लेख – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाची भूमिका

school-teacher

>> डॉ. प्रीतम भी. गेडाम

शिक्षकांना पालकांच्या बरोबरीचे मानले जाते. पालकांनंतर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सर्वात जास्त जबाबदार असतात. असे म्हटले जाते की, देशाच्या भावी पिढ्या प्रगती करतील की विनाश, या दोन्ही गोष्टी शिक्षकाच्या भूमिकेवर अवलंबून असतात. कारण ज्ञानाधारित अध्यापनाद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता ओळखून त्यांना सक्षमपणे सुधारतो. दुसरीकडे जर एखादा शिक्षक त्याच्या भूमिका आणि पदाची प्रतिष्ठा विसरला तर त्याचे परिणाम संपूर्ण समाजाला दीर्घकाळ भोगावे लागतात.

शिक्षक म्हणजे गुणांची खाण असल्याचे म्हटले जाते. विषय ज्ञान, संवाद काwशल्य, अध्यापनाची आवड, सकारात्मक दृष्टिकोन, सर्जनशील विचारसरणी, संशोधक, संयमी, चारित्र्यवान, सत्य, बुद्धिमान, मेहनती, सहनशील, मृदुभाषी, वेळेचे मूल्य जाणणारा, कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व विद्यार्थ्यांकडे समानतेने पाहणारा, त्यांची काwशल्ये समजून घेणारा, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच संघर्ष करणारा हे असे गुण शिक्षकात असतात. हे गुण खऱ्या शिक्षकाची ओळख आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श मार्गदर्शक, प्रेरणेचे स्रोत आणि मित्र असतात, जे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांच्या नैतिक आणि चारित्र्य विकासात शिक्षकांचे मोलाचे योगदान असते. म्हणजेच शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षित करतातच सोबत त्यांना चांगले जीवन जगण्यास सक्षम आणि त्यांना सुजाण नागरिक बनवतात.

एक काळ असा होता जेव्हा शिक्षण हे समाजसेवेचा एक भाग होते, तेव्हा समाजसुधारक शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आणि समाजात एक नवीन क्रांती घडवून आणण्यासाठी संघर्ष करत असत, पण आजच्या व्यापारीकरणाच्या युगात शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाते. देशातील उच्च सरकारी अधिकारी, नेते, कर्मचारी आणि स्वतः सरकारी शिक्षकही त्यांच्या मुलांना महागडय़ा खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण देण्यास प्राधान्य देतात. कारण ते कदाचित सरकारी शिक्षण व्यवस्थेवर समाधानी नसतील आणि श्रीमंत कुटुंबातील मुले थेट परदेशात शिक्षण घेण्यास प्राधान्य देतात. दरमहा एक लाख ते दीड लाख रुपये पगार मिळवणारे सरकारी शिक्षकही त्यांच्या मुलांना खासगी शाळांमध्ये शिकवतात, असे का घडते? सरकारी शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या शिक्षण व्यवस्थेवर विश्वास नाही का? सर्वात पवित्र मानल्या जाणाऱया शिक्षक वर्गातही अनेक घृणास्पद घटना शिक्षण जगताला कलंकित करत आहेत. आजही देशातील ही परिस्थिती फारशी बदललेली नाही.

शिक्षणातही भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे त्याबद्दल सर्वांना माहिती आहे, पण त्याविरुद्ध कोणीही बोलू इच्छित नाही. महाराष्ट्र राज्यातील सरकारी अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक भरतीच्या नावाखाली भ्रष्टाचाराच्या बातम्या आपण अनेकदा पाहतो, ऐकतो आणि वाचतो. ही भरती एका गठीत समितीद्वारे केली जाते. विद्यापीठाच्या कुलगुरू आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांकडे तक्रार करूनही सुधारणेच्या नावाखाली फक्त आश्वासने ऐकू येतात. आतापर्यंत सरकारने या भरतींची पूर्ण जबाबदारी स्वतः कडे घेतलेली नाही. अशा व्यवस्थेत पात्रता असूनही प्राध्यापक होण्याचे गरीब आणि प्रामाणिक लोकांचे स्वप्न संघर्ष आणि भ्रष्टाचारात दबले जाते.

देशातील काही आर्थिकदृष्टय़ा सक्षम खासगी शैक्षणिक संस्थांची स्थिती समाधानकारक आहे, परंतु बहुतेक खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये कदाचित सर्वात शिक्षित शिक्षक सर्वात कमी पगारावर काम करतात. अनेक खासगी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना रोजंदारी कामगारापेक्षा कमी वेतन मिळते. यासोबतच एका पदावर काम करताना त्यांना संस्थेची इतर कामेदेखील करावी लागतात. या क्षेत्रातील बेरोजगारीचा दरही सर्वाधिक आहे. आजच्या महागाईच्या काळात 2500-3000 रुपये दरमहा पगार काहीच महत्त्वाचा नाही. तरीही मोठय़ा संख्येने शिक्षक या पगारावरही काम करत आहेत, ही आपल्यासाठी खूप लाजिरवाणी आणि दुःखाची बाब आहे.

शिक्षणाच्या जगात आता विद्यार्थ्यांचे एक नवीन रूप दिसून येत आहे. लहान मुलेदेखील त्यांच्या शाळेच्या बॅगमध्ये नको असलेल्या वस्तू घेऊन फिरताना आढळतात. ज्यामध्ये अंमली पदार्थ, घातक शस्त्रsदेखील असतात. पूर्वी शिक्षक चुकांसाठी विद्यार्थ्यांना मारहाण करत असले तरी पालक त्याला काही विशेष आक्षेप घेत नव्हते. आता चुकांसाठी विद्यार्थ्यांना मारहाण करणे तर दूरच त्यांना फटकारणेदेखील शिक्षकांना गुन्हा वाटू लागते. काही महिन्यांपूर्वी पंजाब आणि हरयाणामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या मुख्याध्यापकांची चाकूने वार करून हत्या केली. आता शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना धमकावल्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. आपल्या देशात बालगुन्हेगारांचा ग्राफ झपाटय़ाने वाढत आहे. पालक व्यस्तता दाखवत आहेत, शिक्षक व्यावसायिक होत आहेत, मग देशातील पिढी गुन्हेगारीच्या दलदलीत अडकणे अपरिहार्य आहे. महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, 2022 सालच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, अल्पवयीन गुन्हेगारांच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान, तामीळनाडूचा क्रमांक लागतो.

लोक म्हणतात की सरकारी शाळांची अवस्था वाईट आहे. मग तिथल्या शिक्षकांना पगार तर भरपूर मिळतो तरी शैक्षणिक गुणवत्ता का सुधारत नाही? दुसरीकडे देशातील बहुतेक खासगी संस्थांमध्ये शिक्षकांचे पगार खूपच कमी आहेत. मग अशा परिस्थितीत देशाची शिक्षण व्यवस्था कशी मजबूत होईल? शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर कसा वाढेल? खासगी संस्थांमध्ये कमी पगाराचा शिक्षक देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी मनापासून चिकाटीने आणि मेहनतीने कसा काम करू शकतो? जेव्हा की त्या शिक्षकाचा वर्तमान स्वतः अंधारात आहे. देशातील बहुतेक ठिकाणी ही परिस्थिती आहे. हे सर्व पाहता आजचा शिक्षक खरोखरच देशाच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार म्हणण्यास पात्र आणि सक्षम आहे का? पेंद्रीय विद्यालय, आयआयटी, आयआयएम, एम्ससारख्या शैक्षणिक संस्था प्रत्येक गावाची, प्रत्येक शहराची गरज आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला कोणताही आर्थिक भेदभाव न करता समान दर्जाचे शिक्षण मिळालेच पाहिजे.

बिहारमधील खासगी कोचिंग सेंटरचे प्रसिद्ध शिक्षक खान सर यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, देशातील सरकारी शिक्षण व्यवस्था अतिशय वाईट परिस्थितीतून जात आहे, ज्याचा पुरावा म्हणजे खासगी कोचिंग सेंटर विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेले आहेत. शिक्षणासाठी खासगी कोचिंग सेंटर्सवरील विद्यार्थ्यांचे अवलंबित्व प्रचंड वाढत आहे. सर्व विद्यार्थ्यांना नाममात्र पदवी मिळाली तरी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्याच्या उद्दिष्टापासून खूप दूर राहील. आपण आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग शिक्षणात म्हणजे आपले शरीर, मन आणि पैसा खर्च करतो. जर ते शिक्षण आपल्याला चांगले राहणीमान प्रदान करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध झाले तर ते चांगले आहे, अन्यथा जीवन एक संघर्षच बनून राहते, जे आपण बघतच आहोत. जोपर्यंत शिक्षकांना समाजसुधारक म्हणून त्यांची भूमिका समजत नाही, तोपर्यंत देशाच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित होत राहतील.