
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
फ्रान्सकडून राफेल खरेदीचा करार भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा संरक्षण करार ठरेल. अर्थात इतकी मोठी रक्कम खर्च केल्यामुळे नौदलाच्या पाणबुड्या किंवा लष्कराच्या इतर आधुनिकीकरण प्रकल्पांच्या निधीवर परिणाम होऊ शकतो. शिवाय एकाच देशावर (फ्रान्स) अतिअवलंबित्व राहण्याचा धोकाही आहे. भविष्यात युरोपीय राजकारणात बदल झाल्यास सुटय़ा भागांचा पुरवठा खंडित होऊ शकतो.
भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात 114 राफेल विमानांची खरेदी हा केवळ एक संरक्षण करार नसून तो भारताच्या जागतिक रणनीतीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये संरक्षण अधिग्रहण परिषदेने (डीएसी) या कराराला दिलेल्या प्राथमिक मंजुरीमुळे भारताच्या संरक्षण सिद्धतेत एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.
भारतीय हवाई दलासमोर सध्या सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे स्क्वॉड्रन्सची घटती संख्या. हवाई दलाला अधिकृतपणे 42 स्क्वॉड्रन्सची गरज असताना सध्या ही संख्या 29 ते 30 पर्यंत खाली आली आहे. मिग-21 विमाने निवृत्त झाली आहेत आणि जग्वार, मिराज-2000 सारखी विमाने लवकरच निवृत्त होणार आहेत.
मानकीकरण ः आधीच्या 36 राफेल आणि आताच्या 114 विमानांमुळे भारतीय ताफ्यात एक ‘एकसंधता’ येईल. त्यामुळे लॉजिस्टिक आणि देखभालीचा खर्च कमी होईल.
दीर्घ पल्ल्याचा मारा ः राफेलचे ‘मीटिअर’ आणि ‘स्कॅल्प’ क्षेपणास्त्रे भारताला पाकिस्तान आणि चीनविरुद्ध हवाई श्रेष्ठत्व मिळवून देतात. भारतीय हवाई हद्दीतूनच शत्रूच्या खोलवर असलेल्या तळांवर अचूक हल्ला करण्याची क्षमता त्यामुळे मिळेल.
या करारामुळे हिंदी महासागर क्षेत्रात भारत आणि फ्रान्सची भागीदारी अधिक मजबूत होईल. चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी हे एक प्रभावी पाऊल ठरेल. कराराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ’मेक इन इंडिया’ धोरणाला होईल.
स्थानिक उत्पादन ः 114 पैकी 96 विमाने भारतात तयार केली जातील. टाटा-दसॉल्ट यांच्या भागीदारीमुळे हैदराबादमध्ये विमानांच्या सांगाडय़ाचे (Fuselage) उत्पादन आधीच सुरू झाले आहे.
रोजगार निर्मिती ः या प्रकल्पामुळे हजारो उच्च-तंत्रज्ञान नोकऱ्या निर्माण होतील आणि भारताची एरोस्पेस पुरवठा साखळी जागतिक स्तरावर पोहोचेल.
तंत्रज्ञान हस्तांतरण ः इंजिन तंत्रज्ञान आणि रडार सॉफ्टवेअरचे पूर्ण हस्तांतरण मिळवणे हे भारतापुढचे मोठे आव्हान असेल. जर भारताला ’सोर्स कोड’ मिळाला तर आपण स्वतःची क्षेपणास्त्रे राफेलवर सहजपणे लावू शकू.
जीवनचक्र खर्च ः विमानांची खरेदी ही केवळ सुरुवात असते. पुढील 30-40 वर्षांची देखभाल, शस्त्रs आणि अपग्रेड्स यांचा खर्च मूळ किमतीपेक्षा कितीतरी जास्त असतो.
निर्यात संधी ः जर भारत राफेलचा ‘ग्लोबल हब’ बनला तर आपण आशिया आणि आफ्रिकेतील देशांना राफेलचे सुटे भाग आणि सेवा निर्यात करून परकीय चलन कमवू शकतो.
राफेलच्या समावेशामुळे पाकिस्तान चीनकडून ‘जे-31’ किंवा ‘जे-10 सी’ विमाने खरेदी करण्याची शक्यता वाढेल, राफेलचे सर्वात आधुनिक ‘एफ 4 स्टँडर्ड’ (जे भारत एमआरएफएअंतर्गत घेणार आहे) आणि चीनचे 5व्या पिढीचे ‘जे-20 माइटी ड्रगन’ यांच्यातील तुलना अत्यंत रंजक आहे. ही केवळ दोन विमानांची तुलना नसून ती ’स्टेल्थ’विरुद्ध ’सर्वोत्कृष्ट एव्हिऑनिक्स’ (Advanced Avionics) अशी लढाई आहे.
‘जे-20’ (चीन) ः हे पाचव्या पिढीचे विमान आहे. याचा मुख्य भर ’स्टेल्थ’वर (रडारला चकवा देणे) आहे. याची रचना अशा प्रकारे केली आहे की, शत्रूच्या रडारवर ते लवकर दिसत नाही. हे प्रामुख्याने ‘हवाई श्रेष्ठत्व’ मिळवण्यासाठी बनवले आहे.
‘राफेल एफ 4’ (भारत) ः हे 4.5 पिढीचे विमान आहे. जरी हे पूर्णपणे स्टेल्थ नसले तरी याचा ‘रडार क्रॉस-सेक्शन’ (आरसीएस) खूप कमी आहे. राफेल हे एक ‘ओम्नीरोल’ विमान आहे. म्हणजे ते एकाच मोहिमेत एकाच वेळी हल्ल्याची आणि बचावाची अनेक कामे करू शकते.
‘राफेल एफ 4’ यामध्ये ‘RBE2 AESA’ रडार आहे, जे ‘एफ 4’ स्टँडर्डमध्ये अधिक शक्तिशाली झाले आहे. राफेलची सर्वात मोठी ताकद त्याचे SPECTRA इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट आहे. हे शत्रूचे रडार जॅम करण्यात आणि क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करण्यात जगात सर्वोत्तम मानले जाते.
‘जे-20’ ः चीनने ‘जे-20’मध्ये स्वदेशी बनावटीचे AESA रडार लावले आहे. कागदावर हे रडार खूप शक्तिशाली दिसते, परंतु प्रत्यक्ष युद्धात त्याची क्षमता अजून सिद्ध झालेली नाही.
दोन्ही विमानांची तुलना त्यांच्या क्षेपणास्त्रांशिवाय अपूर्ण आहे.
| वैशिष्टय़े | राफेल एफ4 (भारत) | जे 20 (चीन) |
| BVR क्षेपणास्त्र | Meteor(150+
किमी रेंज) – जगात सर्वोत्तम मानले जाते. |
PL-15(200+
किमी रेंज – दावा) |
| जमिनीवर हल्ला | SCALP / HAMMER (अचूक मारा) | मर्यादित (मुख्यत्वे हवेतून हवेत मारा) |
हिमालयीन युद्धभूमी
लडाख किंवा अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर राफेलला एक मोठा फायदा आहे.
चीनचे ‘जे-20’ तिबेटच्या उंचावरील तळांवरून पूर्ण क्षमतेने (जास्त वजन घेऊन) उडू शकत नाही, कारण तेथील हवा विरळ आहे.
अनुभव ः भारतीय वैमानिक राफेलचा वापर करून प्रत्यक्ष सीमेवर सराव करत आहेत, तर ‘जे-20’ अजूनही प्रामुख्याने प्रशिक्षणातच आहे.
महत्त्वाचा निष्कर्ष हा आहे की, जर ‘लांब पल्ल्याच्या’ (BVR) लढाईचा विचार केला, तर राफेलचे Meteor क्षेपणास्त्र ‘जे-20’साठी कर्दनकाळ ठरू शकते. जरी ‘जे-20’ स्टेल्थ असले तरी राफेलचे प्रगत सेन्सर्स आणि SPECTRA सिस्टीम त्याला शोधून पाडण्याची क्षमता ठेवतात.
आधुनिक हवाई युद्धात केवळ विमानाचा वेग किंवा क्षेपणास्त्राची रेंज पुरेशी नसते, तर ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’ (ईव्ही) ही खरी अदृश्य शक्ती असते. ‘राफेल एफ 4’ आणि चीनचे ‘जे-20’ यांच्यातील लढाईत जो शत्रूच्या रडारला आधी ‘आंधळे’ करेल, तोच जिंकेल.





























































