जगण्याचा ‘कैफ’ असणारा शायर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> समीर गायकवाड

चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध शायर ही कैफी आझमी यांची ओळख. उर्दू भाषेतून आपल्या कविता आणि शायरींना त्यांनी नवा चेहरा दिला. उर्दू साहित्याला वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. आपल्या शायरीचा बुलंद आवाज हिंदुस्थानी साहित्य आणि कलाप्रांतात अजरामर करणारे कवी कैफी आझमी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची 14 जानेवारी 2020 रोजी सांगता झाली. अशा या सर्जनशील कलावंताला आदरांजली वाहणारा हा लेख.

14 जानेवारी 1919 रोजी आझमगड जिह्यातील मिजवां येथे जन्मलेले अतहर हुसेन रिझवी हेच नंतर ‘कैफी आझमी’ बनले. ते अत्यंत संवेदनशील होते. लहानपणापासूनच ते जगातली दुःखे संपवणाऱयांच्या गटात सामील झाले. सर्वांच्या दुःखाला आपल्या गीतांमधून त्यांनी शक्ती दिली. न्यायाच्या लढाईत त्यांची गाणी अग्रेसर असत. ते स्वतःचे दुःख कधीही व्यक्त करीत नसत. युवावस्थेत असताना कम्युनिस्ट पार्टीच्या ‘कौमी जंग’ला ते निनावी कविता पाठवीत असत. सारे कम्युनिस्ट हैराण होते की, या कविता सुंदर आहेत, पण कवी कोण? एका मुशायऱयात अली सरदार जफरींना त्या ‘निनावी’ कवितांचा धनी अतहरच असल्याचा शोध लागला. त्यांनी अतहर यांना मुंबईचे निमंत्रण दिले. ‘ये दुनिया, ये मेहफिल मेरे काम की नही’ म्हणत त्यांनी गाव सोडले आणि अनेक कविसंमेलनांत त्यांना बोलावणे येऊ लागले.

शायरीनिमित्ताने हैदराबादला गेलेले असताना ‘यूँही कोई मिल गया था चलते चलते’ असंच काहीसं झालं. ते जिच्या प्रेमात पडले ती मुलगी उदारमतवादी याह्या खान यांची कन्या शौकत होय. क्रांतिकारी विचारसरणीच्या शौकत यांनी आईच्या मर्जीविरुद्ध आपल्या पुरोगामी वडिलांसोबत संभाजीनगरहून मुंबईत येऊन प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचे संस्थापक सज्जाद जहीर यांच्या ड्रॉइंग रूममध्ये त्यांचे लग्न केले होते. त्यांच्या निकाहच्या वेळी काझीनी शौकतजींना विचारले, “तुला हा विवाह कबूल आहे?’’ तिने ‘हो’ म्हटले. पण पंचाईत पुढे आली. मुलगा शिया अन् मुलगी सुन्नी पंथाचा. असे लग्न असेल, तर तिथे दोन्ही काझी आवश्यक असतात. त्याकाळी ते परिस्थितीने गरीब होते. त्यांनी कसाबसा एक काझी आणला होता. दुसऱया काझीला द्यायला पैसे नव्हते. तेव्हा काझीने मुलाचा धर्म विचारताच मित्राने सांगितले, “मुलगा हनफियुल (म्हणजे इमाम अबू हनाफी यांचे जे अनुयायी आहेत, त्यांच्या पंथाचा) आहे.’’ लग्न पार पडले. लग्नानंतर कैफींनी बऱयाच खस्ता खाल्ल्या. गावी गेले. तेथे त्यांच्या मुलाचा जन्म झाला. त्यांचा पहिला मुलगा ‘खय्याम’ एक वर्षाचा होऊन वारला.

शौकत यांनी ‘इप्टा’त कामे करून कैफींना मजबूत साथ दिली. कैफी आझमींचे नशीब म्हणजे त्यांना मित्र फारच चांगले मिळाले. मुंबईत इप्टाच्या दिवसांतील त्यांचे मित्र नंतर नावाजलेले कलावंत म्हणून ओळखले जाऊ लागले. इप्टामध्येच होमी भाभा, किशन चंदर, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, बलराज साहनी, मोहन सहगल, मुल्कराज आनंद, रोमेश थापर, शैलेंद्र, प्रेम धवन, इस्मत चुगताई, ए. के. हंगल, हेमंतकुमार, अदी मर्झबान, सलिल चौधरींसारख्या दिग्गजासोबत त्यांनी काम केले. शौकत यांचे अभिनयगुण शबाना व बाबात उतरले. कैफींची गरीबांसाठीची धडपड शबानात उतरली. एकदा शबाना आझमी यांना त्यांच्या एका चित्रपटाच्या शोसाठी कान चित्रपट महोत्सवात जायचे होते. जाण्यापूर्वी त्यांना कळले की, मुंबईत कुठेतरी झोपडय़ा पाडल्या जात आहेत. तेव्हा शबाना यांनी कान महोत्सवाला जाणे रद्द करून झोपडय़ा वाचवण्यासाठी उपोषण सुरू केले. रणरणत्या उन्हात जमिनीवर बसून उपोषण करणाऱया शबानांचा रक्तदाब वाढला. सर्व नातेवाईक चिंतेत पडले. कैफी आझमी बाहेरगावी गेलेले होते. लोकांना वाटले की, त्यांना सांगितले तर कदाचित या जिद्दी मुलीला ते समजावून सांगू शकतील. कैफी आझमी एक मोठे कवी होते, आपल्या मुलीवर त्यांचे आत्यंतिक प्रेम होते आणि शबानाचे सर्वात चांगले मित्र होते; पण कैफी आझमी एक कम्युनिस्टही होते. त्यांची तार आली. त्यात लिहिले होते- ‘बेस्ट ऑफ लक कॉम्रेड’.
कैफींना मिळालेले चित्रपट पडत होते. त्या दरम्यान चेतन आनंद त्यांच्याकडे ‘हकीकत’ची कथा घेऊन गेले, तेव्हा कैफींनी साफ नकार दिला. पण आनंद म्हणाले, ‘तुम्ही चित्रपटाला ‘अनलकी’ आहात असे सारे म्हणतात आणि मलाही यश नाही. तेव्हा असे करूया दोघे ‘अनलकी’एकत्र येऊया.’ ‘हकीकत’ने इतिहास घडविला. तो पहिला युद्धपट होता. मग आलेल्या ‘हिर रांझा’सारख्या चित्रपटात कैफींनी सगळे संवाद पद्यात लिहिले. तो विक्रम झाला. ‘कागज के फूल’पासून बरेच चित्रपट मिळू लागले. ‘गर्म हवा’ चित्रपटाबद्दल उत्कृष्ट संवाद, कथा, पटकथा असे तिन्ही राष्ट्रीय पुरस्कार कैफींना मिळाले. तोपर्यंत झंकार, आखिरे-शब, आवारा सज्दे हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाले होतेच. नंतर चित्रपटगीतांचा ‘मेरी आवाज सुनो’ हा संग्रहही आला.

शबानांच्या जन्मानंतर शौकत यांनी पृथ्वी थिएटरमध्ये अभिनयाची नोकरी केली. पृथ्वीराज यांनी रिहर्सलच्या वेळी शबानाच्या देखरेखीसाठी एका आयाची व्यवस्था केली. शबानांचे बालपण थिएटरच्या परिवारात गेल्याने त्या निष्णात अभिनेत्री होणे निश्चित होते. एकदा शौकत पृथ्वी थिएटरसोबत टूरवर जात होत्या आणि त्यांनी कैफी साहेबांना काही पैशांच्या बंदोबस्ताची विनंती केली. रेल्वे चालू झाल्यावर कैफी साहेबांनी त्यांच्या हातावर तीस रुपये ठेवले. ही त्या काळात मोठी रक्कम होती. शौकत आश्चर्यचकित होत्या की, एवढे पैसे त्यांनी कुठून आणले. टूरवरून परतल्यानंतर त्यांना कळाले की, कैफींनी पृथ्वीराज कपूर यांच्याकडून शौकतच्या पगाराची आधीच उचल केली होती. त्या दोघांनी आर्थिक अडचणी हसत खेळत झेलल्या. शबाना अभिनित महेश भट्ट यांच्या ‘अर्थ’साठी त्यांनी गीत लिहिले होते, ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो…’

आझमी कुटुंबाला जरा बरे दिवस आले असे वाटावे, असे वाटत असताना त्यांना पक्षाघाताने गाठले. सर्वोत्कृष्ट युद्धपट ‘हकीकत’ हा कैफींचा चित्रपट म्हणूनही ओळखला जातो . ‘गर्म हवा’, ‘कागज के फूल’, ‘मंथन’, ‘कोहरा’, ‘सात हिंदुस्तानी’, ‘बावर्ची’, ‘पाकीजा’, ‘हंसते जख्म’, ‘अर्थ’, ‘रजिया सुलतान’ इत्यादी चित्रपट कैफींमुळे अजरामर झाले.

दोनेक दिवसांपूर्वी कैफींचा जन्मदिवस येऊन गेला तेव्हा कैफींनी लिहिलेली गाणी पुन्हा फेर धरून समोर उभी राहिली. आता डोक्यातून ती लवकर जाणार नाहीत आणि समजा गेलीच तर काही सुप्त इच्छा जागृत करून जातील…आपल्याही इच्छा काही कमी नाहीत. चांगली माणसं कितीही जगली तरी वाटतं, अजून काही दिवस ते हवे होते…

– [email protected]