नोंद – अनेक गोष्टींचा वाचक दिन

>> रविप्रकाश कुलकर्णी

रोज सूर्य उगवतो आणि मावळतो. त्याला आपण दिवस म्हणतो, पण प्रत्येक दिवस सारखा नसतो. एकेका दिवसाचा दिनविशेष असतो. 25 डिसेंबर म्हटलं की अर्थातच ख्रिसमस-नाताळ हे वेगळं सांगायला नकोच. या  नाताळाचं वैशिष्टय़ म्हणजे तो येणाऱया नव्या वर्षाची चाहूल देत असतो, पण आता मात्र ग्रंथप्रेमींच्या लेखी 25 डिसेंबर म्हणजे ग्रंथालीचा वाचक दिन असतो. ग्रंथाली म्हणजे केवळ एक प्रकाशन संस्था नसून ग्रंथ व्यवहाराबरोबरच मराठी सांस्कृतिक जगताची स्पंदनं टिपणारी चळवळ आहे. गेली पन्नास वर्षे हे सातत्याने दिसून आलेलं आहे. ग्रंथालीच्या वाचकदिनी म्हणजे 25 डिसेंबर रोजी जी पुस्तके प्रकाशित होतात त्याकडे जाणत्या वाचकांचे नेहमीच लक्ष लागलेले असते. कारण ही पुस्तके नेहमीच वेगळय़ावाटेने चालण्याचा, निदान तसा प्रयत्न करताना दिसतात. त्यात केवळ धंद्याचा दृष्टिकोन नसतो…

यंदाचा म्हणजे 2025 मधील ग्रंथाली वाचक दिनाचे वेगळेपण म्हणजे एरवी हा कार्पाम मुंबईमध्येच होतो, पण या वर्षी आधी मुंबईबाहेर म्हणजे ठाणे, वसई-विरार आणि वाशी येथील साहित्यप्रेमी संस्थांना अनुदान देऊन तेथे वाचक दिन साजरा झाला. मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे, विवा महाविद्यालय विरार आणि कोकण मराठी साहित्य परिषद विरार शाखा यांचा या सोहळय़ात सहभाग होता, परंतु 25 डिसेंबर म्हणजे ग्रंथालीचा वाचक दिन हे समीकरण गेली पन्नास वर्षे जेथे करून दाखवले त्या मुंबईत 51 वा वाचक दिन साजरा होणे अटळच होते. आणि ते बरोबरही आहे.

याप्रसंगी अरुण साधू स्मृती अनुदान पुरस्कार संवेदना फाऊंडेशन सामाजिक संस्थेला देण्यात आला. तो यशोदा वाकणकर यांनी स्वीकारला. या सोहळय़ाचा विशेष कार्पाम म्हणजे रंगनाथ पठारे यांची नितीन रिंढे यांनी घेतलेली मुलाखत. एरवीदेखील हा लेखक फारसा सार्वजनिक कार्पामात दिसत नाही. ते मोकळेपणे बोलतदेखील नाहीत, पण यावेळी मोकळेपणे आणि सहज बोलले! विशेष म्हणजे आपल्या लेखन प्रवासात सुरुवातीला ज्यांचे ज्यांचे म्हणून सहाय्य झाले त्यांचे  ऋण त्यांनी मान्य केले. आपली पहिली कथा सत्य कथेत प्रसिद्ध झाली. हे त्यांनी सांगून टाकले, पण त्याला जोडूनच ते म्हणाले मात्र पुढे त्यांचे आमचे जमले नाही.

आपली एक कथा हंस मासिकाचे संपादक आनंद अंतरकर यांनी स्वीकारली. पण ते म्हणाले, `ही मी छापतो आहे खरी, पण ती  बेतलेली आहे असं वाचताना पुन: पुन्हा जाणवतं. तुम्ही ती मोकळेपणाने सांगितली पाहिजे.’

त्याचाच परिणाम म्हणजे मी हे लेखन मोकळेपणाने पुन्हा लिहिले आणि त्यातूनच कादंबरी जन्माला आली ती म्हणजे `दिवे गेलेले दिवस’. पठारे कादंबरीकार झाले ते असे. ही त्यांची पहिली कादंबरी आनंद अंतरकर यांच्या विश्वमोहिनी प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली.

कादंबरीची जन्मकथा पठारे यांनी रोचकपणे सांगितली हे विशेष. अर्थात रंगनाथ पठारेसारखा मोठा लेखक अल्पकाळाच्या मुलाखतीत दिसणं अशक्यच. तरीसुद्धा इथे अल्पकाळाच्या मुलाखतीत ते छान आणि परिणामकारक बोलले. यानिमित्ताने त्यांच्या साहित्याची ओळख सांगणारी एक पुस्तिका प्रकाशित झाली. 51 व्या वाचक दिनाची ही कमाई लक्षात राहील.

ग्रंथालीचा वाचक दिन म्हटलं की यानिमित्ताने बरीच पुस्तके प्रकाशित होणार असा आतापर्यंतचा पायंडा. 51 व्या वाचक दिनात एकूण 11 पुस्तके प्रकाशित झाली. हे सगळं इतकं भरमार झालं की, नंतर नंतर समोर काय चाललंय याच्यावरचं लक्ष उडायला लागलं…

अशा कार्पामात श्रोत्यांची कोणीच का काळजी करत नाही? मात्र वाचक दिन चांगला झाला. थोडा आटोपशीर झाला असता तर अधिक चांगला झाला असता.