंपरेला खूप मोठं महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं प्रख्यात शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी आणि गायिका सावनी शेंडे यांनी गुरूंविषयी व्यक्त केलेलं मनोगत.

प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचे स्थान अढळ असते. संगीत कलेमध्ये तर गुरूशिवाय पर्यायच नाही. संगीताचे धडे देण्याबरोबरच आयुष्यात जगण्याचे धडेही गुरूंकडून मिळतात, असं शास्त्र्ााrय गायक पं. शौनक अभिषेकी सांगतात. जगण्याचा मार्ग, चांगला माणूस होण्याचा मार्ग आणि स्वतःला वृद्धिंगत करण्याचा मार्ग गुरू दाखवत असतो. शंभर दालनांचे एक घर असेल आणि त्या घरामध्ये काही दालनांत सोनं, चांदी, हिरे आणि एका दालनात कोळसा असेल तर त्या दालनाच्या मुख्य दरवाजापाशी शिष्याला पोहोचवण्याचे काम गुरू करतात. त्यातील कोणत्या दालनामध्ये काय आहे हे शोधण्याचे काम शिष्याचे असते. मात्र त्यासाठीची दृष्टी गुरू देत असतो. ज्ञानमार्गात दृष्टी येणं खूप महत्त्वाचं असते. संगीत शिकण्यासाठीची दृष्टीही गुरूकडून लाभते. त्यानंतर संगीत जोपासण्याची आणि वृद्धिंगत करण्याची जबाबदारी शिष्याची असते.

आमच्या घरामध्ये गुरू-शिष्य ही परंपरा लहानपणापासून राहिलेली आहे. त्यामुळे अजित कडकडे, राजाभाऊ काळे, हेमंत पेंडसे, देवकी पंडित, मोहन दरेकर या सगळ्यांनी घरी राहून गुरू-शिष्य परंपरेने बाबांकडे ( जितेंद्र अभिषेकी) शिक्षण घेतले आहे. त्यामुळे गुरू म्हणून त्यांच्या आयुष्यातील बाबांचे स्थान आयुष्याचा मार्ग दाखवणारा एक पालक असेही आहे. मी स्वतःला फार भाग्यवान मानतो की, मी मुलगा असून बाबांनी माझा शिष्य म्हणून स्वीकार केला. मलाही त्या शिष्याच्या भूमिकेत जाऊन बाबांकडे गाणे शिकण्याची सुबुद्धी देवाने दिली.

संगीत हा समुद्र आहे आणि त्याचे ज्ञान कधीच संपत नाही. आयुष्यात कितीही पुढे गेलो तरी ती अपूर्णतेची भूक नेहमीच जाणवत असते. बाबा नेहमी म्हणायचे की, मला सर्व काही येतंय असं न म्हणणारा आयुष्यभर शिष्यच राहतो. बाबा शिस्तप्रिय होते. पहाटे रियाजासाठी तंबोरा वाजलाच पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता. चोवीस तास संगीताच्या विचारात, संगीताच्या वातावरणात राहणे याचा त्यांनी एक पायंडा घालून दिला होता. गायनाच्या शिक्षणाबरोबरच व्यावहारिक शिक्षणही घेतलेच पाहिजे याबाबतही ते आग्रही होते. आपण गायन करतो, मग शिक्षणाची गरज काय अशी अनेकांची भूमिका असते; पण बाबांची भूमिका होती की, शिक्षण हे माणसाला आयुष्यात उभे राहायला शिकवते. त्यामुळे शिक्षण आवश्यकच आहे हा त्यांनी त्यांच्या सगळ्या शिष्यांना नियम करून दिला होता. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शिष्याने पदवी संपादित केलेली दिसते. त्याबरोबरच विविधांगी प्रकारचे वाचन करण्याची सवयही त्यांनी शिष्यांना लावली. आपल्या शिष्यांना समोर बसवून ते वर्तमानपत्र वाचून घेत, शुद्धलेखनाचे नियम सांगत असत. त्यामुळे भाषेचा अडसर कधी आम्हाला झाला नाही. इंग्लिश माध्यमामध्ये शिक्षण घेऊनही भावसंगीत किंवा भक्ती संगीत गात असताना आम्ही कधीही चुकीचे उच्चार केले असं आढळणार नाही. हे गुरू म्हणून बाबांचे आमच्यावर उपकारच आहेत असे मला वाटते.

गुरूंविषयी बोलताना गायिका सावनी शेंडेही भरभरून बोलते. ती म्हणते, आईवडील हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात परमगुरू असतातच. मात्र आपल्या कारकीर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर दिशा देण्यासाठी जे गुरू लाभतात त्यांचे आयुष्यातील महत्त्व खूप मोठे असते. माझ्या घरी गाण्याचं वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच गाण्याची आवड निर्माण झाली. बाबा शिष्यांना शिकवायचे त्यावेळी मी त्यांच्याबरोबर बसायचे, तासन्तास बाहेर एका जागी बसून गाणं ऐकायचे. घरचं वातावरण अनुकूल असल्यानं मी त्या दुनियेत रमत गेले. माझी गुरू म्हणजे आजी – कुसुम शेंडे. ती किराणा घराण्याची ज्येष्ठ गायिका होती. आजीनं वयाच्या सहाव्या वर्षापासून मला गाण्यातील पहिले धडे द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ती मला आजी रूपात नव्हे, तर गुरू म्हणून भेटली. घरीच गुरू असण्याचे अनेक फायदे मला झाले. वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचे भान राखले गेले. आजीनंतर बाबांकडे म्हणजे डॉ. संजीव शेंडे याच्याकडे मी ठुमरीचे शिक्षण घेतले. मध्यंतरीच्या काळामध्ये डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकले. साहजिकच या तिघांचेही माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचे, आदराचे स्थान आहे. माझ्या सुरांचा पाया त्यांच्यात आहे. वस्तुतः, कोणत्याही गुरूचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, पण हे ऋण आपल्यावर असणं हीच खूप भाग्याची गोष्ट आहे.

मला आजीकडून किराणा घराण्याचं आणि वीणाताईंकडून ग्वाल्हेर घराण्याचं गाणं शिकायला मिळाल्यामुळे माझ्या गाण्यात या दोन्हीचा मिलाफ दिसतो. ठुमरीचे शब्द हलके असल्यामुळे ते लोकांपर्यंत सहज पोहोचतात हे मी माझ्या वडिलांकडून खूप चांगले शिकले. या गुरूंमुळे कोणत्याही मैफलीत माझ्या गायकीतले वेगवेगळे रंग दिसतात. त्यातील आनंद रसिकांना देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. सवाई गंधर्व महोत्सवातील माझ्या गाण्यासाठी एकदा माझे तीनही गुरू एकत्रित आले होते. तो माझ्या आयुष्यातील विलक्षण अनुभव होता. कार्यक्रमानंतर वीणाताईंनी माझ्या गायनाचं कौतूक करून मला मिठी मारल्याचा क्षण अविस्मरणीय आहे.

माझे तीनही गुरू अत्यंत शिस्तीचे आहेत. साहजिकच ही शिस्त माझ्यातही आली. मैफलीसाठीची काही टेक्निक्स मला वीणाताईंकडून शिकता आली. आज कलेच्या क्षेत्रात गुरुकुल पद्धतीला खूप महत्त्व आहे. ते तसंच टिकून राहिलं पाहिजे. आजचा काळ इंटरनेटचा आहे. त्याचा आधार घेऊन कला शिक्षण घेणं सोपं झालं असलं तरी गुरूंसमोर बसून शिकण्याची सर त्याला नाही हे वेळीच ओळखणं आवश्यक आहे. गुरू केवळ गाणं शिकवत नाहीत तर आचरण, विचार, वर्तन या सर्वांना दिशा देण्याचं काम करतात. त्यामुळेच त्यांचं आयुष्यातलं स्थान हे अढळ आणि अतुल्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या