लेख – वेब न्यूज – फ्रान्स सैन्याच्या मदतीला रोबोट डॉग

>> स्पायडरमॅन

बदलत्या तंत्रज्ञानाने जगभरातील अनेक क्षेत्रांत मानवी कल्याणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिक्षण, आरोग्य, उत्पादन, अर्थबाजार इथपासून ते प्रवास, खरेदी-विक्री अशा अनेक ठिकाणी या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानवी आयुष्यात बऱयाच सोयीसुविधा निर्माण करण्यात यश आले आहे. अशीच एक महत्त्वाची शाखा म्हणजे संरक्षण होय.

जगभरातील सर्वच देश स्वतःच्या संरक्षणाची सर्वात जास्त काळजी घेत असतात आणि त्यासाठी जगातले सर्वोत्तम तंत्रज्ञान आपल्या संरक्षण दलांना मिळत राहील याची काळजीदेखील घेत असतात. मात्र सध्याच्या काळात सैन्यदलांना सीमेवरतीच नाही तर अनेकदा देशाच्या अंतर्गत भागातदेखील नागरी सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. अनेक देशांत चालू असलेली यादवी, बंडाळी, जातीय हिंसा, अतिरेकी अथवा नक्षली कारवाया यामुळे सैन्यदलांना कायमच सज्ज राहावे लागते आहे. सीमेवरील युद्ध असो वा देशांतर्गत असलेली अराजकता, या प्रत्येक ठिकाणी मुकाबला करताना आपल्या सैन्याची कमीत कमी हानी व्हावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी काही वर्षांपासून अनेक पुढारलेले देश हे रोबोट सैनिकांचा अर्थात यंत्रमानवांचा वापर सैनिक म्हणून करत आहेत. मात्र आता फ्रान्स देशाने यापुढे मजल मारत, आपल्या सैन्याच्या मदतीसाठी खास अशा रोबो डॉग्ज अर्थात यांत्रिक कुत्र्यांचे परीक्षण सुरू केले आहे.

पहिल्या काही चाचण्यांमध्ये हे रोबो डॉग्ज अतिशय उपयोगी असल्याचेदेखील समोर आले आहे. गुगलच्या मालकीची अमेरिकन कंपनी ‘बोस्टन डायनामिक्स’ हिने या रोबोट डॉग्जची निर्मिती केली आहे. या रोबो डॉगला ‘स्पॉट’ असे नाव देण्यात आले आहे. यात कॅमेरे लावण्यात आले असून या रोबो डॉगला रिमोटच्या मदतीने सहज नियंत्रित करता येते. या रोबो डॉग्जचे डिझाईन ही याची खरी खासियत आहे. सामान्य कुत्र्याप्रमाणेच या रोबो डॉगलादेखील चार पाय देण्यात आले असून उथळ अथवा खडबडीत रस्त्यावरदेखील सहजपणे धावण्यासाठी ते अत्यंत उपयोगी ठरत आहेत. फ्रान्सच्या सैनिकांनीदेखील या ‘स्पॉट’च्या कार्यक्षमतेचे कौतुक केले आहे. सध्या निगराणी, नेव्हिगेशन, कंस्ट्रक्शन साईट्स, बोगदे येथे शोधकाम करण्यासाठी ‘स्पॉट’च्या चाचण्या घेतल्या जात आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या