रंगरंगोटी – ज्येष्ठ आणि श्रेष्ठांची रंगभूषा

350

>> चंद्रशेखर केमनाईक

प्रामाणिकपणे आपलं काम केलं की फळ हमखास मिळतं आणि जोडीला ज्येष्ठांचे आशीर्वादही

एखादी व्यक्तिरेखा समजून घेऊन, तिचा अभ्यास करून कलाकाराच्या चेहऱयावरील उणिवा नाहीशा करणे म्हणजे ‘रंगभूषा’…  सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या व्यक्तिरेखेला दिग्दर्शकाच्या नजरेतून घडवणे, जेणेकरून प्रेक्षकांना जवळची आणि आपली वाटेल. गेल्या अठरा वर्षांपासून माझा रंगभूषाकार म्हणून व्यवसाय सुरू आहे. शाळेत असल्यापासून चित्रकलेची आवड होती. त्यामुळे रंगभूषेच्या व्यवसायात उतरलो. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा कोर्स केला नाही. इतर रंगभूषाकार कशी रंगभूषा करतात हे बघत, त्यांच्यासोबत काम करत करतच रंगभूषा करून लागलो. 

‘प्रेम असावं तर असं’ या नाटकापासून माझ्या रंगभूषेला सुरुवात झाली. एका नाटकासाठी ज्येष्ठ कलाकार अरुण नलावडे यांची एका युरोपियन माणसाची रंगभूषा मला साकारायची होती. तेव्हा थोडं दडपण आलं होतं, पण त्यांनी  सांगितलं की, तुझ्या मनाप्रमाणे कर. तेव्हापासून या कलेबाबत आत्मविश्वास वाढला. ‘रा रंग ढांग’ या राज्य नाटय़ स्पर्धेतील नाटकासाठी मला ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांच्याकडून पारितोषिक देण्यात आले.

रानभूल, यदा कदाचित, सूर्याची पिल्ले, झोपी गेलेला जागा झाला, हमीदाबाईची कोठी, कटय़ार काळजात घुसली, अमर फोटो स्टुडियो, होते कुरूप वेडे, पोएटिक जस्टिस, जन्मरहस्य अशा वेगवेगळ्या विषयांवरील नाटकांमधील कलाकारांची रंगभूषा करण्याची संधी मिळाली. विषय वेगळा… त्यामुळे व्यक्तिरेखा वेगळी…रंगभूषा वेगवेगळी… त्यामुळे रंगभूषाकार म्हणून  घडायला मदत झाली. रंगभूषाकाराने लाईट आणि कॅमेऱयाचाही अभ्यास करायला हवा असं मला वाटतं.

मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. कारण नाटकातील खूप जुन्या, जाणकार कलावंतांची रंगभूषा साकारण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी त्यांच्या पाया पडूनच त्यांचा मेकअप करतो. या क्षेत्रात नवीन आलेल्या मुलांना माझा सल्ला आहे की, प्रामाणिकपणा सोडू नका. इथे खूप वाव आहे. इथल्या जुन्या नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करा. इतर रंगभूषाकार कसे काम करतात याचे निरीक्षण करा. जुन्या रंगकर्मींनी कसे काम केले असेल याचा मी शोध घेत राहतो. महत्त्वाचे म्हणजे रंगभूषेचे आजच्या इतके प्रगत तंत्रज्ञान नसताना त्यांनी ही कला कशी साधली, हे अभ्यासणे गरजेचे आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या