
>> प्रांजल वाघ ([email protected])
साधारण 8-10 कोटी वर्षांपूर्वी दख्खनेत ज्वालामुखीच्या उद्रेकातून सह्याद्रीची पर्वतरांग जन्मास आली. हिमालयापेक्षा कैक शतकं जुनी अशी ही जैववैविध्याने, ऐतिहासिक गडकोट आणि मंदिरांनी नटलेली पर्वतरांग! इथे अनेक निसर्गाचे आविष्कार पाहायला मिळतात. गेल्या 8-10 कोटी वर्षांत ऊन, पाऊस, वारा यांच्यामुळे प्रामुख्याने बेसाल्टने बनलेल्या या सह्याद्रीची बरीच झीज झाली. या झिजेतून निर्माण झाले काही नैसर्गिक आविष्कार! त्याच आविष्कारातील एक म्हणजे – नेढं!
शिवरायांनी बांधलेल्या आणि स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावरील सुवेळा माचीवर आपण जातो तेव्हा चिलखती बुरुजाखाली कडय़ात आरपार गेलेलं एक भोक दिसतं. तिथे सहज चढूनही जाता येतं. हेच ते नेढं! वारा आणि पावसाच्या सततच्या माऱयाने दख्खनी बेसाल्टची झीज होते आणि एक दिवस हे भोक डोंगराच्या आरपार जातं.
नाशिक परिसरात असलेल्या पिंपळा, कण्हेरगड या किल्ल्यांवरील नेढी प्रचंड मोठी आहेत. त्या नेढ्यात 20-30 माणसं सहज राहू शकतील, तर जवळच असलेल्या मोहनदारी किल्ल्याच्या नेढय़ात एकटय़ाला उभं राहणंदेखील कठीण – इतकं ते अरुंद आहे! मोहनदारीच्या नेढ्याबद्दल तर एक दंतकथा प्रसिद्ध आहे. समोरच असलेल्या सप्तशृंगी पर्वतावरील सप्तशृंगीमाता आणि महिषासुर यांचं युद्ध सुरू होतं तेव्हा देवीने अस्त्र दानवावर फेकले. नेम चुकला आणि ते अस्त्र मोहनदारीच्या कडय़ावर आदळले आणि नेढं निर्माण झालं!
नेढी आपल्याला सह्याद्रीतील किल्ल्यांवर जास्त प्रमाणात पाहायला मिळतात तरी इतर अनेक ठिकाणी ती दिसून येतात. हटकेश्वरचा नैसर्गिक दगडी पूल आणि महाबळेश्वरजवळील एलिफंट पाइंट ही दोन उदाहरणे!
महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध नेढय़ांची यादी खाली देत आहे
राजगड : पुणे जिल्हा ह लोहगड : पुणे जिल्हा ह हटकेश्वर नैसर्गिक पूल : पुणे जिल्हा
महाबळेश्वर एलिफंट पाइंट : सातारा जिल्हा ह इरशाळगड : रायगड जिल्हा
(इथले नेढे 2025 मध्ये कोसळून नामशेष झाले आहे.) ह रतनगड : अहिल्यानगर जिल्हा ह मदनगड : नाशिक जिल्हा ह पिंपळा किल्ला : नाशिक जिल्हा
मोहनदारी : नाशिक जिल्हा ह कण्हेरगड : नाशिक जिल्हा



























































