
>> वैश्विक, [email protected]
आजकाल क्रिकेटचा मोसम या ना त्या मालिकांमुळे जसा जगात कुठे ना कुठे वर्षभर चाललेला असतो, तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय घडामोडी, परिषदा, चर्चा आणि युद्धसुद्धा घडत असतात. या साऱ्याचं व्हिडीओ चित्रण ती घटना घडत असतानाच आपल्या टीव्हीवर किंवा अगदी मोबाइलवरही ‘प्रकट’ होताना दिसतं. ही सारी दूरदृष्यप्रणालीच्या विज्ञानाची कृपा. सुरुवातीला मीडियम आणि शॉर्टवेव्ह फ्रिक्वेन्सीपुरता मर्यादित असलेला रेडिओ, बिनतारी ‘कडकट्ट’ या ‘मोर्स कोड’वर चालणारं तारायंत्र ऊर्फ टेलिग्राम त्यानंतर महासागरांच्या तळापासून ते भूगर्भात सर्वत्र तारा (वायर) अंथरून झालेली पह्नची जागतिक सुविधा या गोष्टींचा विस्मय विरून त्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्या आणि वैज्ञानिक पुढच्या संशोधनाला लागले. 1945 च्या सुमारास टीव्ही, मग रंगीत टीव्ही अशी प्रक्षेपणं त्या त्या काळात आश्चर्यकारक वाटली. मात्र 1957 मध्ये ‘स्पुटनिक-1’ अवकाशात गेल्यावर पृथ्वीवरच्या दाही दिशांच्या पलीकडचं विशाल अंतराळ ‘संपर्क साधनां’साठी मुक्तपणे उपलब्ध झालं.
आरंभी पृथ्वीच्या वातावरणापासून दोन-तीनशे किलोमीटर अंतरावरून पृथ्वीभोवती परिक्रमा करणारे उपग्रह मर्यादित प्रमाणात संपर्क यंत्रणा म्हणून काम करू लागले. कारण नव्वद मिनिटांत पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह तो अवकाशात सोडणाऱया देशावरच्या आकाशात येईल तेवढय़ाच काळाच्या ‘विंडो’मधून त्याचा उपयोग होऊ शकत असे. यापेक्षा उपग्रह सातत्याने संपका&त राहील आणि हवामान, शेती, कार्यक्रम प्रसारण अशा अनेक गोष्टींसाठी कार्यरत कसा ठरेल याचा विचार सुरू झाला तो विज्ञानकथा पिंवा सायन्स फिक्शनमधून.
आर्थर सी. क्लार्क हे जगप्रसिद्ध विज्ञानकथा लेखक. त्यांनी 1940 मध्ये ‘जिओस्टेशनरी सॅटेलाइट’ची कल्पना मांडली. अर्थात त्यापूर्वीही अन्य काही जणांनी त्याबद्दलचा विचार केला होता. हर्मन पोटॉनिक किंवा जॉर्ज स्मिथ यांच्या लिखाणातही याचे उल्लेख होते, परंतु क्लार्क यांच्या ‘एक्स्ट्राटेरेस्ट्रिअल रिलेज’ किंवा पृथ्वीबाह्य भागातून (म्हणजेच अंतराळातून) प्रसारण यंत्रणा जगभर रेडिओ लहरी पोहोचवू शकेल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ‘वायरलेस वर्ल्ड’ मासिकातून ती कथा खूप गाजली.
1961 मध्ये यावर प्रत्यक्ष प्रयोग करण्याचा ध्यास हर्नोल्ड रोझेन यांनी घेतला आणि आपल्या संशोधन पथकाच्या सहाय्याने 76 सेंटिमीटर व्यासाचा, 36 सेंटिमीटर उंचीचा आणि 11 किलो वजनाचा कृत्रिम उपग्रह पृथ्वीपासून दूरवरच्या अंतराळी कक्षेत ठेवून तो ‘भूस्थिर’ असेल याची तयारी केली. त्याचं नाव सिनकॉम-1. पहिला प्रयोग फसला. त्यामुळे नाउमेद न होता त्यांनी सिनकॉम-2 ची निर्मिती केली. 23 ऑगस्ट 1963 रोजी डेल्टा-डी रॉकेटद्वारे हा उपग्रह जिओसिंक्रोनस म्हणजे पृथ्वीसापेक्ष ‘स्थिर’ कक्षेत ठेवण्यात यश आलं. या पहिल्यावहिल्या भूस्थिर उपग्रहाद्वारे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी नायजेरियाचे अध्यक्ष अबुबकर यांच्याशी संवाद साधला. तो क्षण जगातील संपर्क क्रांतीमधला महत्त्वाचा टप्पा होता.
आता दूरसंपका&साठी ‘वायर’ची गरज नव्हती. जगात कुठूनही कुठेही क्षणभरात आवाजी संदेश जाऊ शकत होता. पृथ्वीपासून 35790 किलोमीटर दूरवर फिरत ठेवलेला उपग्रह पृथ्वीच्याच स्वतःच्या गतीशी सतत जुळवून घेऊ शकतो. त्यामुळे तो पृथ्वीवरच्या विशिष्ट भूभागाच्या सतत संपका&त राहतो. 77 अक्षांश ते 81 रेखांश इतका पृथ्वीचा भाग त्यांच्या संपर्क कक्षेत येत असल्याने असे अवकाशात किमान तीन विविध ठिकाणी ‘भूस्थिर’ केलेले उपग्रह संपूर्ण जगाशी परस्पर सहकार्याने संपर्क साधून देऊ शकतात.
प्रत्यक्षात त्या उपग्रहाचा वेग पुष्कळ असला तरी पृथ्वीपासून इतक्या दूर ठेवल्याने त्याची भ्रमणकक्षा प्रचंड वाढते. त्यामुळे पृथ्वीच्या गतीशी ती प्रत्यक्ष उपयोगितेत समानच भासते. म्हणजेच तो उपग्रह ‘जिओसिंक्रोनस’ किंवा ‘भूस्थिर’ दिसतो. अंतर आणि गतीच्या गणिताचा योग्य मेळ घालून हे घडते. हिंदुस्थाननेही स्वबळावर असे नऊ भूस्थिर उपग्रह अंतराळात ‘स्थिर’ केले आहेत. हे इस्रोचं मोठंच यश आहे. 10 एप्रिल 1982 रोजी हिंदुस्थाननिर्मित भूस्थिर कृत्रिम उपग्रह अमेरिकेतील केप कार्निवल येथून अवकाशात सोडण्यात आला. 1152 किलो वजनाचा हा उपग्रह सात वर्षांच्या तयारीने उडाला होता, पण सहाच महिन्यांत अयशस्वी ठरला. नंतर इन्सॅट मालिकेत अंतराळयात्री कल्पना चावला यांच्या नावानेही आपल्या देशाने भूस्थिर उपग्रह सोडला.
2018 च्या नोव्हेंबरमध्ये मात्र हिंदुस्थानने क्रायजेनिक इंजिन बनवून ‘जी-सॅट’ हा भूस्थिर उपग्रह देशातूनच अंतराळात सोडला आणि आपल्या जीएसएलव्ही रॉकेटने नंतर असे अनेक देशांचेही कृत्रिम उपग्रह अवकाशात भूस्थिर कक्षेत यशस्वीरीत्या पाठवले.
सध्या अवकाशात सर्व कक्षांमध्ये मिळून सुमारे 6718 कृत्रिम उपग्रह फिरत आहेत ते सर्व देशांचे आहेत. त्यापैकी सर्व देशांचे 600 भूस्थिर उपग्रह विषुववृत्तावरील अंतराळी कक्षेत सुमारे 36800 किमी अंतरावर फिरत आहेत. ते विषुववृत्तावरच्या ‘वैषुविक वृत्ता’वर ठेवण्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणाहून ते अधिकाधिक भूभाग पाहू शकतात.
गेल्या अनेक वर्षांत कितीतरी कृत्रिम उपग्रह निकामीसुद्धा झालेत. ते आपापसात टक्कर घडून पृथ्वीवरचं कम्युनिकेशन धोक्यात आणू शकतात. जे भूस्थिर उपग्रह निवृत्त होतात ते त्यापलीकडे 200 किलोमीटरच्या ग्रेव्हयार्ड ऑर्बिट किंवा मृतांच्या कक्षेत ढकलले जातात. तसे किमान 11 निवृत्त भूस्थिर उपग्रह आता चिरंशांतीचा अनुभव घेत आहेत!






























































