श्रीसंत मामासाहेब देशपांडे

>> विवेक दिगंबर वैद्य  

श्रीपादराव देशपांडे अर्थात श्रीसंत मामासाहेब देशपांडे यांच्या अवतारकार्याचा पूर्वपरिचय करून देणारा हा लेख.

हिमालय यात्रेहून परतल्यावर दत्तोपंत बहुतांश काळ उपासनेत मग्न राहू लागले. लौकिक जगताशी असलेला संपर्क क्षीण होत गेलेल्या दत्तोपंताना पैलतीराचा ध्यास लागलेला आहे याची जाणीव पार्वतीबाईंना झाली आणि 6 मे 1928 रोजी ती प्रत्यक्षात उतरली. दत्तोपंतांनी योगमार्गाने नश्वर जगाचा निरोप घेतला. पार्वतीबाईंवर आकाश कोसळले. श्रीपादचे वय जेमतेम 14 वर्षांचे होते. त्याला वडिलांचा सहवास तसा अल्पकाळच लाभला, मात्र त्यांची थोरवी समजण्याकरिता तितका कालावधीदेखील पुरेसा होता. संध्याकाळी नित्यकर्म आटोपल्यावर दत्तोपंत ओटीवर बैठक मांडते झाले की साक्षात भगवंत त्यांच्याशी मनोमय सुखसंवाद साधत असत. तेव्हा घरभर विलक्षण सुगंध पसरत असे आणि हा अपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी माय-लेक दाराच्या चौकटीवर येऊन उभे राहत.

पार्वतीबाई रात्री नित्यनेमाने जप करीत असत. एकदा अपरात्री श्रीपादची झोप चाळवली, तेव्हा त्याला पाहावयास मिळालेले दृश्य अपूर्व होते. लखलखीत उजेडात गोपिका श्रीभगवंतासमवेत फेर धरून नाचत आहेत आणि त्यामध्ये आपली आईदेखील आहे. ते विलक्षण दृश्य पाहून श्रीपाद जागच्याजागी खिळून राहिला. काही वेळाने भानावर येताच त्याने पार्वतीबाईंना याविषयी विचारले तेव्हा त्या इतकेच म्हणाल्या, ‘अमृत प्यायला मिळाले, त्याची अन्यत्र कुठेही वाच्यता न करता ते पचव म्हणजे झाले!’

असे हे सोनसळी क्षण केवळ आठवणींची ‘साठवण’ होऊन राहिले. येणारा काळ पार्वतीबाईंसह सर्वांसाठीच अतिशय खडतर होता. पतीनिधनानंतर संसाराची जबाबदारी पार्वतीबाईंवर आली, अशातच चुलत्यांनी इस्टेट बळकावल्याने पार्वतीबाईंना नेसत्या वस्त्रानिशी घर सोडावे लागले. वैभवाचे दिवस सरले. दुःखाचे गडद पर्व सुरू झाले. पार्वतीबाई नसरापूरहून आपल्या बंधूंच्या आश्रयाला पुणे येथे आल्या. श्रीस्वामीसमर्थांचे कृपाछत्र अन् बंधूंचे साहाय्य यांच्या बळावर पार्वतीबाईंनी प्रपंचाची धुरा खांद्यावर घेतली. त्यांना सोबत होती ती कोवळ्या वयातील श्रीपादची. मात्र उपजत हुशारी गाठीशी असतानाही श्रीपादला शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि उपजीविकेसाठी छापखान्यात ‘कंपोझिटर’ची नोकरी करून त्यासोबतच वर्तमानपत्रे-तांदूळ-साबण-तेल विकण्याचा पर्यायही स्वीकारावा लागला. तरीही पार्वतीबाईंनी प्रपंच आणि परमार्थ नेटकेपणाने सांभाळला.

पार्वतीबाई आणि नरहरीमामा दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी नाथपंथी साधूंना शिधा देत असत. एकदा मामांसोबत श्रीपाद शिधा देण्यास गेला तेव्हा त्याला, ‘शिधा देण्याची प्रथा श्रीस्वामीसमर्थांच्या सूचनेनुसार सुरू झाल्याचे व शिधा प्राप्त झाल्याची साक्ष नागपंचमीच्या रात्री श्रीस्वामी स्वतः देतात’ असे मामांनी सांगितले. पुढे एकदा नागपंचमीला श्रीपादने पार्वतीबाईंपाशी ‘श्रीस्वामीसमर्थांनी आपल्यालाही साक्ष द्यावी’ असा हट्ट धरला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘स्वामींनी साक्ष देण्यासाठी तुझ्याजवळ तपःसामर्थ्याचा पुरेसा साठा नाही.’ त्यावर श्रीपाद म्हणाला, ‘जर स्वामींनी साक्ष दिली तर पुढे आयुष्यभर मी तपाचरण करेन याची खात्री बाळग!’ त्यांचे हे संभाषण चालले असतानाच तिथे एकाएकी दिव्य प्रकाश पसरला आणि त्यातून साक्षात श्रीस्वामीसमर्थ अवतरले. श्रीपादच्या अवतारकार्याचा हा प्रारंभिक सुमुहूर्त होता.

पार्वतीबाईंची साधना दिवसेंदिवस प्रखर होत गेली. त्यांनी स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवले. दिवसभराचे अविश्रांत काम आटोपले की रात्री आठ ते अकरा या वेळेत त्या साधना करीत असत. त्यानंतर हातपाय धुऊन थोडे पाणी पीत आणि नामस्मरण करीत येरझाऱया घालत. पुढे साडेअकरा ते अडीच साधना, पुन्हा पाणी पिऊन नामस्मरण करीत येरझाऱया आणि त्यानंतर पुन्हा तीन ते पाच या काळात त्या साधना करीत असत. या समग्र कालावधीपासून ते अगदी शेवटचा श्वास घेईपर्यंत पार्वतीबाईंनी कधीही जमिनीला पाठ लावली नाही. आखीवरेखीव दिनक्रम, अल्प आहार, शांत व समाधानी वृत्ती यामुळे पार्वतीबाईंमधील तेज आणि परमेशतत्त्व दिसामासांनी चढत्या क्रमाने वाढते झाले. अशी ही लोकविलक्षण साध्वी ‘आई’ येत्या काळात ‘गुरू’ म्हणूनही लाभणे ही श्रीपादाच्या पारमार्थिक जडणघडणीतील आत्यंतिक परमसुखाची ‘ठेव’ होती.

अशातच अनेक वर्षे सरली. श्रीपाद विवाहयोग्य झाल्याने पार्वतीबाईंनी पुढाकार घेत त्यांच्या भावजयीची पुतणी बबी बोपर्डीकर हिच्यासोबत श्रीपादचे लग्न ठरवले. मात्र हे प्रपंचबंधन फार काळ टिकले नाही. पहिल्या बाळंतपणानंतर काही दिवसांतच बाळ व त्यापाठोपाठ पत्नीचे देहावसान झाल्याचे दुःख श्रीपाद यास सहन करावे लागले. पार्वतीबाईंना हे ठाऊक होते, मात्र प्रारब्धभोग भोगण्यासाठी असे करणे आवश्यक आहे याची खूणगाठ मनाशी बांधून त्यांनी श्रीपादचा दुसरा विवाह करण्याचे ठरविले. अशातच एकदा पार्वतीबाईंनी श्रीपाद यास आपल्याजवळ बसवून डोळे मिटण्यास सांगितले व आपला सिद्धहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला, तोच श्रीपादचे देहभान हरपले आणि तो समाधीवस्था प्राप्त करता झाला. श्रीपादने त्या निर्विकल्प समाधीसुखाचा आनंद पाच तास उपभोगला, पुढे मूळ स्थितीत परतल्यावर पार्वतीबाई म्हणाल्या, ‘श्रीपाद, आजपासून 12 वर्षांनी हाच अनुभव तुला जी व्यक्ती देईल तीच तुझा मंत्रगुरू असेल.’ श्रीपादच्या आध्यात्मिक जाणिवा प्रगल्भ आणि परिपूर्ण व्हाव्यात तसेच श्रीटेंबेस्वामींनी सूतोवाच केलेल्या ‘अधिकारी सत्पुरुषपदाची’ धुरा वाहण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे याकरिता पार्वतीबाईंनी श्रीपादकडून श्रीज्ञानेश्वरीची पारायणे करवून घेतली. श्रीज्ञानेश्वरीच्या ओवींचे चिंतन, मनन करण्याचा क्रम आखून दिला.

पुढे एका सुमुहूर्तावर पार्वतीबाई म्हणाल्या, ‘श्रीपाद, तुला महात्मे देह ठेवून त्यातून बाहेर कसे जातात हे पाहावयाचे असेल तर इथे ये आणि नीट बघ!’ श्रीपाद समोर बसला तेव्हा पार्वतीबाईंनी उर्ध्वमुद्रा लावली आणि काही क्षणांत त्यांच्या ब्रह्मरंध्रातून निळी तेजस्वी ज्योत अनंताकडे झेपावली. पार्वतीबाईंनी त्यांचा जड देह विसर्जित केला अन् त्या परब्रह्मतत्त्वाशी एकरूप झाल्या. हे कटू सत्य उमगताच श्रीपाद भानावर आला आणि वास्तवाची जाणीव होताच धाय मोकलून रडू लागला. पार्वतीबाई स्वामीस्वरूप झाल्या हे अंतिम सत्य होते.           

आपली प्रतिक्रिया द्या