आभाळमाया – शनीची ‘अदृश्य’ कडी!

>> वैश्विक, [email protected]

सध्या मीन राशी समूहाच्या पार्श्वभूमीवर दिसणारा एरवीचा विलोभनीय शनी ग्रह पहाटेच्या आकाशात दिसतोय. पावसाळ्यानंतर तो पुन्हा पश्चिमेला दिसू लागेल. शनी ग्रह प्रसिद्ध आहे तो त्याच्याभोवती दिसणाऱ्या कड्यांसाठी. नुसत्या डोळ्यांनी ती दिसत नाहीत. कारण त्यावरून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश क्षीण असतो. दुर्बिणीतून मात्र ती स्पष्टपणे दिसतात. एवढंच नव्हे तर त्यातील काही कड्यांमधील अंतरसुद्धा जाणवते. इंग्लिश आद्याक्षरांची ‘ए’पासून ‘जी’पर्यंत नावं या सात कड्यांना दिली असली तरी ती मूळाक्षरांच्या क्रमाने नाहीत.

यापैकी ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ ही कडी अधिक चमकदार असून सर्वाधिक रुंदीचं कडं ‘बी’ आहे. त्याच्या तुळनेत ‘डी’ ते ‘जी’ ही कडी थोडी-थोडी अस्पष्ट दिसून येतात. ‘एफ’ कडं खूप अरुंद असून त्यात शनीचे ‘पॅन्डोरा’ आणि ‘प्रॉमिथस’ हे नैसर्गिक उपग्रह (चंद्र) सामावलेले आहेत. ‘इ’ हे कडं म्हणजे ‘एन्केलेडस’ उपग्रहातील ‘गीझर’ किंवा उसळत्या द्रव्यातील हिमकणांचं बनल्याचं मानलं जातं. तसा शनीही सूर्यापासून सुमारे 1 अब्ज 20 कोटी किलोमीटर अंतरावर असलेला थंड ग्रहच आहे.

गेल्या महिन्यात म्हणजे साधारण मार्चच्या मध्यापासून या ‘कड्यांचा’ ‘अस्त’ झाला होता. याचा अर्थ इतकाच की, ती आपल्याला दुर्बिणीतूनही दिसत नव्हती. शनीची कडी अशी अचानक गायब कशी झाली असा प्रश्न एखाद्या सामान्य निरीक्षकाला पडणे स्वाभाविक आहे, परंतु त्याचे वैज्ञानिक कारण असे की, पृथ्वी या कड्यांच्या समपातळीच्या कक्षेत फिरू लागली. शनी ग्रह स्वतःच्या अक्षाशी 26 अंशांनी कललेला आहे. (पृथ्वीचा कल साडेतेवीस अंश.) हा ग्रह सूर्याभोवती सर्वाधिक काळात म्हणजे पृथ्वीच्या तुलनेत 30 वर्षांनी परिक्रमा पूर्ण करतो. म्हणूनच तो एका राशीच्या पार्श्वभूमीवर अडीच वर्षे दिसतो.

पृथ्वीप्रमाणेच सर्व ग्रह त्यांच्या कक्षेतून सूर्याभोवती फिरताना त्यांचे परस्परांच्या भ्रमणाशीही ‘नाते’ तयार होते. 30 वर्षांच्या शनीच्या सूर्याभोवती भ्रमणाच्या काळात 15 वर्षांनी म्हणजे दोनदा अशी वेळ येते की, पृथ्वीसाठी शनीची कडी ‘एज ऑन’ म्हणजे बरोबर समप्रतलात येतात. अर्थातच, त्यांचा जनक असा तेजस्वी ग्रह मागे (मधोमध) असल्याने या क्षीण प्रकाश परिवर्तन करणाऱ्या कड्यांवरचा प्रकाश वेगळा दिसून येत नाही आणि ती ‘अदृश्य’ झाल्यासारखी भासतात.

ही सर्व कडी 19 जुलै 2023 रोजी मात्र अतिशय तेजस्वी दिसली होती. याचं कारण म्हणजे त्या दिवशी शनी ग्रहाच्या चमकदार कड्यांचे जवळून फोटो घेतले. एकूण 2 लाख 82 हजार किलोमीटरपर्यंत पसरलेली कडी तेव्हा स्पष्ट चमकदार दिसत होती. शनी ग्रहाच्या पृष्ठभागावरून ‘खग्रास’ सूर्यग्रहणं अनेकदा दिसू शकतात. कारण त्याला टायटन, मायमस, एन्केलेडस, जेनस असे अनेक मोठे ‘चंद्र’ (उपग्रह) आहेत.

याच वेळी ‘पॅसिनी’ यानाने ‘निळ्या’ पृथ्वीचे व ‘लाल’ मंगळाचेही पह्टो घेतले होते. पॅसिनी-ह्युजेन्स हे यान 15 ऑक्टोबर 1997 रोजी शनीच्या कड्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात पाठविले गेले. त्याने 19 वर्षे 335 दिवस काम करून शनी कडय़ांचा तसेच ‘टायटन’सारख्या शनी-चंद्राचा अभ्यास केला. त्यापैकी 13 वर्षे ते शनी सान्निध्यात होते. शनीची कडी शोधणाऱ्या जिओवॅनी पॅसिनी यांचे नाव या यानाला दिले होते.

मानवनिर्मित यानांपैकी शनीचे जवळून ‘दर्शन’ घेणारे यान म्हणजे पायोनिअर-11 त्याने शनीचे सुमारे 20 हजार 700 किलोमीटरवरून निरीक्षण केले. 1979 मध्ये त्याने शनीचे ‘एफ’कडे पाहिले. त्यानंतर व्हॉएजर-2 यान आणि नंतर ‘पॅसिनी’ यानांनी शनी त्याच्या कड्यांसह आपल्याला (फोटोद्वारे) स्पष्टपणे दाखविला. 2004 मध्ये ‘पॅसिनी’ यान शनीच्या कड्यांमधून पसार झाले. या मधल्या अंतराला (गॅप) पॅसिनी-गॅप असेच म्हणतात. शनीची कडी म्हणजे धातूच्या कड्यांसारखी सलग गोलाकार नसून असंख्य लहान-मोठ्या दगड-पाषाणांची ती वलयं आहेत.

आता या वर्षीच्या नोव्हेंबरात पुन्हा काही काळ शनीची कडी अल्पकाळासाठी ‘अदृश्य’ होतील. दुर्बिणीतून ते दृश्य जरूर पहा. या सर्व कड्यांमध्ये 99 टक्के बर्फ आणि 1 टक्का सिलिकेट वगैरे आहे. यापूर्वीही 1995 आणि 2009 मध्ये शनीची वलयं तात्पुरती दिसेनाशी झाली होती. गॅलिलिओ गॅलिली यांनी 1610 मध्ये दुर्बिणीतून अवकाशातील ग्रहांचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना गुरूचे चंद्र आणि शनीची कडी दिसली, पण त्याचे नेमके स्वरूप न कळल्याने त्यांनी ही दोन छोट्या व एका मोठ्या ग्रहाचे ‘तिळे’ असावे किंवा शनीला ‘कान’ असावेत अशी सचित्र नोंद केली! ह्युजिन्स यांनी ती वेगवेगळी वलयं असून एकसंध नाहीत हे स्पष्ट केलं. त्यांनी 1612 मध्ये मोठ्या दुर्बिणीने शनीचा अभ्यासपूर्ण वेध घेऊन नोंदी केल्या आणि शनीची ‘कडी’ त्याला ‘चिकटलेली’ नाहीत हे सिद्ध झालं. शनीच्या सर्वात जवळचं कडं त्यापासून सुमारे सात हजार, तर शेवटचं 82 हजार किलोमीटर दूर आहे. अवकाशातील हे ग्रहांचे आणि त्यांच्या परिभ्रमणातून निर्माण होणारे विभ्रम, निरीक्षकाला निःसंशय आनंद आणि अभ्यासकांना संशोधनाची संधी देतात एवढं नक्की!