
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
जम्मू–कश्मीरला स्पेशल राज्याचा दर्जा दिल्यामुळे त्यांना विकासाला प्रचंड निधी मिळायचा, परंतु त्यापैकी 80 ते 85 टक्के रक्कम ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकत नव्हती. अनेक रस्ते कधीच बांधले जायचे नाहीत आणि वर्षभरानंतर ते वाहून गेले असे दाखवले जायचे, परंतु आता हिंदुस्थानमधील नामवंत कंपन्या तिथे रस्ते, रेल्वेमार्ग आणि विमानतळे बनवत आहेत.
लडाखला एक वेगळा केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर सध्याच्या जम्मू-कश्मीरला दोन मोठय़ा भागांमध्ये वाटता येईल. पहिला भाग जम्मू- उधमपूरचा. हा भाग कश्मीर खोऱ्यापासून पीर पंजाल या पर्वतरांगांमुळे वेगळा होतो. पीर पंजाल पर्वताच्या उत्तरेला कश्मीर खोरे (Valley of Jhelum river) आहे, जे सपाट आहे व 130 ते 140 किलोमीटर लांब आहे आणि 30 ते 40 किलोमीटर रुंद आहे. कश्मीर खोऱ्याला चारही बाजूने पीर पंजाल डोंगर आणि शमशाबारी डोंगर यांनी वेढलेले आहे. जम्मू भागामध्ये डोंगरांची उंची 3 हजार फुटांपासून 10-11 हजार फूट एवढी आहे. श्रीनगर खोऱ्याच्या आसपास डोंगरांची उंची 3-4 हजार फुटांपासून 10-11 हजार फूट एवढी आहे. 8 ते 9 हजार फुटांच्या वर बर्फ पडतो आणि उंच डोंगरावर कमीत कमी चार ते सहा महिने बर्फ असतो. डोंगराळ भाग असल्यामुळे इथे रस्ते बनवणे किंवा रेल्वेमार्ग बनवणे अतिशय कठीण असते.
बर्फ पडल्यामुळे किंवा दरडी कोसळल्यामुळे रस्ते तीन ते चार महिने बंद असतात. इतकी वर्षे या भागात रस्ते, रेल्वे विकासाची फारशी कामे झाली नाहीत, परंतु गेल्या काही वर्षांपासून कश्मीरमध्ये रस्ते, रेल्वेमार्ग आणि विमानतळे यांच्या बांधणीमध्ये क्रांती होत आहे. ज्या वेगाने रस्ते आणि रेल्वेमार्ग बांधले जात आहेत, तो वेग आश्चर्यजनक आहे. एकेकाळी सर्वच बाबतीत मागे असलेल्या जम्मू-कश्मीरमध्ये बदल होत आहे. त्यामध्ये रेल्वे सेवेचाही समावेश आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली तरी जम्मू-कश्मीरमधील रेल्वेचा पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही, पण गेल्या काही वर्षांपासून जम्मू-कश्मीरमध्ये रेल्वेच्या विकासाला वेग आला आहे. खोऱ्यातील रेल्वे ‘कनेक्टिव्हिटी’मध्ये चिनाब पूल हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 1 हजार 315 मीटर लांबीचा, नदीच्या तळापासून 359 मीटर उंचीवर बांधलेला आणि 467 मीटरच्या कमानीने सजलेला हा पूल ‘आयफेल टॉवर’ आणि ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सारख्या इमारतींपेक्षादेखील उंच आहे. चिनाब नदीवरील हा पूल उत्तर रेल्वे आणि ‘केआरसी एल’खाली बांधण्यात आला आहे. हा पूल बनवण्यासाठी सुमारे 25 हजार टन धातूचा वापर करण्यात आला. उणे 20 अंश तापमान आणि ताशी 260 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे हा पूल सहन करू शकणार आहे. त्याची रचना इतकी मजबूत आहे की, 2001च्या गुजरात भूकंपाप्रमाणे ते उच्च तीव्रतेचे भूकंपदेखील सहन करू शकणार आहे.
रियासी जिल्ह्यात बांधण्यात आलेला पूल केवळ कौरी आणि बक्कल गावांनाच जोडणार नाही, तर कश्मीर ते कन्याकुमारी थेट रेल्वे सेवा सुरू करण्यातही उपयुक्त ठरेल. चिनाब पूल वाहतुकीसाठी उत्तम मार्ग तर उघडेलच, पण सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देण्याचे साधनही बनेल. या पुलामुळे येत्या काळात ‘वंदे भारत’ रेल्वेदेखील कश्मीर खोऱ्यात धावताना दिसणार आहे.
चिनाब नदीवरील पुलाप्रमाणेच अंजी भागातील देशातील पहिला ‘केबल स्टाइड’ रेल्वे पूल जम्मू-कश्मीरच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. हा पूल कटरा ते रियासीला जोडेल. या पुलाची लांबी 473.25 मीटर असून नदीपात्रापासून 331 मीटर उंचीवर हा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल जोरदार वादळाचा सामना करू शकतो. या पुलास 96 केबल्सद्वारे आधार देण्यात आला आहे. हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे, जो जम्मू-कश्मीर प्रदेशातील ‘रेल्वे नेटवर्क’ मजबूत करेल आणि राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल.
चिनाब पुलाच्या उभारणीमुळे कश्मीर खोरे रेल्वे सेवेशी जोडले जाणार असून त्यामुळे या भागातील व्यवसाय आणि इतर आर्थिक घडामोडींना चालना मिळणार आहे. सध्या रियासी शहरापासून अंजी पुलाला रस्त्याने पोहोचता येते आणि जम्मूपासून त्याचे अंतर सुमारे 80 कि.मी. आहे. ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प विकसित करत आहे. अंजी रेल्वे पूल सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. जम्मू-कश्मीरमध्ये ‘कनेक्टिव्हिटी’ वाढत आहे.
आजकाल कश्मीर हे लोकांचे सर्वात आवडते पर्यटनस्थळ बनले आहे. अंजी रेल्वे पूल बांधल्याने आगामी काळात त्यांची संख्या आणखी वाढेल. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्गाचीदेखील वेगवान प्रगती सुरू आहे. या मार्गासाठी खास ‘वंदे भारत’ रेल्वे तयार करण्यात येत आहे. या विशेष रेल्वेची निर्मिती करताना तापमान, बर्फ या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून वर्षाअखेरीस राज्यात टेलिपह्न कनेक्टिव्हिटी, पार्सल सेवा, सिमेंट आणि औषध व्यापारास गती देण्यात येणार आहे. याशिवाय सफरचंद व्यापारासाठीदेखील रेल्वेचा वापर केला जाणार आहे. जम्मू-कश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे मजबूत झाल्यास तेथील अंतर्गत दळणवळणदेखील वाढणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुर्गम भागांपर्यंत रेल्वेद्वारे विकास पोहोचण्यास गती मिळणार आहे.
श्रीनगर आणि जम्मूदरम्यानचा ट्रेन प्रवास वेळ तीन ते साडेतीन तासांपर्यंत असेल. यावर पूर्णपणे सीसीटीव्ही कवच असेल. ‘वंदे भारत’ गाडय़ा लोकांना जम्मू ते श्रीनगर असा प्रवास करू देतील आणि त्याच संध्याकाळी परत येतील. या ट्रेनमुळे सफरचंद, सुका मेवा, पश्मिना शाल, हस्तकला इत्यादी वस्तूंची त्रासमुक्त वाहतूक सुलभ करून कश्मीरमधील लोकांना फायदा होईल. दैनंदिन वापराच्या वस्तू देशातील इतर ठिकाणांहून खोऱ्यात नेण्याचा खर्चही कमी होण्याची अपेक्षा आहे. बनिहाल आणि बारामुल्लादरम्यान चार कार्गो टर्मिनल बांधले जात आहेत.
लांबच्या अंतरावर रेल्वेने जड सामान पाठवणे हे रस्त्यावरून सामान पाठवण्यापेक्षा निम्म्या किमतीत केले जाऊ शकते. सैन्याचे लाखो टन सामान प्रत्येक वर्षी कश्मीरमध्ये पाठवले जाते, ते आता रेल्वेने कमी किमतीमध्ये पाठवता येईल. जम्मू-कश्मीरमधील रेल्वे जाळय़ाचा विकास महत्त्वाचाच म्हणावा लागेल.