साहित्य जगत- असाही ऋणानुबंध 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

>> रविप्रकाश कुलकर्णी

अश्वानकथा आणि त्याचे कौतुक सांगावे तेवढे कमीच. कारण भल्याभल्यांची असणारी श्वानप्रीती! त्यामुळेच पाळीव प्राणी दिनाच्या वेळी त्यांच्या कुत्र्यांची छायाचित्रे भरभरून दिसतात. श्वानप्रेम आणि त्याचे कौतुक सांगणारी पुस्तकेही आहेत. लेखक, संपादक विनोद मेहताने आपले आत्मचरित्र त्याच्या आवडत्या कुत्र्याला अर्पण केलेले आहे. पत्रकार सत्या सरन यांनी आपल्या पुस्तकात आपला नवरा, मुले वगैरेंचे आभार मानले आहेत, पण त्यात त्यांच्या कुत्र्याचाही अंतर्भाव आहे. सांगायचे तात्पर्य असे की, एकदा का प्रीती जडली की जडली!

हे श्वानप्रेम कोणत्या थराला जाते याचे एक उदाहरण सांगतो. सुप्रसिद्ध लेखक ना. सी. फडके यांना जोशी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. रात्री त्यांना घेण्यासाठी गोळ्या दिल्या. त्यात दिवसा दिलेल्या गोळ्यांसोबत आणखी एक गोळी होती. फडक्यांनी म्हटले की, ही वाढीव गोळी कसली? तेव्हा डॉक्टर म्हणाले, ही झोपेची गोळी आहे. तेव्हा फडके म्हणाले, ‘मला तर झोप चांगली लागते. मग ही गोळी कशासाठी?’ तेव्हा डॉक्टर म्हणाले, “आमचा कुत्रा रात्री फार रडतो. त्यामुळे पेशंटची झोप डिस्टर्ब होते म्हणून आम्ही सगळ्या पेशंटला रात्री झोपेची गोळी देतो.” तेव्हा फडके वैतागून म्हणाले, “अहो डॉक्टर, सगळ्या पेशंटना झोपेच्या गोळ्या देण्याऐवजी तुमच्या कुत्र्यालाच झोपेची गोळी तुम्ही का देत नाही?” तेव्हा डॉक्टर म्हणाले, “त्याला झोपेची गोळी आवडत नाही…” तर असे हे श्वानप्रेम. तिथे कोणाचे काही चालत नाही हेच खरे.

मात्र असे प्रेम भटक्या कुत्र्यांच्या भाळी क्वचितच असते, किंबहुना त्यांच्या नशिबी हाडहूडच लिहिलेले असते. अर्थात त्यालाही काही अपवाद आहेतच. उद्योगपती टाटांना एकूणच श्वान जातीबद्दल ममत्व आहे. त्यांच्या बॉम्बे हाऊस ऑफिससमोरच्या रस्त्यावर खूप भटक्या कुत्र्यांचा वावर होता. त्यांनी या भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र मोठे पिंजरे केले आणि तेथे त्यांची मोठय़ा प्रेमाने बडदास्त ठेवत.

भटक्या कुत्र्यांना जाणून कुणी घेतले असेल ते कराडच्या विद्याधर म्हैसकर यांनी. त्यांच्या ‘रेषांतर’ या क्षणचित्रांच्या संग्रहात त्यांनी नेमकेपणाने ते टिपले आहे. ते म्हणतात, “गल्लीतल्या कुत्र्यांची नेमणूक कोणी केलेली असते? खरे तर सगळी बेवारस असतात. त्यांचा मालक असा नसतो. एखाद्या गल्लीत एकत्र येऊन ही आमची गल्ली आहे, असे कसे ते परस्पर ठरवतात? अशा गल्ल्यागल्ल्यांतून भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या 24 तास पहारा देत असतात. तुम्ही खायला घाला न घाला, आम्ही आमचे कर्तव्य बजावणार, अशी भूमिका. ही जगतात कशी? खातात काय आणि कोण घालतो? त्यांच्यासाठी कोणी अन्नछत्र उघडलेले नाही तरीही एवढी टुमटुमीत कशी? रात्रपाळी करूनही दिवसभर त्यांची पळापळ किती चालते. मला वाटते, आठ-दहा किलोमीटर त्यांचे रोजचे पळणे होत असेल. निवाऱयाची सोय तेच ठरवतात. घराच्या वळचणीला,

पार्किंग केलेल्या मोटारी, ट्रकखाली किंवा रस्त्याकडेला, झाडाखाली, वाळूच्या ढिगाऱयावर, दुकानांच्या पायऱयांवर  त्यातले कोणी लुळेपांगळे वा आजारलेले कसे दिसत नाही? नेहमी सतर्क कशी? एवढे सगळे कौतुक केल्यानंतर म्हैसकर अशा एका भटक्या कुत्र्याचे रेखाचित्र काढतात आणि म्हणतात, “आता हाच बघा ना कसा उभा आहे!”काय म्हणावं याला? बेवारशी कुत्र्यांवर एवढे प्रेम क्वचितच कुठे दिसेल.

आत्ता माझ्या समोर मनोरमा प्रकाशनने काढलेले संजय चांदे लिखित ‘स्वर्गीय ऋणानुबंध’ पुस्तक आले आहे. चांदे यांचा छोला हा पुत्रवत कुत्रा. तो गेल्यानंतर त्यांनी त्याच्या आठवणी भरभरून जागवल्या आहेत, पण या पुस्तकाची अर्पणपत्रिका पहा, ‘कडाक्याच्या थंडीत आणि मुसळधार पावसात शरीरातील वेदना सहन करीत दुःखी मनाने पोटातील भुकेचा आगडोंब न शमवता ती भूक मारत तसंच अंगाचं मुटकुळं करून कुठल्या तरी आडोशाला पडून राहत कितीतरी रात्री काढणाऱया आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे कोणाला सांगताही न येणाऱया अशा तमाम भटक्या कुत्र्यांना माझं हे पुस्तक समर्पित.’

भटक्या कुत्र्यांचा असा गौरव करणारी ही एकमेव अर्पणपत्रिका आहे म्हणूनच ही नोंद!