ठसा : कुलवंतसिंग कोहली

>> शुभांगी बागडे

कुलवंतसिंग कोहली मूळचे रावळपिंडीचे. 1934 मध्ये रावळपिंडीत जन्मलेले कुलवंतसिंग फाळणीच्या आधीपासून मुंबईशी जोडलेले होते. व्यवसायानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांचे मुंबईला कायम येणेजाणे होते. त्यांचं कुटुंब आणि विशेषत: त्यांच्या आई दादरच्या प्रेमात होत्या. यामुळेच त्यांनी दादरमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून हे कुटुंब कायमचे दादरशी जोडले गेले. तेव्हा कुलवंतसिंग फक्त 11 वर्षांचे होते. मुंबई हीच त्यांची कर्मभूमी ठरली. या कर्मभूमीत त्यांनी नाव कमावले, मित्र कमावले आणि प्रेम, जिव्हाळा या शब्दांचा खरा अर्थही त्यांना याच भूमीत गवसला.

दादरकरांना पंजाबी पदार्थांची खरी चव दिली ती त्यांच्या प्रीतम हॉटेलने. मुंबईत स्थिरावल्यानंतर कोहली कुटुंबाने त्यांचा मूळ हॉटेल व्यवसाय सुरू केला. ‘प्रीतम पंजाब हिंदू हॉटेल’ हे त्यांच्या हॉटेलचे सुरुवातीचे नाव. कुलवंतसिंग यांनी वडिलांच्या तालमीत या हॉटेलला रेस्टॉरंटचं रूप दिले आणि आता या वृक्षाच्या सावलीत प्रीतम रेस्टॉरंट, पार्क के, प्रीतम ढाबा, मिडटाऊन प्रीतम, ग्रॅण्डममाज, टर्टुलिआ अशा अनेक फांद्या उपजल्या आहेत. 10 बाय 10 च्या खोलीत सुरू झालेला हा व्यवसाय पुढे नावारूपास आला तो कुलवंतसिंग यांच्यामुळे. ‘प्रीतम’ या रेस्टॉरंटचा डोलारा उभारून त्यांनी देशभरातील नामांकित आणि तारांकित वर्तुळात आपले स्थान निर्माण केले होते. या हॉटेलात सगळय़ा क्षेत्रातील व्यक्तीचा राबता असे.

प्रीतम हा त्याकाळी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार, दिग्दर्शक यांचा अड्डा होता. कुलवंतसिंग यांची बॉलीवूडमधील अभिनेत्यांशी चांगली मैत्री होती. अनेकांनी आपला पडता आणि उभरता काळ प्रीतम हॉटेल आणि कुलवंतसिंग यांच्या सोबतीत अनुभवला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी, भावनांना मोकळीक देण्यासाठी कुलवंतसिंग ही हक्काची व्यक्ती होती. राज कपूर, धर्मेंद्र, जितेंद्र, संजीक कुमार, जगजीतसिंह अशा अनेक दिग्गजांचा त्यांना जवळून सहवास लाभला होता. हा दोस्ताना प्रीतम हॉटेल आणि कुलवंतसिंग यांनी शेवटपर्यंत जपला.

कुलवंतसिंग मुंबईच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक पटलावरच्या बदलांचे साक्षीदार होते. आपला मूळचा पंजाबी बाणा जपत मुंबईकर ही उपाधी त्यांनी आपसूक अंगीकारली होती. आपण मुंबईवर असल्याचा त्यांना अभिमान होता. या प्रेमापोटीच दोन दशकांपूर्वी मुंबईचा नगरपाल होण्याची जबाबदारी त्यांनी निभावली. कुलवंतसिंग यांचे प्रीतम हॉटेल ही मुंबईची सांस्कृतिक खूण ठरले. मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्य असलेल्या कुलवंतसिंग यांच्या प्रयत्नांतून मुंबईत पहिल्यांदा गुरुनानक रुग्णालय उभे राहिले. ते चित्रपटांचेही दर्दी होते. संगीता फिल्म्स या त्यांच्या निर्मिती संस्थेअंतर्गत त्यांनी ‘पाकिजा’, ‘द बर्निंग ट्रेन’सारख्या चित्रपटांना आर्थिक साहाय्य केले होते.

कुलवंतसिंग मुंबईच्या इतिहासाशी आणि त्या वेळच्या जगाशी जोडले गेले होते. हॉटेल व्यवसायामुळे अतिथ्यशीलता आणि जिव्हाळा त्यांच्यात मुरलेला होता. यामुळेच त्यांचा स्नेहीपरिवार चांगलाच विस्तारलेला होता. लोकांच्या पोटात शिरून त्यांच्या मनात जागा निर्माण करणाऱया कुलकंतसिंग कोहली यांनी दादरच्या मध्यमवर्गीय जनांपासून, बॉलीवूड, साहित्यविश्वातील अगणित माणसे गोळा केली होती. कुलवंतसिंग या स्वभावामुळेच त्यांचा विविध सामाजिक वर्तुळामध्ये वावर होता. त्यांनी प्रेमाने जोडलेली, जपलेली खूप माणसे होती. आपल्या आईवडिलांनी जी शिकवण दिली, ज्या पद्धतीची वैचारिक जडणघडण दिली त्यामुळेच आजही कोहली परिवार एकत्रितपणे हा व्यवसाय सांभाळतो आहे, असे ते सांगत. प्रीतमच्या कर्मचाऱ्यांवरही त्यांनी कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच प्रेम केले. या कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केला. या ट्रस्टद्वारे अंतर्गत कर्मचाऱयांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च केला जातो.

मृदू स्वभावाच्या कुलवंतसिंगांच्या मित्रयादीत स्थान मिळवणे फार अवघड नव्हते. दिलखुलासपणा हा त्यांचा स्थायी स्वभाव. यामुळेच जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीतील चांगुलपणा, वेगळेपणा हेरून त्याला मनमोकळी दाद देण्यात ते कधी मागे नसत. जगण्याचा मनमुराद, रसरशीत आनंद लुटत आयुष्य कसं जगावं याचे उत्तम उदाहरण त्यांनी लोकांसमोर ठेवले.

आपली प्रतिक्रिया द्या