ठसा – हरेश आमडेकर

जेथे मराठी भाषेच्या भवितव्याविषयीचीच चिंता व्यक्त केली जाते तेथे संस्कृत भाषेविषयी काय बोलणार? परंतु संस्कृत भाषेविषयी आस्था असणारे तिच्या प्रचार आणि प्रसाराचा प्रामाणिक वसा घेतलेलेही काही जण आहेत. हरेशानंद सुधाकर आमडेकर हे त्यापैकीच एक. मुंबईतील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर.एम. भट्ट विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतलेल्या हरेशानंद आमडेकर यांनी नंतर माटुंग्याच्या खालसा महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण केल्यावर पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातून सिव्हील इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पुढे पर्यावरण विज्ञानासारख्या विषयात एमएससी पदवी मिळवली. नंतर नोकरी-व्यवसायाचे रुटीन सुरू झाले. परंतु तरीही संस्कृत भाषेची मनात दडलेली ओढ हरेश यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

बालपणी रा.स्व. संघाशी संबंध आला होता. संघाच्या शाखेत नियमित जाणे नव्हते, परंतु ते खूप उशिरा म्हणजे 2013मध्ये ठाण्यात सुरू झाले. तेथील कावेसर येथील शाखेत हरेशानंद उपस्थित राहू लागले. त्याचदरम्यान ‘संस्कृत भारती’ या संस्थेचे राज्यव्यापी ‘पत्राद्वारा संस्कृत अभियान’ राबविले गेले आणि हरेशानंद आमडेकर यांना त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात दडून बदलेल्या संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसाराच्या उर्मीला मोकळी वाट मिळाली. शालेय जीवनात हुकलेली ही संधी हरेशानंद यांनी साधली. स्वतःचे नाव नोंदवून या अभियानाची त्यांनी सुरुवात केली आणि हे कार्य मग सुरूच राहिले. संस्कृत भारतीच्या माजी विस्तारिक आणि शिक्षिका स्मृती भाटे यांच्या मदतीमुळे त्यांचे हे कार्य आणखी पुढे गेले. सुरुवातीला या कार्याचे ठाणे प्रशासकीय जिल्हा संयोजक म्हणून काम गेले. गेली पाच वर्षे कोकण प्रांताचे संपर्कप्रमुख ही जबाबदारी आमडेकर सांभाळत आहेत.

समाजातील विविध स्तरातील लोकांना भेटायचे, संस्कृतचे महत्त्व, इतिहास समजावून सांगायचा आणि त्यांनाही संस्कृत प्रसाराच्या कार्यात सहभागी करून घ्यायचे. मागील दोन वर्षांत हरेश आमडेकर यांच्या या कार्यास बऱ्यापैकी गती मिळाली आहे. संस्कृत प्रसाराच्या विविध उपक्रमांचे आयोजन ते करीत आहेत. हे काम करीत असताना लोकांशी संवाद साधत असताना त्यांना वेगवेगळे अनुभव आले.

संस्कृतविषयी अनेकांना आस्था, अनुकूलता असते. परंतु कोणी त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही, असे सकारात्मक लोक आमडेकर यांना खूप भेटले. संस्कृत भारतीच्या या उपक्रमाला आता अत्याधुनिक तंत्रज्ञान माहिती-तंत्रज्ञानाची जोड देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे संस्कृतचा प्रचार आणि प्रसार आणखी वेगात तसेच दमदारपणे होईल असा आमडेकर यांना विश्वास आहे. संस्कृतसारख्या वैज्ञानिक भाषा, त्यामधील ज्ञानकोष हे आजही उपयुक्त आहेत. या भारतीय ज्ञानपरंपरेची सांगड घालत ज्ञानकथा वाढविण्याचा संस्कृत भारतीचा प्रयत्न निश्चितपणे यशस्वी होईल असेही ते सांगतात.

प्रतिनिधी