
>> प्रा. आशुतोष पाटील
ह. धी. सांकलिया स्मृतिगृहातील (डेक्कन कॉलेज) नेवासाच्या स्तर क्रमाचे त्रिमिती मॉडेल पुरापाषाणापासून ते प्रारंभिक ऐतिहासिक आणि इंडो-रोमन व्यापार काळापर्यंतचे पुरावे, तसेच स्थानिक ग्राम संस्कृती, सातवाहन कालीन नगर जीवन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांचा संगम या कालानुक्रमे नोंदी नेवासा या एकाच ठिकाणी सापडतात.
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या दोन्ही काठांवर वसलेले नेवासा हे महाराष्ट्राच्या प्रागैतिहासिक ते प्रारंभिक ऐतिहासिक आणि इंडो-रोमन व्यापार काळापर्यंतचा बहुपर्यायी सांस्कृतिक विकास दाखवणारे एक महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ आहे. प्रवरा-गोदावरी खोऱ्यातील इतर स्थळांप्रमाणे (जोरवे, दैमाबाद, इनामगाव) नेवासा येथेही मानवी वास्तव्याचा प्रदीर्घ आणि स्तरित क्रम दिसून येतो. त्यामुळे हे स्थळ पश्चिम दख्खनच्या सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासासाठी ‘टाईप-साईट’ स्वरूपात मानले जाते.
नेवासा हे प्रवरा नदीच्या उत्तर तीरावरील नेवासा बुद्रुक आणि दक्षिण तीरावरील नेवासा खुर्द अशा दोन वस्ती गटांत विभागलेले आहे. मध्ययुगीन संत परंपरेत संत ज्ञानेश्वरांनी येथे ‘भावार्थ दीपिका’ (ज्ञानेश्वरी) लिहिल्याचा उल्लेख असून ‘लीळाचरित्र’ व इतर भक्ती साहित्यात या स्थानाची ‘निधिवास’, ‘निधवास’, ‘नेवास’ अशी रूपे आढळतात. स्कंद पुराणातील आख्यायिकेनुसार कुबेराने तारकासुराच्या भीतीने आपला निधी येथे लपवला आणि त्यामुळे या क्षेत्राला ‘निधिवास’ हे नाव प्राप्त झाले. ही पुराणपर परंपरा नेवासाच्या प्राचीन गौरवाची धार्मिक बाजू अधोरेखित करते.
प्रवरा-गोदावरी खोऱ्यातील ताम्रपाषाणकालीन संस्कृतींच्या शोधमोहिमेदरम्यान भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पश्चिम वर्तुळातील अधिकाऱ्यांनी, विशेषत एम. एन. देशपांडे यांनी नेवासाची प्राचीन वस्ती म्हणून नोंद केली. जोरवे व नाशिक परिसरातील ताम्रपाषाणकालीन वस्तींचा शोध लागल्यानंतर या खोऱ्यातील पद्धतशीर अन्वेषणादरम्यान नेवासा, दायमाबाद, सावळदा आदी अनेक स्थळे प्रकाशात आली आणि प्रवरा खोऱ्याची स्वतंत्र सांस्कृतिक परंपरा स्पष्ट झाली.
इ.स. 1954-56 आणि 1959-61 या दोन टप्प्यांत डेक्कन कॉलेज, पुणेतर्फे प्रा. ह. धी. सांकलिया यांच्या नेतृत्वाखाली ‘लाडमोड टेकडी’ येथे व्यापक उत्खनन करण्यात आले. या उत्खननांचा मूळ हेतू संत ज्ञानेश्वरांच्या काळातील वास्तवाचे पुरातत्त्वीय चित्र उभे करणे हा होता; परंतु प्रत्यक्षात येथे मानवी वास्तव्याचा पुरावा पुरापाषाण काळापासून मुस्लिम-मराठा काळापर्यंत सलग अथवा पुनरावृत्तीने मिळाला. नेवासाचा स्तर क्रम हा भारतीय प्रागैतिहासिक अभ्यासातील आदर्श मानला जात असल्याचे उल्लेख डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व संग्रहालयाच्या नोंदीत आढळतात. येथे पुरापाषाण (Lower Palaeolithic) काळातील अशुलियन परंपरेतील हातकुऱहाडी, क्लीव्हर, क्रापर्स, मध्यपाषाण काळातील लेव्हलोय तंत्रावर आधारित बनवलेली फ्लेक, तर उत्तरपाषाण काळातील सूक्ष्माश्म (microlithic) जसे ब्लेड व सूक्ष्म दगडी साधने सापडलेली आहेत. नेवासाला अशी क्रमाने संस्कृतींची मालिका नोंदली गेली असून या सातत्यामुळे पर्यावरणीय बदलांनुसार मानवी तंत्रज्ञान व निवास पद्धती कशा विकसित झाल्या याचा मागोवा घेणे सुलभ झाले आहे.
प्रवरा-गोदावरी खोऱ्यातील सावळदा, दायमाबाद, जोरवे इत्यादी स्थळांप्रमाणेच नेवासा येथेही ताम्रपाषाण संस्कृतीचे पुरावे दिसतात. काळी कापसाळू जमीन, नदीकाठचा उंच तट, पाण्याचा सहज पुरवठा आणि दगडमातीची उपलब्धता यामुळे येथे स्थिर ग्रामीण वस्ती विकसित झाली असावी. जाड तळ आणि बाह्य पृष्ठभागावर लाल लेप असलेली भांडी, हाताने घडवलेली धान्याच्या साठय़ाचे माठ, साधे दगडी-तांब्याचे साधन संच या सर्वसाधारण ताम्रपाषाण काळाच्या वैशिष्टय़ांचा उल्लेख उत्खनन अहवालात सापडतो. प्रवरा खोऱ्यात दायमाबाद हे प्रादेशिक केंद्र, तर नेवासा-जोरवे ही उपकेंद्रे म्हणून मांडणी केली जाते.
नेवासातील सर्वाधिक अभ्यासले गेलेले स्तर हे इ.स.पू. सु. 150 ते इ.स. 200 या काळात मोडणारे प्रारंभिक ऐतिहासिक स्तर आहेत, जे प्रामुख्याने सातवाहनांच्या सत्ताकाळाशी सुसंगत ठरतात. या कालखंडातील वस्ती सु. 4600 चौ.मी.पेक्षा अधिक क्षेत्रावर पसरलेली होती आणि बहुखोली, पक्क्या विटांच्या घरांची मांडणी सुस्थित निचरा व्यवस्था, रस्ते आणि कार्यशाळांशी नाते राखून करण्यात आली होती. येथे मृद्भांडांमध्ये रसेट-कोटेड वेअर (लाल शिरस्ता, बाहेर पिवळसर फुलांच्या नक्षी), नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्ड वेअर, काळी-तांबडी मृद्भांडी, जाड काठ असलेली रेड वेअर अशा विविध प्रकारांचा समावेश असून हे सर्व भारतातील प्रारंभिक नगर संस्कृतीशी निगडित असल्याचे मानले जाते. मातीच्या खेळण्यांमधील प्राणी-मानव प्रतिकृती, स्त्राr-मूर्ती, तसेच मातीचा छोटा चैत्य हा बौद्ध धार्मिक प्रभावाचा थेट पुरावा आहे आणि पैठण, तेर, नाशिक येथील सातवाहन स्तराशी तुलना करता येते. सातवाहनकालीन या स्तरात जळलेले गहू, हरभरा, बाजरी, रागी इ. धान्यांचे नमुने तसेच मांसाहाराचे पुरावे सापडले असून मिश्र आहार पद्धती व विविध पीक पद्धतींचा वापर दिसून येतो.
नेवासातून आहत नाणी, साच्यात ओतून बनवलेली लेख नसलेली नाणी तसेच सातवाहन राजघराण्यातील श्री सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी यांची नाणी प्राप्त झाली आहेत. या नाण्यांच्या आधारे वस्तीची काळपुष्टी तर होतेच, परंतु सातवाहन यांचे आर्थिक धोरण, धातूंचा वापर आणि प्रादेशिक व्यापार जाळ्यांविषयीही कल्पना येते.
नेवासाचे वैशिष्टय़ म्हणजे येथील समृद्ध इंडो-रोमन स्तर, जे इ.स. सु. 50 ते 200 या कालखंडात मोडतात आणि सातवाहन-रोमन सागरी व्यापाराच्या अभ्यासात नेवासाला अग्र स्थान देतात. लाडमोड टेकडीवरील स्तरातून 63 हून अधिक अॅम्फोरा तुकडे मिळाले असून हे प्रामुख्याने इटालियन द्राक्षारस (wine) वाहतुकीशी संबंधित असल्याचा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे अॅम्फोरा सलग आठ स्तरांत नोंदले गेले आहेत, ज्यामुळे नेवासा व भूमध्य-मध्यपूर्व व्यापार जाळे यांच्यातील संपर्क दीर्घकाळ टिकून होता हे स्पष्ट होते.
या स्तरातून रोमन काचेचे मणी, लहान पुतळे, विविध प्रकारची मृद्भांडी यांचा उल्लेख नेवासा अहवालात आणि पुढील संशोधनांत सापडतो. येथे सापडलेल्या अॅम्फोराचा झालेला अभ्यास रोमन व्यापार संस्कृती आणि जहाज वाहतूक अभ्यासासाठी महत्त्वाचा मानला जातो. येथे सापडलेले रोमन बुलाय (bullae) प्रकारचे गळ्यातील अलंकार, रोमन सम्राट ऑगस्टसच्या नाण्यांवरील प्रतिमांशी तुलनात्मक असलेले प्रतिरूप, काचेच्या रंगीत बांगडय़ा, शंख आणि हस्तिदंत अलंकार, मातृदेवतांच्या मातीच्या मूर्ती या सर्व वस्तू इंडो-रोमन संपर्कासोबत स्थानिक सामाजिक-धार्मिक प्रतिमांचाही सहज संगम दर्शवतात. ह. धी. सांकलिया यांचे नेवासा उत्खनन हे डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व संशोधन इतिहासातील एक मैलाचा दगड मानले जाते आणि त्यांच्या स्मृतिगृहात नेवासाच्या स्तर क्रमाचे त्रिमिती मॉडेल विशेषत प्रदर्शित करण्यात आले आहे.
एकाच स्थळावर पुरापाषाणापासून ते प्रारंभिक ऐतिहासिक आणि इंडो-रोमन व्यापार काळापर्यंतचे पुरावे नोंदले जाणे तसेच स्थानिक ग्राम संस्कृती, सातवाहन कालीन नगर जीवन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांच्या संगमाचा अभ्यास करणे ही नेवासाला लाभलेली अद्वितीय देणगी आहे. प्रागैतिहासिक साधन संच, सातवाहन नाणे व धातू साधने, रोमन अॅम्फोरा व बुले तसेच साहित्यिक-पुराणपर उल्लेख या सर्वांमुळे नेवासा हे महाराष्ट्राच्या पुरातत्त्व शास्त्रीय अभ्यासात एक जिवंत ‘प्रयोगशाळा’ म्हणून ओळखले जाते.
(लेखक पुरातत्त्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ,
छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)



























































