प्रासंगिक : नाना शंकरशेठ यांचा उचित सन्मान करावा!

1064

>> जयराम देवजी

मुंबईचे आद्य शिल्पकार आणि थोर समाजसुधारक नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेठ यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाची तोडच नाही. राज्यात या थोर युगपुरुषाची 154 वी पुण्यतिथी साजरी होत असताना नानाप्रेमी जनतेच्या पदरी आजही उपेक्षाच आली आहे. नानांनी हयातीत असताना आपल्या वाड्यातच मुलींकरिता प्रथम शाळा सुरू करून स्त्राr शिक्षणाचा पाया रचला होता तसेच वाड्यातच रेल्वेची कचेरीही सुरू करून मुंबईतील भविष्यातील दळणवळणाबाबत दूरदृष्टिकोन ठेवून 1853च्या इंग्रज राजवटीत जिद्दीने बोरीबंदर ते ठाणे अशी प्रथम रेल्वे सुरू केली आणि आज तीच रेल्वे जगभर पसरून, विशेषतः मुंबईकरांची जीवनवाहिनी झाली आहे. म्हणूनच त्यांना हिंदुस्थानी रेल्वेचे जनक म्हटले जाते. त्याचबरोबर नानांनी शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालय, उद्याने, तलाव, स्मशानभूमी, सतीची चाल बंद करणे वगैरे अशा नानाविध सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपल्या लाखमोलाच्या जमिनी दान दिल्या. म्हणून त्यांना मुंबई आद्य शिल्पकार म्हटले जाते, परंतु आजपर्यंत त्यांना ‘समाजसुधारक’ दर्जा दिला गेला नाही हे मुंबईकर जनतेचे दुर्दैव म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

नानांनी या अव्याहतपणे केलेल्या कार्याचा गौरव म्हणून थोर इंग्रजांनी ‘टाऊनहॉल’मध्ये सभा घेऊन लंडन येथून संगमरवरी नानांचा पुतळा बनवून त्यांच्या हयातीतच जिवंत स्मारक उभारून यथोचित सन्मान केला. एवढेच नव्हे तर पूर्वीच्या व्हिक्टोरिया टर्मिनसच्या भिंतीवर नानांचे कोरीव शिल्प आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत आहे. अशा या थोर पुरुषाचे मुंबईतही आधुनिक स्मारक व्हावे ही नानाप्रेमी जनतेची आग्रही मागणी लक्षात घेऊन तत्कालीन नगरसेवक ऍड. मनमोहन चोणकर यांनी ठरावाच्या मुद्दय़ाद्वारे महापालिका सभागृहात मागणी उचलून धरली आणि सरतेशेवटी मुंबईतील वडाळा येथील दोस्ती एकर या मोक्याच्या ठिकाणी नसली तरी जागा पदरात पाडून घेतली, पण आजपर्यंत म्हणजेच राज्य सरकारचा शेवटच्या अर्थसंकल्पातही नानांच्या स्मारकाकरिता आर्थिक तरतूद करण्याकरिता विसर पडलेला दिसतो. त्यामुळे नानांच्या वास्तुरूपी स्मारक उभारणीस अजून किती काळ जाईल याबाबत साशंकता आहे.

त्याचप्रमाणे तमाम मुंबईकर जनतेची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या व स्वतः नाना ज्या रेल्वेचे जनक आहेत त्या रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस स्थानकातून विविध राज्यांत लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात. या स्थानकास 1995 पासून तमाम नानाप्रेमी जनता नानांचे नाव देण्याची मागणी करीत आहेत, परंतु आजपर्यंत ही मागणी प्रलंबित आहे. 1995 मध्ये तत्कालिन शिवसेना-भाजप युती सरकारने नानांच्या नावाचा ठराव केंद्राकडे पाठविला होता, परंतु त्यावेळचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांनी त्यात खोडा घातला. अर्थात आता केंद्रात व राज्यात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार आहे. यापूर्वीही महाराष्ट्रातून बॅ. नाथ पै, मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, राम नाईक आणि सुरेश प्रभू असे रेल्वेमंत्री होऊन गेले. तरीही मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला नानांचे नाव दिले गेले नाही. आता रेल्वेमंत्री पीयूष गोयल महाराष्ट्राचेच आहेत. त्यांचीही नाना शंकरशेठ प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱयांनी भेट घेतली. त्यांनी या प्रस्तावास अनुकूलता दर्शविली आहे.

तेव्हा नानाप्रेमी जनतेच्या वतीने सर्वांनाच विनंती की, नानांच्या पुण्यतिथीदिनी ‘मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस’चे जगन्नाथ शंकरशेठ मुंबई टर्मिनस असे नामकरण करून नानांचा उचित सन्मान करावा.

आपली प्रतिक्रिया द्या