नाचला गं मोर…

>> विद्या कुलकर्णी

नितांत देखणा… सुंदर मोर. मूळचा हा लाजाळू, भिडस्त पक्षी, त्याला थोडंसं प्रेम दिलं की सहज माणसाळतो.

आकाशामध्ये इंद्रधनुष्य, सभोवताली हिरवीगार झाडी व समोर पिसारा फुलवून नाचणारा मोर हे स्वप्नवत वाटतं ना, हे अद्वितीय दृश्य मी मोराच्या ‘चिंचोळी’ गावात प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे. मोराला प्राचीन काळापासून त्याला मानाचे स्थान दिले आहे. त्याचा उल्लेख पौराणिक कथाकवितांमध्ये व लोकसंगीतांत आढळतो. तसेच त्याला अनेक मंदिरांमध्ये चित्रित केलेले आहे. बऱयाच हिंदू देवता या पक्ष्याशी निगडित आहेत. मोर हा हिंदुस्थानचा राष्ट्रीय पक्षी आहे.

आशियातील हिंदुस्थानी निळा मोर व दक्षिणपूर्व आशियामधला हिरवा मोर या मोराच्या दोन प्रमुख जाती आहेत. हिंदुस्थानी मोराचा पिसारा हा निळ्या आणि हिरव्यागार रंगात असून इंद्रधनुष्यांतील सप्तरंगांप्रमाणे चमकणारा असतो. हिरव्या मोराचा पिसारा हिरव्या व तांबूस-तपकिरी ( ब्राँझ) रंगांचा असतो. मोर पक्षी पांढऱया रंगातही आढळतो, परंतु फार दुर्मिळ आहे. या पक्ष्यांची चोचीपासून शेपटीपर्यंत लांबी 100 ते 115 सें.मी. असते. संपूर्ण वाढ झालेल्या मोराचा पिसारा 195 ते 225 सें.मी. लांबीचा असतो. वजन 4 ते 6 किलो असते. डोळ्यांच्या वर व खाली चंद्रकोरीप्रमाणे पांढरा पट्टा असतो. डोक्याच्या दोन्ही बाजूला हिरव्या, निळ्या रंगांची चमकदार पिसे असतात. पाठीवर तांबूस, तपकिरी ( ब्राँझ) हिरव्या रंगांची पिसे असून त्यावर काळ्या रंगाच्या रेषा असतात. त्यांच्या पंखांच्या पिसाऱयात जवळजवळ 200 पिसे असतात. मोराच्या नराला जन्मतः आखूड शेपटी असते व वयाच्या दुसऱया वर्षापासून त्याचा पिसारा आकार घेऊ लागतो. लांडोर (मादी) आकाराने लहान असते. पंखाचा पिसारा – डोक्यावरचा तुरा यांचा अभाव असतो.
मोराच्या ‘म्याव म्याव’ अशा आवाजाला केकारव असे म्हणतात. हिंदुस्थानात मोर पाळायला कायद्याने परवानगी घ्यावी लागते. घराच्या जवळपास असलेल्या मोरांना आपण नियमित खायला दिले तर ते घराच्या अवतीभवतीच वास्तव्य करतात. पानझडीचे जंगल व अरण्य हे मोरांचे राहण्यासाठी आवडीचे ठिकाण असते. रात्री मात्र आसऱयासाठी मोर झाडांवर जातात. सकाळच्या वेळी मोर सामान्यतः 3 ते 5 मादींच्या बरोबर जमिनीवर फिरताना आढळतात. प्रजननानंतर मात्र फक्त माद्या व त्यांची पिलेच घोळक्याने फिरताना दिसतात. हे पक्षी दिवसा सावलीत आडोशाला राहतात. पहाटेच्या वेळी बरेच मोर एकत्र त्यांच्या आवडत्या ठिकाणी पाणी पिण्यास जातात. त्यांना धुळीत अंघोळ करायला आवडते. काही धोका वाटल्यास sउडण्यापेक्षा धावणे पसंत करतात.

मोरांचा प्रजनन काळ हा प्रदेशानुसार असतो व पावसावरही अवलंबून असतो. तो दक्षिण हिंदुस्थानात एप्रिल ते मे, श्रीलंकेत जानेवारी ते मार्च व उत्तर हिंदुस्थानात जूनमध्ये असतो. मोर आपला सुंदर पिसारा फुलवून लांडोरीला आकर्षित करतो. यांचे घरटे पाने, काडय़ा व पालापाचोळा यापासून जमिनीवर किंवा इमारतीत बांधलेले आढळते. मादी एका वेळी फिक्कट पिवळसर रंगाची 4 ते 8 अंडी घालते व ती एकटीच उबवते. साधारण 28 दिवसांनंतर पिले अंडय़ाबाहेर पडतात. धान्य, झाडाची पाने, किडे, साप, सरडे, अळ्या, छोटे सस्तन प्राणी हे मोरांचे खाद्य आहे. ते काही फळेही खातात.

जंगलात राहणाऱया मोरांचे आयुष्यमान 15 वर्षे असते तर पाळीव मोरांचे 23 वर्षांपर्यंत असू शकते. मोरांचे फोटो मी भरतपूर, झालना, रणथंबोर व ताडोबा इत्यादी ठिकाणी काढले आहेत. भरतपूरमधील मोराचा पिसारा तपकिरी निळ्या रंगाचा होता. चौकशी केल्यावर कळले की, प्रजननाव्यतिरिक्त पिसाऱयाचा रंग असा असू शकतो. झालना येथे बिबटय़ाचा जिथे वावर होता तिथे अतिशय धीटपणाने, गटागटाने थोडे अंतर ठेवून मोर फिरत होते. मलाच भीती वाटत होती, एखाद्या मोरावर बिबटय़ा धावून गेला तर.. मोर पिसारा फुलवून जेव्हा खुज्या दिसणाऱया मादींच्या मागे त्यांना रिझवत असतो तेव्हा क्षणभर असे वाटते, स्वतःच्या रूपाची याला कल्पनाच नाही का? पक्ष्यांमध्ये इतकी बिजोड जोडी मी अजून तरी पहिली नाही! मोर ही खरंच निसर्गाची एक अत्युत्तम निर्मिती आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या