ठसा – पीटर हँडके, ओल्गा तोकार्झुक

2680

>> प्रवीण कारखानीस

गेल्या वर्षीचा म्हणजे 2018 सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार  पोलंडच्या विख्यात लेखिका ओल्गा तोकार्कझुक (Olga Tokarczuk) यांना तर यंदाच्या वर्षीचा म्हणजे 2019 सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार हा पॅरिसनिवासी जर्मन भाषिक ऑस्ट्रियन नाटककार, लेखक पीटर हँडके (Peter Handke) यांना नुकताच जाहीर झाला आहे. दोघेही सामाजिक बांधिलकी जपणारे असामान्य प्रतिभेचे साहित्यिक मानले गेले आहेत.

ओल्गा तोकार्झुक या पोलंडमधल्या वॉर्सा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विषयाच्या स्नातक असून आज त्या 57 वर्षांच्या आहेत. आजवर एका खेडेगावात राहूनच त्यांनी आपलं बहुतांश लेखन केलं आहे. ‘सिटीज ऑफ मिरर्स’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाल्यावर त्या कादंबरी लेखनाकडे वळल्या. ‘जर्नी ऑफ द बुक पीपल’,  या शीर्षकाच्या त्यांच्या कादंबऱ्या चांगल्याच गाजल्या. ‘द वॉर्डरोब’, ‘द हाऊस ऑफ डे’, ‘हाऊस ऑफ नाइट, ‘प्लेइंग मेनी ड्रम्स’ हे लघुकथासंग्रह तसंच ‘ड्राइव्ह युअर प्लाव ओव्हर द बोन्स ऑफ द डेड’ आणि ‘फ्लाइट’ या कादंबऱ्या आणि 900 पानांचं ‘बुक ऑफ जाकोब’ या पुस्तकांमुळे त्या जगभर विख्यात झाल्या. मॅन बुकर पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या पोलिश महिला लेखिका आहेत. नोबेल पुरस्काराने तर त्यांचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान झाला आहे.

पीटर हँडके हे ऑस्ट्रिया  या युरोपीय देशाचे नागरिक असल्याने जर्मन ही त्यांची मातृभाषा आहे. ग्राझ विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे बहुतेक सर्व लेखन जर्मन भाषेत आहे. ‘ऑफेन्डिग द ऑडियन्स’ या इंग्रजी शीर्षकाने जगाला परिचित झालेली  मूळ जर्मन भाषेतली त्यांची पहिलीच नाट्यकृती वादग्रस्त ठरली होती. ‘द वॉर्ड वॉन्टस् टु बी ए गार्डियन’, ‘माय फूट माय टय़ुटर’, ‘द राइड अक्रॉस लेक कॉन्स्टन्स’ ही त्यांची नाटके प्रचंड गाजली. आंतराष्ट्रीय स्तरावरचा इब्सेन  पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. ‘द गोलीज् एन्ग्झायटी’ ‘एट पेनल्टी किक’, ‘द लेफ्ट हॅण्डेड वुमन’, ‘स्लो होमकमिंग’, ‘ऑन ए डार्क नाइट’, ‘आय लेफ्ट माय सायलेंट हाऊस’ या त्यांच्या कादंबऱ्या विशेष लोकप्रिय झाल्या. ‘द ग्रेट फॉल’ या कादंबरीत त्यांनी वयोवृद्ध नटसम्राटाची कथा आणि व्यथा वर्णन केली आहे.  ‘विंग ऑफ डिझायर’ या त्यांच्या अलीकडच्या साहित्यकृतीला अक्षरशः लक्षावधी वाचकांची पसंती लाभली आहे .

या दोन्ही नोबेल पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करत असताना वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, 1900 साली नोबेल पुरस्कार द्यायला सुरुवात झाल्यापासूनच्या गेल्या 120 वर्षांत विविध हिंदुस्थानी भाषांमध्ये अव्वल दर्जाची साहित्य  निर्मिती झाली असतानाही रवींद्रनाथ टागोरांचा एकमात्र आणि सन्माननीय अपवाद वगळता अन्य कुणाही हिंदुस्थानी साहित्यिकाच्या कोणत्याही साहित्यकृतीची नोबेल पुरस्कारासाठी निवड तर सोडाच, परंतु निवड समितीला शिफारससुद्धा होऊ शकलेली नाही. त्यासाठी  सर्वप्रथम उत्तम साहित्यकृतींचा तितक्याच उत्तम इंग्रजीत अनुवाद प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. नोबेल पुरस्कारासाठी केवळ हयात व्यक्तीच पात्र असतात हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. अर्थात हा विषय तसा मोठा आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत. तूर्तास जागतिक प्रतिष्ठsचे आणि सुमारे आठ कोटी रुपये इतक्या मोठय़ा रकमेचे साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या या दोन्ही साहित्यिकांचे खुल्या दिलाने अभिनंदन करायला हरकत नाही!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या