‘विद्यार्थ्यांचा राजा’ – उतारवयातील पालकांच्या जपणुकीचा संदेश देणारा गणेशोत्सव

>>योगेश घोले

आपली संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचे भान राखून व गणेशोत्सवाची मूळ विचारधारा लक्षात ठेवत रामनारायण रुईया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष दुमदुमला. रुईया नाक्याचा गणपती हा ‘विद्यार्थ्यांचा राजा’ अशा नावाने हा ओळखला जातो. 1978 मध्ये या गणपतीची स्थापना रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केली असून यंदा 46वे वर्ष साजरा करीत आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव विद्यार्थ्यांचा राजा असे नावलौकिकास असलेले व सांस्कृतिक वारसा जोपासला जावा असे वैचारिक दृष्टिकोन असणारे हे मंडळ आहे. माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव रुईयाचे विद्यार्थी सर्व दहा दिवस आनंदाने साजरा करतात.

दरवर्शी गणेशोत्सवात हे मंडळ मूर्तीसमोरील देखाव्यातून वेगवेगळ्या संकल्पना वेगवेगळ्या प्रकारे मांडतात. यावर्षीच्या गणेशोत्सवात त्यांनी ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव’ अशी संकल्पना घेतली आहे. यंदाच्या श्रींचा मंडपातील देखाव्यातून आई-वडील आणि मुलं यांच्यातील नाते व सद्यपरिस्थितीला समाजामध्ये आपल्या निदर्शनास येणाऱ्या पाल्य आणि पालकांमधील नात्याचे भावनिक, मानसिक कंगोरे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

देखाव्यामध्ये श्रींचा गाभारा उभारला असून त्यांचा बाजूला माता व पित्याला स्थान दिले आहे. आपल्या आयुष्यात अंधारातून तेजाकडे घेऊन जाण्यासाठी आपले आई वडील नकळत तेजस्वी दिव्यांची भूमिका बजावत असल्याने त्याचं रुपक म्हणून समई, लामण दिवे व पणत्यांची आरास करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना उच्च स्थान दिले आहे.  मातृ-पितृ भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे, हा धडा साक्षात गणरायाने त्याच्या माता-पित्याला प्रदक्षिणा करून भक्तांना घालून दिला आहे. आयुष्यभर आपल्या मुलाचं संगोपन करणारे, त्याला निस्वार्थ मनाने मार्गदर्शन करणारे आई-वडील हे मुलाच्या आयुष्यातले सगळ्यात मोठे गुरू आहेत. त्यांची सेवा, आराधना केल्यानेच आपल्याला यशप्राप्ती होते. पण, सध्याच्या जगात आई-वडिलांचं त्यांच्या उतारवयातील संगोपन हा कळीचा मुद्दा झाला आहे. यंत्रांच्या युगात यंत्रवत होत चाललेल्या तरुणांनी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करण्याची संवेदनशीलता दाखवणं गरजेचं आहे. संवेदनशील मनाचा तरुण आपल्या धडाडीने एक चांगला देश निर्माण करू शकतो, याची शिकवण देण्याचा प्रयत्न यंदा रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केला आहे.