दखल – चिकित्सक दृष्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> जी. के. पवार

ट्रेडिंगमध्ये तुम्ही नवखे असाल किंवा अनुभवी असाल, तरी लोकप्रिय लेखक सुनील गुर्जर यांनी लिहिलेल्या ‘टेक्निकल अॅनालिसिस मेड इझी’ या पुस्तकाची तुम्हाला मदतच होईल. हे शेअर बाजारातील तांत्रिक विश्लेषणाची व्यापक आणि उदाहरणाधारित ओळख करून देणारे पुस्तक आहे. या पुस्तकाची तुम्हाला मदतच होईल. भूतकाळातली किमतीची माहिती, तांत्रिक इंडिकेटर्स आणि चार्ट पॅटर्न्सचा योग्य उपयोग करून ट्रेडिंगसंबंधी योग्य निर्णय कसे घ्यायचे, हे या पुस्तकातून तुम्हाला समजेल. या पुस्तकाचा मराठी अनुवाद पूनम छत्रे यांनी केला असून, साकेत प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे. चार्टवाचन, ट्रेडिंगची धोरणे आणि जोखीम व्यवस्थापन शिकू इच्छिणाऱया मराठी वाचकांसाठी पुस्तकाची मांडणी उपयुक्त आहे.

शेअर बाजारातील किमतींच्या हालचालींमागील संकेत समजून घेण्याची दृष्टी विकसित करणे हा पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. ट्रेंड म्हणजे काय, सपोर्ट आणि रेझिस्टन्स कसे ओळखायचे, चार्टवर तयार होणाऱया आकृतिबंधांचा अर्थ कसा लावायचा, अशा प्राथमिक प्रश्नांपासून लेखक सुरुवात करतो.

संकल्पना, आकृती आणि प्रत्यक्ष बाजारातील उदाहरण यांची सांगड हे पुस्तकाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. चार्ट पॅटर्न आणि कँडलस्टिक पॅटर्न यांना स्वतंत्र प्रकरणे दिल्यामुळे दोन्हींचा अभ्यास व्यवस्थित करता येतो. भारतीय कंपन्यांच्या चार्टमुळे विषय परिचित वाटतो. प्रवेशाची किंमत, स्टॉप-लॉस आणि व्यवहारातून बाहेर पडण्याची पातळी यांचे स्पष्टीकरण वाचकाला एखादी संकल्पना प्रत्यक्ष निर्णयाशी कशी जोडली जाते, हे समजावते.

ट्रेडिंगच्या धोरणांवरील प्रकरण पुस्तकाला व्यावहारिक स्वरूप देते. मूव्हिंग अॅव्हरेज क्रॉसओव्हर, ब्रेकआऊट, सुपरट्रेंड, मीन रिव्हर्जन आणि आयपीओ बेसिंग यांसारख्या पद्धतींचा परिचय यात आहे. एकाच विषयातील विविध दृष्टिकोन समजून घेण्यासाठी हा भाग उपयोगी ठरतो. जोखीम व्यवस्थापन आणि ट्रेडिंगचे मानसशास्त्र यांना दिलेले स्थान विशेष महत्त्वाचे आहे. भांडवल जपणे, व्यवहाराचा आकार ठरवणे आणि स्टॉप-लॉसचे नियोजन करणे यांचा लेखक आग्रह धरतो. भीती, लोभ, नुकसान स्वीकारण्याची अनिच्छा, अतिट्रेडिंग आणि स्वतच्या मताला अनुकूल पुराव्यांवर अवलंबून राहणे यांची चर्चाही केली आहे. सुरुवातीलाच तांत्रिक विश्लेषणाच्या मर्यादा नमूद केल्यामुळे विषयाकडे चिकित्सकपणे पाहण्याची संधी मिळते.

मराठी अनुवादातील संवादात्मक शैली वाचकाला विषयाशी जोडून ठेवते. व्यावसायिक गुंतवणूकदार बाजाराचे विश्लेषण कसे करतात, त्यांची प्रत्यक्ष उदाहरणे, तुमच्या आर्थिक भविष्यकाळाची सूत्रं, विषयाची व्याप्ती, भारतीय बाजारातील उदाहरणे आणि शिस्तबद्ध व्यवहारांवर दिलेला भर यामुळे हे पुस्तक उपयुक्त अभ्याससाहित्य ठरू शकते.

टेक्निकल अॅनालिसिस मेड इझी

लेखक ः सुनील गुर्जर, अनुवादिका ः पूनम छत्रे

प्रकाशक ः साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर

पृष्ठे ः 264,

मूल्य ः 399 रु.