लेख – शिवसेना विजयाचा अट्टहास बाळगलाच पाहिजे!

1131

>> अजित कवटकर ([email protected])

आजच्या कृतघ्न अर्थकारण आणि राजकारणात मराठी माणसाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी म्हणून म्हणा किंवा एक मराठी मतदार या नात्याने या मातीच्या संस्कारसंस्कृतीची अभिमानास्पद अस्मिता टिकवून ठेवण्याचा स्वाभिमान बाळगणारा एक नागरिक म्हणून म्हणा, पण आपण सर्वांनी शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवण्याचा अट्टहास हा बाळगलाच पाहिजे. देशाच्या उन्नतीसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी इथल्या भूमिपुत्रांना सर्वप्रथम समर्थ करण्याची प्राथमिकता ठेवणारी शिवसेना तिच्या नेतृत्वाला साथ देणे, विजयी करणे यावर आपणा सर्वांचे एकमतअसणे नितांत गरजेचे आहे.

कुणाच्या किती जागा येणार? बहुमत कुणाला मिळणार? सत्ता कुणाची येणार? मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नांच्या या वावटळीतून बाहेर पडणारे विधानसभा निवडणुकांचे जनमत मराठी-महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार आहे. महाराष्ट्रातही युतीने सुराज्य करावे या व अशा सर्व भावना बहुतांश मराठी जनांच्या आहेत. तसे असणे हे हिंदू राष्ट्राच्या अपेक्षा पाहता नैसर्गिक व स्वाभाविकच होय. महाराष्ट्राच्या राष्ट्रवादाला हिंदुत्ववादी विचारधारेची व्यापकता व सर्वसमावेशकता मिळवून देण्याचे सर्वाधिक श्रेय निर्विवादपणे शिवसेनेला जाते.

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीनिमित्त इथल्या जनतेला त्यांच्या कल्याणकारी अस्तित्वासाठी काही गोष्टींची आठवण करून देणे अत्यावश्यक आहे. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेच्या भगव्याखाली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य मराठी माणसाला संघटित केले. शिवसेनेचा प्रसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत केला. विविध संघटनांच्या माध्यमातून मराठी माणसासाठी नोकरी/व्यवसायाची बंद ठेवलेली दारं खुली केली, अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाच्या वाटय़ात भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काचे मिळवून दिले. गावाकडील चाकरमानी शिवसेनेच्याच भरवशावर शहरांत येऊन आपले नशीब आजमविण्याचे धाडस करू लागला. सर्वत्र मराठी माणूस म्हणजे शिवसेना हे समीकरण रूढ झाले ते शिवसेनेने त्यांना मिळवून दिलेल्या त्यांच्या अधिकारांमुळे. शिवसेना नसती तर मराठी माणसाच्या उरावर बसून मिजास करण्याची रीतच जणू रुजली असती. कोणीही यावं आणि टपली मारून जावं असे झालं नाही ते शिवसेनेचा वचक व दक्षतेमुळे. धर्मसंस्कार, संस्कृती, मराठी अस्मिता, हिंदुत्वाचा अभिमान जपण्याचे, बाणवण्याचे कार्य शिवसेनेने केले. आज मराठीसंबंधित प्रत्येक विषयात होणाऱ्या अतिरेकी अतिक्रमणावर एक प्रकारे शिवसेनेमुळेच जरब बसली.

अर्थात यावरून कोणी असा अर्थ काढू नये की, या सगळ्यात अमराठी जनांवर अन्याय, अत्याचार होत होता. बिलकूल नाही! कारण असे असते तर शिवसेनेचं वर्चस्व असलेली शहरं देशातील सर्वात कॉस्मोपॉलिटन शहरं म्हणून कौतुकास पात्र ठरली नसती आणि येथील जनतेनेही शिवसेनेला सातत्याने अनेक दशकं निवडून शासन करण्याचे अधिकार दिले नसते. भूमिपुत्रांचे हक्क डावलले जाता कामा नयेत, त्यांना त्यांचा सन्मान मिळावा, त्यांच्या उदारतेवर व कष्टावर मोठे होऊ पाहणाऱ्यांनी त्यांचा अपमान व शोषण करू नये या सगळ्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून जशास तशी समज देण्यासाठी लढत असते. नैसर्गिक आपत्तीत स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी झटताना दिसतो तो शिवसैनिक. धर्मवादातून उद्भवणाऱ्या संघर्षात धर्म म्हणून उडी घेत स्वतःच्या छातीची ढाल करून रक्षण करण्यास पुढे सरसावतो तो केवळ शिवसैनिक. राजकारणाच्या पलीकडील ही शिवसेनेची ‘निरपेक्ष कर्तव्यदक्षता’ सर्वांनीच प्रत्यक्ष अनुभवली आणि याचेच फलित म्हणजे आज केवळ मराठी माणूसच नव्हे, तर इतर भाषिक समाजदेखील शिवसेनेच्या सेवाकार्याची ग्वाही देताना दिसतो.

हिंदुत्व, राष्ट्रवाद या समान विचारधारेच्या मुद्दय़ांवर शिवसेना व भाजप यांची युती झाली, आज आहे आणि पुढेही राहील. आज केंद्र व राज्य असे दोन्हीकडे भाजपचे सरकार आपल्या मित्रपक्षांसोबत शासन करत आहे. केंद्राने राष्ट्रीय दृष्टिकोनातून आखलेली धोरणं कधी कधी राज्यातील स्थानिक प्राथमिकतांच्या दृष्टीने आक्षेपार्ह असू शकतात. महाराष्ट्रातील अन्य पक्षांचे पुढारीही जरी मराठी असले तरी, केंद्रातील अमराठी नेतृत्व इथल्या स्थानिक प्रश्नांबाबत किती संवेदनशील व सहिष्णू असणार? हा प्रश्नच आहे. इथल्या भूमिपुत्रांवर इतरांची मुजोरी व मक्तेदारी लादणाऱ्या केंद्रीय अध्यादेशांना मग त्याच पक्षाच्या राज्यसत्तेतील प्रतिनिधींना सदर कार्यक्रमातील त्रुटी व तोटे वरिष्ठांना दाखवून देणे मुश्कील होते. मग अशा वेळेस प्रादेशिक मित्रपक्ष त्याच तोडीचा व ताकदीचा असल्यास तो त्याच्या संख्याबळाच्या जोरावर सदर प्रतिकूलता रोखू शकतो आणि अनवधानाने किंवा नाइलाजाने भूमिपुत्रांची अशा चुकीच्या निर्णयातून होणारी गळचेपी रोखता येते. त्याचसाठी शिवसेनेचे सत्तेतील स्थान अधिक शक्तिशाली व बळकट होणे अत्यावश्यक आहे.

शिवसेनेने मतांच्या स्वार्थासाठी कधीही मराठीच्या मुद्दय़ापासून फारकत घेतली नाही, तडजोड केली नाही. म्हणूनच इतर राजकीय दुकानं असतानादेखील मराठी माणसाला शिवसेनेच्याच भगव्याखाली स्वतःला अधिक सुरक्षित जाणवत असते. प्रत्येक विषय हा निवडणूक व मतांच्या चष्म्यातून बघण्याचे सर्वत्र रूढावलेलं राजकारणही शिवसेनेने अनेकदा आपल्या कार्यपद्धतीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले. ही तत्त्वनिष्ठा आजच्या सत्तास्पर्धेत नुकसानकारक ठरत असतानादेखील मराठी माणसाप्रतिचा प्रामाणिकपणा कायम ठेवण्याचे धाडस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना दाखवत आहे, जे खरोखर स्तुत्य आहे. तत्त्वहीन राजकारणातील मतध्रुवीकरणाच्या लबाडीने मराठी जनांची ही ताकद कमजोर करू नये यासाठी मराठी माणसाने शिवसेनेचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्याचा अट्टहास ठेवला पाहिजे, प्रचार-प्रयत्न केला पाहिजे.

राज्याच्या आजच्या आर्थिक व्यवस्थेमधील समाजाची विभागणी ही व्यापारी व उपभोक्ता यांत केल्यास बहुतांश मराठी माणूस हा ग्राहकरूपात या व्यापारी वर्गाकडून दरवाढीच्या सबबीखाली लुबाडला जात आहे. या आर्थिक शोषणाच्या अतिरेकातून निर्माण झालेली असह्यताच आज महानगरांतील सर्वसामान्य मराठी माणसाला दूर उपनगरांत स्थलांतर करण्यास भाग पाडत आहे. जी स्थिती शहरांतील कष्टकऱ्यांची तीच गत ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांची. अर्थव्यवस्थेतील ‘मागणी-पुरवठा व नफा-तोटा’ पलीकडील हे भूमिपुत्रांना मारक ठरत असलेलं अन्यायी अर्थ-राजकारण रोखण्यासाठी, हाणून पाडण्यासाठी शिवसेना बहुमतात असणे अत्यावश्यक आहे.

लोकशाही तत्त्वांवर आधारलेले हिंदुस्थानी राजकारण आज व्यक्तिकेंद्रित होत असल्याचे बघायला मिळत आहे. पक्षाचे नेतृत्व हीच पक्षाची ओळख. म्हणजे ‘जैसा नेता वैसा पक्ष’ या सिद्धांतावर लोकांचे मत आकार घेताना दिसत आहे.

राजकारणातून खेळल्या जाणाऱ्या आजच्या कृतघ्न अर्थकारण आणि राजकारणात मराठी माणसाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी म्हणून म्हणा किंवा एक मराठी मतदार या नात्याने व या मातीच्या संस्कार-संस्कृतीची अभिमानास्पद अस्मिता टिकवून ठेवण्याचा स्वाभिमान बाळगणारा एक नागरिक म्हणून म्हणा, पण आपण सर्वांनी शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवण्याचा अट्टहास हा बाळगलाच पाहिजे. देशाच्या उन्नतीसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी इथल्या भूमिपुत्रांना सर्वप्रथम समर्थ करण्याची प्राथमिकता ठेवणारी शिवसेना व तिच्या नेतृत्वाला साथ देणे, विजयी करणे यावर आपणा सर्वांचे एक‘मत’ असणे नितांत गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या