
>> प्रसाद सदाशिव कुळकर्णी
कर्मे मग ती धार्मिक असो, कौटुंबिक असो किंवा अगदी सामाजिक असो, ती दिखाव्यासाठी करू नयेत. त्यामागे श्रद्धा, भक्ती, प्रामाणिकपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे ती मनापासून असावीत व करावीत. अर्थात अगदी कोणतेही कर्म मनापासून, श्रद्धेने केले की त्याचे फळ हे मिळतच असते. परंतु माझ्या मते सर्वप्रथम माणुसकी हृदयात बाळगणे हे फार मोठे कर्म आहे. कारण वर उल्लेखलेली सगळी कर्मे करताना त्यामध्ये माणुसकीचा अभाव असेल तर काय उपयोग?
कधीही गरजवंताला मदत केली नाही, भुकेल्या पोटाला कधी अन्न दिलं नाही, आयुष्यभर दुसऱ्याला नाडून माया जमवली, घरातल्या ज्येष्ठांना कधीही सुख न देता त्यांना वाऱयावर सोडलं आणि त्यांचा मृत्यू झाल्यावर श्राद्धविधी मात्र धुमधडाक्यात केले, पूजाअर्चा व होमहवन यामध्ये दुधा-तुपाचा यथेच्च हविर्भाग दिला, पण मनात प्रामाणिक भक्तिभाव न ठेवता फक्त त्याचं नाटक केलं तर या कर्मकांडाला काय अर्थ राहिला?
महान चित्रकार राजा रविवर्मा यांच्यावर रणजित देसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकात एके ठिकाणी रविवर्मा म्हणतात, ‘‘आपलं माणूस हयात असेपर्यंत त्याच्यासाठी आपल्याला जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करावं. ते न करता तो या जगातून गेल्यावर श्राद्धविधी वगैरे करण्यात काय अर्थ आहे?’’
मला सांगा, आपल्या संतांनी तरी वेगळं काय सांगितलं? त्यांची सेवाभावी उद्दिष्टे व्यापक होती एवढाच फरक. आपल्या अभंगातून व भारुडातून त्यांनी माणुसकी, गरीबांविषयी कळवळा, संयम, सचोटीची वागणूक मनात ठेवून कर्मकांडाच्या आहारी न जाता भगवंताविषयी भक्तिभाव बाळगण्यासाठी दोन हस्त आणि एक मस्तक एकत्र येणं पुरेसं आहे याच विचाराचा प्रसार केला.
अगदी पुढच्या काळात म्हणजे 1876-1956 मधील काळातल्या गाडगेबाबांचं उदाहरणं पाहिलं तर त्यांनी या जाचक कर्म, रूढी, प्रथांवर जोरदार हल्ला चढवला. तुमच्या दोन पायांच्या लेकराला बरं वाटण्यासाठी चार पायांचं मुकं जनावर बळी देता, हे कोणत्या देवाने तुम्हाला सांगितलं? हा प्रश्न त्यांनी निर्भीडपणे समाजधुरीणांना विचारला. एका अशिक्षित माणसाने समाजाला कर्मयोगाचं आचरण करण्याचा आयुष्यभर आपल्या कीर्तनातून धडा दिला.
माणूस जन्म घेतो, जगतो आणि एक दिवस देह त्यागून मृत्यू पावतो. मरत नाही तो अविनाशी आत्मा. मग त्या विनाशी शरीराविषयी आपण एवढी ओढ का बाळगतो? आज कित्येक प्रशस्त घरात मोठमोठय़ा इंपोर्टेड वस्तूंना, महागडय़ा फर्निचरला जागा असते, परंतु स्वतःच्या जन्मदात्यांना त्याच घराच्या एखाद्या कोपऱयातही जागा मिळू शकत नाही. त्यांच्या गरजांना, त्यांच्या झालेल्या वयाला समजूनच घेतलं जात नाही. त्यांची रवानगी स्वतंत्र खोली, टीव्ही, एसी अशा सुखसुविधा असलेल्या वृद्धाश्रमात केली जाते. कुणी विचारलं तर सांगता येतं, आपण किती चांगल्या ठिकाणी आणि समवयस्क लोकांसोबत आई-वडिलांची सोय केली आहे. त्यांच्या पंचाहत्तरीपूर्ती समारंभाचं निमित्त करून आपल्या हाय सोसायटीतल्या मित्र-मैत्रिणींना, आपल्या ऑफिसमधील अधिकाऱ्यांना, सहकाऱयांना आमंत्रित करून जन्मदात्यांवरील खोट्या प्रेमाची जाहिरात केली जाते तीही आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठीच. आई-वडिलांचं तो एक दिवस फारच कौतुक केलं जातं. त्यांच्यासाठी पूजा, हवन याचा घाट घातला जातो. म्हणजेच मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मनात भक्तिभाव न बाळगता हे सगळं केलं जातं. काय उपयोग त्याचा? हे सगळं आटोपल्यावर पुन्हा त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते. तिथेच त्यांचा मृत्यू होतो तेव्हाही त्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या त्यांच्या मुलांना तिकडे फिरकावेसेही वाटत नाही आणि ही जराही अतिशयोक्ती नाही, तर सत्य परिस्थिती आहे. वृद्धाश्रमातच त्यांचा स्वर्गवास झाल्यावर आपल्या प्रेमाचा उमाळा जगाला दाखवण्यासाठी किंवा हे केलं नाही तर कदाचित आपल्याला काही त्रास व्हायचा या भीतीपोटी श्राद्धपक्ष केली जातात, जेवणावळी घातल्या जातात. अस्थी विसर्जनासाठी हरिद्वारला जाण्याचं निमित्त करून छान पर्यटन करून येतात. थोडक्यात एकप्रकारे ही कर्मकांडे करून आपल्याभोवती आणि आपण केलेल्या वाईट कर्मांभोवती सुरक्षा कवच उभारण्याचा प्रयत्न करतात. अर्थात, त्याने होत काहीच नाही म्हणा. हे सगळं करण्यापेक्षा ते हयात असताना त्यांना थोडंसं प्रेम दिलं असतं तर?
जे करतोय, जे करायचंय आणि जे करावंसं वाटतंय ते आपली सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवून तपासून पहा. अखेर आपल्या आयुष्यात घडणारं सत्य अटळ आहे, जे प्रत्यक्ष परमेश्वरालाही चुकलेलं नाही याचे दाखले आहेत. आपणही या दिखाव्याच्या आहारी न जाता श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे आधी आपलं कर्म शुद्ध भावनेने आणि हृदयात माणुसकी जगवून करत राहू या. हा आनंद कितीतरी पटींनी मोठा असेल.
जन्मदात्यांच्या श्राद्धतिथीला पिंडदानाचा सोपस्कार करतानाच एखाद्या गरीब कुटुंबाला पोटभर जेवू घाला, पितृ पंधरवडय़ात यथाशक्ती गरजूंना, वृद्धाश्रमातील वयस्कर व्यक्तींना मदत करा, गोरगरीबांच्या पोटाला अन्न द्या आणि मग बघा हा आनंद किती समाधान देऊन जातो ते. स्वर्गवासी झालेल्या आपल्या पितरांचे ते जिथे असतील तिथून भरभर आशीर्वाद मिळतील.