क्रिकेटवारी – ऋषभ, तुझे सलाम!

>> संजय कऱ्हाडे

ऋषभ तुला सलाम! ऋषभ तुझे सलाम!  हॅट्स ऑफ ऋषभ!! आजच्या दिवशी या तिन्ही भाषांना जेवढं महत्त्व प्राप्त झालंय तेवढय़ाच महत्त्वाचं तुझं मैदानावर उतरणं होतं… जखमी झालास तेव्हा तुझ्या नावावर 48 चेंडूंत केलेल्या 37 धावा होत्या. काल मैदानावर उतरून तू 27 चेंडू अधिक खेळलास आणि 17 धावा आणखी जोडल्यास. अर्धशतक नोंदवलस. त्यातून केवळ प्रतिपक्षालाच नव्हे तर संघातल्या बुमरासारख्या तुझ्या सहकाऱ्यांना, तरुणांना आणि पुढील पिढीच्या खेळाडूंना एक जिद्दमस्त संदेश नक्कीच मिळाला असेल.

मँचेस्टरच्या या चेंडू सीम अन् स्विंग होणाऱ्या खेळपट्टीवर हिंदुस्थानी संघाची सर्वबाद 358 ची धावसंख्या आपल्या गोलंदाजांना किती स्फूर्ती देते हेच आता पाहायचं.  एक मात्र खरं, काल जे 27 चेंडू तू लंगडी घालत खेळलास ते पाहणं आमच्यासाठी फारच क्लेशदायक होतं आणि अशी वेळ तुझ्यावर का आली याचा विचार तू गंभीरपणे करणं आवश्यक आहे. वोक्सच्या एका यॉर्करला तू उलटा झाडू मारण्याच्या प्रयत्नात जखमी झालास. पण कसोटी क्रिकेट म्हणजे शास्त्रीय संगीत असतं! त्यात वरातीत वाजणाऱ्या गाण्या-बजावण्याला जागा नसते! शिवाय, पहिल्याच दिवशी तीन चांगले फलंदाज बाद झाल्यानंतर उलटा झाडू नाही, सरळ बॅटला दिलेलं वचन पाळावं लागतं. अन्यथा उनाड, उतावळा, उथळ अशा उपाध्या कपाळी चिकटतात!

एकविसाव्या वर्षी तू कसोटी पदार्पण केलंस. धडाकेबाज आणि आकर्षक फलंदाज अन् अप्रतिम यष्टिरक्षक म्हणून क्रिकेटविश्वात फार कमी वेळात ख्याती मिळवलीस. हिंदुस्थानी संघात छान स्थिरावलास, संघाचा तारणहार झालास आणि संघासाठी विजयश्री मिळवून देणारा फलंदाज म्हणून लौकिकही हासिल केलास.

तुझा उतावळेपणा प्रथम दिसला तो गाडी सुसाट पळवून अपघातात सापडून जायबंदी झालास तेव्हा. तुझ्या पुन्हा क्रिकेट खेळण्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. अर्थात, तू जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द दाखवलीस आणि त्यातून बाहेर पडलास. हिंदुस्थानी संघात आपलं स्थान नव्याने निर्माण केलंस. वाटलं, आता त्यातूनच शिकशील, परिपक्व होशील.

आज तू सत्तावीस वर्षांचा आहेस. हे वय उच्छृंखल म्हणता येत नाही. एव्हाना, आपापल्या व्यवसायात सामंजस्य, वैचारिक परिपक्वता येणं अपेक्षित असतं. आत्मनिरीक्षण, हुशारी अन् किंचित चाणक्य बुद्धी वांछीत असते. काल जखमी पायाने मैदानात उतरलास तेव्हा तुला तुझी चूक कळली असावी असं वाटलं. तोपर्यंत तू आम्हाला असमंजस वाटलास.

अपघात केव्हाही ‘आवश्यक’ किंवा ‘अनावश्यक’ नसतो हे मान्य. तरीही तुला एक विनंती. अनावश्यक अपघातामधून तू एकदा तावून सुलाखून बाहेर पडला आहेस. लॉर्ड्स कसोटीमध्ये राहुलच्या शतकासाठी नसलेली धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झालास आणि ती आपण गमावली होती. तो अपघातही अनावश्यकच होता. तेव्हा आपण मालिकेत आघाडी नव्हे पिछाडीवर पडलो! अन् त्याच कर्जातून जान सोडवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

तुझ्या उतावळय़ा आणि अनिष्ट अपघातांमुळे संघाचं अधःपतन होऊ नये एवढी काळजी घे. अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. ध्यानात ठेव, कसोटी क्रिकेट उच्छृंखल खेळाडूंसाठी नसतं… लवकर बरा हो. तुला शुभेच्छा!