लेख : वाहन उद्योगावरील मंदीचे सावट

785

सुभाषचंद्र सुराणा

देशातील प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेवर मंदीचे मळभ दाटले आहे. गेल्या सहा महिन्यांत अनेक पंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या विक्रीत घट होत असल्याने उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे कारचे वितरक शोरूम बंद करण्याचा निर्णय झपाटय़ाने घेत आहेत. 2020 सालापर्यंत हिंदुस्थान जगातील एक महासत्ता म्हणून उदयास येण्याचे स्वप्न आपण पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुस्थानची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्सची बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलेले असताना व्यवसायातील मंदी व बेरोजगारीचे संकट दूर झाल्याशिवाय हे स्वप्न व उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही.

हिंदुस्थानी वाहन उद्योगांत सध्या प्रचंड मंदीची लाट आहे. या मंदीमुळे देशातील वाहन उद्योग आर्थिक संकटाच्या विळख्यात गुरफटलेला आहे. या मंदीच्या लाटेमुळे देशभरातील 20-25 लाख कर्मचारी वर्गाच्या नोकऱ्या गेलेल्या असून त्यांच्यावर बेरोजगारीचा जबरदस्त फटका बसलेला आहे.

देशभरातून गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या बेसुमार वाढत होती. यावेळी हिंदुस्थानी अर्थव्यवस्था व वाहन उद्योग तेजीत होता. देशातील वाहनांची निर्यात 45 हजार कोटींची आहे आणि देशात सर्वाधिक रोजगार देणारा वाहन उद्योग साडेचार लाख कोटींचा आहे. तोच सध्या आर्थिक मंदीच्या विळख्यात गुरफटलेला आहे. गेल्या वर्षभरापासून या उद्योगात मरगळ असल्याने अनेक पंपन्यांनी वाहनांचे उत्पादन थांबविले आहे. या मंदीच्या लाटेमुळे वाहनाचे सुटे भाग तयार करणाऱ्या पंपन्यांना याचा जबरदस्त फटका बसलेला आहे. या वस्तुस्थितीमुळे या व्यवसायाशी संलग्न असलेल्या पूरक उद्योगातील जवळपास 20 लाख कामगारांना नोकरी गमवावी लागलेली आहे. हरयाणा, संभाजीनगर, नाशिक, पुणे, चेन्नई, जमशेदपूर व उत्तराखंडातील अनेक पंपन्यांनी नोकरकपात केली आहे. वाहन उद्योगातील या मंदीचे दुष्परिणाम अत्यंत वाईट परिस्थितीने गळय़ाला फाशी लागेल इथपर्यंत पोहोचले आहेत. ‘बॉश’सारख्या आघाडीच्या सुटे भाग पुरविणाऱ्या पंपनीला सलग पाच दिवस उद्योग, कामकाज बंद ठेवावे लागत आहेत. ही धोक्याची घंटा असून ही स्थिती अतिशय चिंताजनक आहे. कार, व्यावसायिक वाहने, दुचाकी आदींच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या पंपन्यांना या मंदीची सर्वाधिक झळ बसलेली असून त्यांना कोटय़वधी रुपयांचा तोटा सहन करणे भाग पडत आहे.

वाहनांचे सुटे भाग तयार करण्याच्या उद्योगात जवळपास 50-60 लाख कामगार काम करतात. जीएसटीमुळे गेल्या एक वर्षापासून विक्रीत 80 टक्के घट आली आहे. वाहन उद्योगाचा भाग असणाऱ्या सर्व उद्योगांवर सारखाच जीएसटी आकारण्याची मागणी ऑटोमोटिव्ह पंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाने पेंद्र सरकारकडे केली आहे. या संघटनेचे महासंचालक विन्नी मेहता यांनी या उद्योग क्षेत्रातील मंदी या गंभीर परिस्थितीची कल्पना पेंद्रीय परिवहन भूपृष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे. जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनांची विक्री 70 टक्क्यांनी घटली आहे. या क्षेत्रात काम करणारे 70 टक्के कर्मचारी पंत्राटावर काम करतात. त्यामुळे मंदीच्या परिस्थितीमुळे या कर्मचारी वर्गाला कामावरून कमी करण्यात आले आहे. सुटय़ा भागांच्या कारखान्यांत काम करणारे, वाहनाची ने-आण सेवा देणारे इत्यादिकांचे रोजगार संपुष्टात आले आहेत.

देशभरात सुटे भाग निर्माण करणाऱ्या पंपन्यांची संख्या सुमारे 50 हजार आहे. या सर्व पंपन्यांची आर्थिक उलाढाल प्रचंड आहे. देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा 2.3 टक्के हिस्सा आहे. महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहत ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांचे सुटय़ा भागांचे उत्पादन येथे होते. दिल्ली, गुजरात, दक्षिण हिंदुस्थानातील उद्योगांना येथून सुटे भाग पुरविले जातात. सध्या येथील ऑटोमोबाईल इंडस्ट्री मंदीच्या लाटेत गुंडाळली जात आहे. येथील इंडस्ट्रीमध्ये जवळपास दीड ते 2 लाखांच्या आसपास कामगार आहेत. त्या सर्व कर्मचारी वर्गावर बेकारीची भीती निर्माण झाली आहे. स्कोडा, होंडा, टाटा, बीएमडब्ल्यू, व्हॉल्व्हो, मारुती यांच्या उत्पादनासाठी लागणारे सुटे भाग संभाजीनगरमध्ये तयार होतात.

देशांतर्गत व्यावसायिक आणि खासगी कारच्या विक्रीमध्ये जून महिन्यात 25 टक्क्यांनी घसरण झाली आहे. कार विक्रीत घट होण्याचा जून हा सलग आठवा महिना आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि टोयोटा आदी सर्व प्रमुख पंपन्यांची विक्री 50 टक्क्यांनी घटली आहे. मारुती सुझुकीने गेल्या पाच महिन्यांपासून उत्पादन कमी केले आहे. मारुती कारच्या उत्पादन व विक्रीत एप्रिल ते जून या तिमाहीत या पंपन्यांचा नफा तब्बल 31 टक्के घटून 1,376 कोटी रु.पर्यंत खालावला आहे. बजाज ऑटोच्या नफ्यातही 3 टक्के घट झाली आहे. जपानमधील आघाडीची कार उत्पादक पंपनी निस्साननेदेखील कामगार कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या पंपनीच्या हिंदुस्थानातील प्रकल्पात कार्यरत असणाऱ्या 1700 कामगारांना नोकरीतून कमी करण्याची वाटचाल सुरू आहे. या पंपनीच्या कार विक्रीत 30 टक्क्यांनी घट झाली आहे. या पंपनीचा हिंदुस्थानातील व्यवसायाचा आलेख घसरलेला आहे. निस्सानच्या एपूण नफ्याने 10 वर्षांतील यंदा नीचांक नोंदविला आहे.

वाहन उत्पादक पंपन्यांमध्ये एकेकाळी जगात दबदबा राखणाऱ्या टाटा मोटर्सच्या तोटय़ात दुपटीने वाढ झाली आहे. जूनअखेरच्या तिमाहीत या पंपनीचा तोटय़ाचा आकडा 3,679 कोटी रु.वर पोहोचला आहे. यामुळे पंपनीच्या वाहनांना चीनमधून कमी मागणीचा फटका बसला आहे. त्यामुळे नॅनोसारख्या कारची विक्री व उत्पादन गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. वर्षभरापूर्वीच्या याच तिमाहीदरम्यान टाटा मोटर्सला 1,862.57 कोटी रु.चा तोटा झाला होता.

मंदीसदृश वाहन उद्योग क्षेत्रात विपणन खर्च व घसघशीत सूट-सवलतीचा फटकादेखील सर्व वाहन पंपन्या व सुटे स्पेअर पार्ट बनविणाऱ्या 3000 पंपन्यांना कोटय़वधी रु.चा फटका सहन करावा लागत आहे.

देशातील प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेवर मंदीचे मळभ दाटले आहे. गेल्या सहा महिन्यांत अनेक पंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या विक्रीत घट होत असल्याने उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे कारचे वितरक शोरूम बंद करण्याचा निर्णय झपाटय़ाने घेत आहेत. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार 200 कारची शोरूम बंद झालेली आहेत. 2020 सालापर्यंत हिंदुस्थान जगातील एक महासत्ता म्हणून उदयास येण्याचे स्वप्न आपण पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिंदुस्थानची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्सची बनविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलेले असताना व्यवसायातील मंदी व बेरोजगारीचे संकट दूर झाल्याशिवाय हे स्वप्न व उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही. तेव्हा प्रथम व्यवसायातील मंदी दूर करण्यासाठी सरकारने भगीरथासारखा प्रयत्न केला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या